दुसऱ्या महायुद्धात ८९,००० भारतीयांनी प्राण गमावले. या युद्धाचा भारतीय उपखंडातील लोकांवर काय परिणाम झाला, याचा पट मांडणारे हे पुस्तक आहे.. या इतिहास-संशोधनाचा हेतूच लोककेंद्री असल्यामुळे, या केवळ युद्धकथा नसून अनेक मानवी तपशील यात आहेत. ईशान्य भारताला चीनशी जोडणारा रस्ता कसा तयार झाला, भारतभरचे रस्ते-रेल्वे यांचा विस्तार युद्धाला कसा उपयोगी पडला, इंग्रजी बोलता येणाऱ्या अँग्लो इंडियन परिचारिका ब्रिटिश महिलांच्या बरोबरीने कशा वागू लागल्या.. हा तपशील साधार आणि रंजकही आहे..
जगाच्या पटलावर दुसऱ्या महायुद्धाने अभूतपूर्व बदल घडवले असले तरी त्यातील भारतीय योगदान आजवर दुर्लक्षितच राहिले होते. भारतीयांसाठी दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणी फार तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेपर्यंत मर्यादित असत. या महानाटय़ात सारा भाव खाऊन जातात ती ब्रिटन-अमेरिका-रशिया ही ‘दोस्त’ राष्ट्रे (अलाइड नेशन्स) आणि जर्मनी-इटली-जपान ही ‘अक्ष’ राष्ट्रे (अॅक्सिस पॉवर्स). पण या युद्धात केवळ ब्रिटन लढले नव्हते, तर संपूर्ण ब्रिटिश साम्राज्य (ब्रिटिश राज) लढले होते, अशी भूमिका मांडून लेखिका यास्मिन खान यांनी आपल्या ‘द राज अॅट वॉर- ए पीपल्स हिस्टरी ऑफ इंडियाज सेकंड वर्ल्ड वॉर’ या पुस्तकातून भारत आणि भारतीयांच्या या युद्धातील योगदानाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
यास्मिन खान ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात इतिहासाच्या प्राध्यापिका आहेत. त्यांनी यापूर्वी लिहिलेल्या ‘द ग्रेट पार्टिशन- द मेकिंग ऑफ इंडिया अॅण्ड पाकिस्तान’ या भारत-पाकिस्तान फाळणीच्या विषयावरील पुस्तकाला ‘रॉयल हिस्टॉरिकल सोसायटी’चा २००७ सालचा ‘ग्लॅडस्टन पुरस्कार’ मिळाला होता. भारतीय उपखंडातील बदलाची नांदी ठरलेल्या दुसऱ्या महायुद्धाचा अभ्यास करतानाही, त्यातील भारतीयांच्या सहभागाचा विशेष अभ्यास करून त्यांनी ‘द राज अॅट वॉर’ हे पुस्तक साकारले.
