यंदाचं वर्ष हे मॅन बुकर पुरस्काराचं सुवर्णमहोत्सवी वर्ष. त्यामुळे यंदा या पुरस्काराबद्दल अनेकांना औत्सुक्य आहे, पण भारतीय-इंग्रजी साहित्याच्या वाचकांत ते अधिकच. याचे कारण या पुरस्काराला जरी पन्नास वर्षांची परंपरा असली, तरी भारतीय साहित्यिकाला हा पुरस्कार पहिल्यांदा मिळाला तो १९९७ साली. त्याआधी ब्रिटिश इंग्रजी लेखक म्हणून मूळचे भारतीय वंशाच्या सलमान रश्दींना तो १९८१ मध्ये ‘मिडनाइट्स चिर्ल्डन’साठी मिळाला होताच; परंतु भारतीय लेखक म्हणून मॅन बुकरवर पहिल्यांदा नाव कोरलं ते अरुंधती रॉय यांनीच. त्यांच्या ‘द गॉड ऑफ स्माल थिंग्ज’ या कादंबरीसाठी त्यांना १९९७ सालचं मॅन बुकर मिळालं. या कादंबरीनंतर तब्बल वीस वर्षांच्या खंडानंतर ‘द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅप्पिनेस’ ही रॉय यांची कादंबरी यंदा प्रकाशित झाली. आणि ही कादंबरीही यंदाच्या मॅन बुकरच्या प्राथमिक नामांकन यादीत निवडली गेल्याची बातमी नुकतीच आली. त्यामुळे भारतीय वाचकांमध्ये यंदाच्या पुरस्कारासाठीचं औत्सुक्य नक्कीच वाढलं आहे. एकूण तेरा साहित्यिकांचा समावेश असलेल्या या प्राथमिक यादीत रॉय या एकमेव भारतीय लेखिका आहेत, तर उर्वरित बारा लेखकांमध्ये चार ब्रिटिश, चार अमेरिकी, दोन आयरिश व दोन ब्रिटिश-पाकिस्तानी साहित्यिकांचा समावेश आहे.

ती यादी अशी –

१. ‘४३२१’ – पॉल ऑस्टर

२. ‘डेज विदाऊट एण्ड’ – सेबॅस्टिअन बॅरी

३. ‘हिस्टरी ऑफ वोल्व्हस्’ – एमिली फ्रिडलंड

४. ‘एक्झिट वेस्ट’ – मोहसिन हमिद

५. ‘सोलार बोन्स’ – माइक मॅक् कॉरमॅक

६. ‘रीजरवॉयर १३’ – जॉन मॅकग्रेगर

७. ‘एलमेट’ – फियोना मोझले

८. ‘लिंकन इन द बाडरे’ – जॉर्ज साँडर्स

९. ‘होम फायर’ – कमिला शॅम्सी

१०. ‘ऑटम’ – अ‍ॅली स्मिथ

११. ‘स्विंग टाइम’ – झैदी स्मिथ

१२. ‘द अंडरग्राउंड रेलरोड’ – कॉल्सन व्हाइटहेड

तब्बल १५४ कादंबऱ्यांमधून निवडलेली ही तेरा पुस्तकं. जुन्या-मुरलेल्यांपासून नव्यांचाही समावेश असलेली, शिवाय वय, संस्कृती, कथनशैली अशी विविधता सांगणारी ही यादी. अर्थात, ही यादी प्राथमिकच. तरीही महत्त्वाची. वाचकांना या पुस्तकांपर्यंत घेऊन जाणारी. १३ सप्टेंबरला जाहीर होणाऱ्या अंतिम यादीपर्यंत या पुस्तकांचा शोध घेण्यास प्रवृत्त करणारी.