सामान्यपणे युद्धविषयक पुस्तकांमध्ये सैनिकांच्या शौर्याच्या रोमहर्षक आणि वीरश्रीयुक्त कहाण्या, युद्धाची दाहकता असा मसाला भरलेला असतो. त्यातही सर्व सन्मान मिळतो तो प्रत्यक्ष रणभूमीवर लढणाऱ्या आणि सर्वोच्च बलिदान करणाऱ्या सैनिकांना. त्यात वावगे काहीच नाही, पण आघाडीवर प्रत्यक्ष लढणाऱ्या प्रत्येक सैनिकामागे मदतीचे कित्येक हात असतात. त्याला लढते ठेवण्यासाठी बिनीच्या शिलेदारांमागे अनेक फळ्या कार्यरत असतात. लष्करी भाषेत या संकल्पनेला ‘टीथ टू टेल रेशो’ म्हणतात. सामान्यपणे पायदळ, चिलखती दल (रणगाडे) आणि तोफखाना ही सैन्याची दले आघाडीवर लढत असतात. त्यांना मदत करण्यासाठी शस्त्रास्त्रे व दारूगोळा उत्पादन, रसदपुरवठा, संदेशवहन, वैद्यकीय अशा अन्य खात्यांतील लोक अहोरात्र झटत असतात. त्यात स्वयंपाकी, परिचारिकांपासून सैनिकांचे गणवेश कडक ठेवणारे इस्त्रीवाले ते त्यांची केशभूषा सांभाळणारे नाभिक यापर्यंत सर्वाचा समावेश असतो. प्रत्यक्ष लढाई जिंकण्यात त्यांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा असतो. मात्र एखाद्या नाटकातील पडद्यामागचे कलाकार असल्यासारखे हे लोक कायमच दुर्लक्षित राहतात. यास्मिन खान यांनी आपल्या पुस्तकात या सामान्य लोकांना केंद्रस्थानी आणून ठेवले आहे. ही त्यांची कहाणी आहे. म्हणूनच पुस्तकाचे ‘ए पीपल्स हिस्टरी ऑफ इंडियाज सेकंड वर्ल्ड वॉर’ हे उपशीर्षक अगदी सार्थ ठरले आहे. असे करताना त्यांनी जो अभ्यास केला आहे, संदर्भ दिले आहेत, आकडेवारी दिली आहे, घटनांच्या खोलात जाऊन मानवी चेहरा सांभाळत जे चित्रण केले आहे, ते रंजकसुद्धा आहे. वाचकाला त्या काळात घेऊन जाणारे आहे. एखाद्या लहानसहान घटनेचे वर्णन करतानाच त्याचे व्यापक संदर्भही अतिशय हातोटीने मांडले आहेत. ही बाब या पुस्तकाचे बलस्थान आहे.
या युद्धाने जगाबरोबरच देशातही मोठे अभिसरण घडवून आणले होते. भारतातून युद्धकाळात साधारण २० लाख सैनिकांची भरती करण्यात आली. गावोगावच्या तरुणांसाठी सैन्यात भरती होणे ही खात्रीची आणि अधिक कमाईची संधी होती. तसेच गोरगरीब जनतेला त्यात मोफत आणि पोटभर जेवण मिळण्याचाही दिलासा दिसत होता. भारतीय सैनिक युरोप, मध्य आशियापासून आग्नेय आशियातील आघाडय़ांवर मर्दुमकी गाजवत होते आणि त्यांनी माघारी पाठवलेल्या पगाराच्या मनीऑर्डरमधून लाखो कुटुंबे चालत होती. १९४५ साली युद्ध संपण्याच्या वेळेपर्यंत साधारण ८९,००० भारतीय सैनिकांनी ब्रिटिश साम्राज्यासाठी आपले प्राण गमावले होते. जमिनीवरील सैन्याप्रमाणेच नौदल आणि वायुदलातील भारतीय मनुष्यबळ मोठय़ा प्रमाणात होते. त्यापैकी ६,६०० भारतीय नाविकांनी ब्रिटिश साम्राज्यासाठी प्राण गमावले होते.
असे म्हणतात की, ‘अमॅच्युअर्स थिंक अबाऊट टॅक्टिक्स, बट प्रोफेशनल्स थिंक अबाऊट लॉजिस्टिक्स’ (व्यूहरचनेचा विचार ठीक, पण मनुष्यबळ आणि साधनसामग्रीचे नियोजन आणि वाहतूक यांचा विचार अधिक महत्त्वाचा). त्याही दृष्टीने हे युद्धप्रयत्न अफाट होते. युद्धाच्या भगीरथ प्रयत्नांची जाणीव करून देण्यास ‘द मॅन-अ-माइल रोड’ या शीर्षकाचे प्रकरण पुरेसे आहे. चीनमधील चँग-कै-शेकच्या फौजांना मदत आणि रसदपुरवठा करण्यासाठी ईशान्य भारतातील लिडो या ठिकाणापासून म्यानमारमार्गे चीनपर्यंत साधारण ७६९ किलोमीटर लांबीचा रस्ता बांधून पूर्ण करण्यात आला. डिसेंबर १९४२ साली त्याचे काम सुरू झाले आणि जानेवारी १९४५ मध्ये तो चीनपर्यंत वापरास तयार झाला. या भागात कार्यरत असलेल्या आणि या रस्त्याच्या कामासाठी मोठी भूमिका बजावणाऱ्या अमेरिकी जनरल जोसेफ स्टिलवेल यांच्यावरून त्याचे स्टिलवेल रोड असे नामकरण केले गेले. त्याला लिडो रोडही म्हणतात, पण त्याची खरी ओळख ‘द मॅन-अ-माइल रोड’ अशीच राहिली. हा मार्ग अतिशय दुर्गम व मलेरियाच्या डासांनी भरलेल्या जंगलमय पर्वतराजीतून बांधला गेला होता आणि त्यासाठी किती जणांचे प्राण गेले याची कधी गणतीच झाली नाही. त्यामुळे प्रत्येक ‘मैलागणिक किमान एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला मार्ग’ म्हणूनच त्याचे हे नाव प्रसिद्ध आहे. तो पूर्ण करण्यासाठी भारतीय कामगारांनी ७८,००,००० मानवी श्रमदिवस खर्ची घातले. अमेरिकनांनी ७,३५,०००, तर चिन्यांनी ६६,१८,००० मानवी श्रमदिवस खर्ची घातले. या रस्त्याच्या बांधकामासाठी मराठे, बंगाली, शीख, पंजाबी, नेपाळी, नागा, मद्रासी यांच्यासह अमेरिकी आणि चिनी कामगारांनी घाम आणि रक्त सांडले. त्या वेळच्या परिस्थितीचे भीषण, पण तितकेच गमतीशीर वर्णन पुस्तकात आले आहे. ‘अॅन अँथ्रॉपोलॉजिस्ट्स ड्रीम बट अ मेस सरजट्स नाइटमेअर’ (मानववंशशास्त्रज्ञासाठी स्वप्नवत् पण सैन्याच्या खानसाम्याचे दु:स्वप्न) असे त्याचे वर्णन केले आहे. या कामावर इतक्या दूरवरून आणि इतक्या मोठय़ा प्रमाणावर कामगार नेले गेले की, बंगाल आणि बिहारमधील कोळशाच्या खाणीत पुरुष कामगार कमी पडून त्या बंद होऊ लागल्या. अखेर सरकारला महिला कामगारांवरील बंदी उठवून पुन्हा परवानगी द्यावी लागली.
ब्रिटनच्या वसाहतींपैकी मेरुमणी असलेला भारत या काळात खऱ्या अर्थाने जगाच्या केंद्रस्थानी आला होता. सागरी मार्गाने युरोप-अमेरिकेतील सैन्य आणि तेथे तयार झालेले युद्धोपयोगी साहित्य जपान आणि आग्नेय आशियाच्या आघाडीवर नेता-आणताना भारतीय बंदरांची भूमिका मध्यवर्ती होती. त्या बंदरांना देशातील हजारो किलोमीटर अंतरांवरील शहरे-गावे रेल्वेमार्गानी जोडली गेली होती. तेथून सैन्य आणि सामानसुमान आणले जात होते. युद्धाने देशाच्या सर्वच क्षेत्रांत एक धावपळ उडाली होती. काम वाढले होते. ते करणाऱ्या कामगारांची मागणी आणि मोबदलाही वाढला होता. आर्थिक क्षेत्रावर याचे परिणाम दिसत होते. कामगार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांची चांगलीच सद्दी होती. दक्षिण आशियात युद्धकाळात २०० नवे विमानतळ आणि धावपट्टय़ा बांधण्यात आल्या. शेकडो किलोमीटरचे रस्ते बांधले गेले. कारखाने, खाणी, नौदल गोदी आदींमध्ये हजारो कामगार अहोरात्र काम करत होते. अर्थव्यवस्थेला चालना मिळून अनेकांच्या हातात पैसा खुळखुळू लागला होता. त्याचे विपरीत सामाजिक परिणामही जाणवत होते. कलकत्ता, मुंबई आणि अन्य शहरांतही वेश्या व्यवसाय वाढीस लागला होता. घरांपासून कित्येक महिने लांब असलेल्या सैनिकांची गरज म्हणूनही तो वाढला. तर १९४३च्या सुमारास बंगालमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळानेही अनेक महिलांना त्यात लोटले. सैन्याला या समस्येशी सामना करताना अडचण येत होती. ‘डिफिट द अॅक्सिस, यूज प्रोफिलॅक्सिस’ (अक्ष राष्ट्रांचा पराभव करा, रोगप्रतिबंधात्मक उपायांचा वापर करा) अशा घोषवाक्यांच्या वापरातून सैन्याने आरोग्यरक्षण हेही युद्ध जिंकण्यासह महत्त्वाचे आहे, असे ठसवण्याचा प्रयत्न केला.
एकीकडे युद्धाने देशातील अँग्लो-इंडियन महिलांना पुरवठा कारखान्यांत, परिचारिका दलांत आणि हवाई हल्लाविरोधी पथकांत कामाची संधी देऊन गोऱ्या ब्रिटिश महिलांच्या बरोबरीला आणून ठेवले; तर दुसरीकडे सैनिकांना भेदभावाची वागणूकही मिळाली. या काळात देशात सुमारे दीड लाख अमेरिकी सैनिक आले होते. त्यापैकी २२,००० कृष्णवर्णीय होते. त्यांच्या देशात त्यांना वर्णभेदाचा सामना करावा लागतच होता, पण कलकत्त्यातील पोहण्याच्या तलावावरही गोऱ्या आणि कृष्णवर्णीयांसाठी वेगवेगळे दिवस पाण्यात उतरण्याच्या सूचना दिल्याच्या पाटय़ा लावलेल्या आढळून आल्या. नाझी आणि रशियातील अत्याचारांना कंटाळून सुमारे १०,००० पोलंडचे निर्वासित भारतात आले होते. त्यांच्या कहाण्याही हृदयद्रावक आहेत. झारखंडमधील रामगड येथील छावणीत ५०,००० चिनी सैनिकांना प्रशिक्षण दिले गेले होते, ही माहिती उद्बोधक आहे. देशातील मातांना युद्ध आघाडीवर चाललेल्या आपल्या मुलांच्या भवितव्याविषयी वाटणारी भीतीही लेखिकेने अचूक टिपली आहे. तसेच नशिबाचा अजब खेळही दाखवला आहे. एका मातेचे दोन मुलगे युद्धात भाग घेऊन सुखरूप परतले, पण तिसऱ्या मुलाला तिने आपल्याजवळ ठेवून घेतले होते, तो देशातच टायफॉइडने वारला. युद्धाचा खर्च भागवण्यासाठी जो निधी उभारला जात होता त्याचा सर्वसामान्यांवर कसा विनाकारण बोजा पडत होता त्याचेही वर्णन पुस्तकात आले आहे. युद्धाच्या अखेरीस आझाद हिंद फौजेच्या अधिकाऱ्यांवर भरलेले खटले, त्यातून त्यांना देशभर मिळालेली वीराची वागणूक, सन्मान याचे वर्णनही अभिमानाचे भरते आणणारे आहे. त्याच वेळी या प्रकरणात काँग्रेस कशी बाजूला पडत होती आणि मुख्य प्रवाहात येण्यास कशी धडपडत होती हेही दिसले आहे.
या सर्व वर्णनांतून लेखिकेने दुसऱ्या महायुद्धातील भारतीय सहभागाला वेगळे स्थान मिळवून दिले आहेच, पण त्यातील सामान्य जनतेच्या भूमिकेला केंद्रस्थानी आणून या युद्धाचा खरा लोकाभिमुख इतिहास मांडला आहे.
‘द राज अॅट वॉर – ए पीपल्स हिस्टरी ऑफ इंडियाज सेकंड वर्ल्ड वॉर’- ले.- यास्मिन खान , प्रकाशक : विंटेज बुक्स- रॅण्डम हाऊस इंडिया पृष्ठे : ४१६ , किंमत : ६९९ रु.

sachin.diwan@expressindia.com