‘बुकर पारितोषिका’ची ताशीव आणि ठाशीव लघुयादी नुकतीच जाहीर झाली. जगभरातून सहा इंग्रजी कादंबऱ्या सालाबादप्रमाणे निवडल्या गेल्या आणि दरवर्षीप्रमाणे जगभरच्या इंग्रजी वाङ्मयप्रेमींमध्ये त्याची चर्चा सुरू झाली. ही यादी करणारे कोण, या प्रश्नाच्या उत्तरापासून गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी सुरू होत आहे ‘बुकमार्क’ पानावरलं हे नैमित्तिक सदर..

एका वर्षभराच्या कालावधीत तुम्ही किती पुस्तके वाचता, याचा हिशेब ठेवायला गेलात तर वाचू शकलेल्या पुस्तकांपेक्षा अधिक न वाचू शकलेल्या ग्रंथांची यादी वाढत गेलेली पाहायला मिळते. पट्टीचा वाचक, पुस्तककीडा, बिब्लोफाइल, ग्रंथोपासक, वाचनोत्सुक या संकल्पना व्हॉट्सअ‍ॅप युगातील एकाग्रशून्यतेमुळे लोप पावत चालल्या आहेत. बिनीच्या वाचकसमूहाचेही मोबाइल, टॅब यांवर वाचन सुरू आहे, पण शुद्ध साहित्यिक वाचनाला हवी तितकी निवांतता देता येत नाही.. यांपासून सुरू करीत न-वाचनाच्या कारणांची वाचनीय यादी बनविता येणे कुणालाही शक्य आहे.

आपल्यातले काही लोक अधिक वाचक आणि काही कमी वाचक का असतात, याबाबत जर्मनीचे वैज्ञानिक कार्ल वेर्निक यांनी १८७४ साली शोधून काढलेला मेंदूतील ‘वाचन स्नायू’चा भाग महत्त्वपूर्ण मानला जातो. आपल्या मेंदूत डाव्या कुंभखंडात (लेफ्ट टेम्पोरल लोब) मध्यसीता (सेंट्रल सल्कस) भागाच्या वर वेर्निक नावाचा स्नायू असतो. वरकरणी पाहता मांसल दिसणारा हा भाग आपल्याला भाषेचे ज्ञान करून देत असतो, त्यामुळेच आपल्या कपाळालगतच्या कुंभखंडाला (टेम्पोरल लोब) इजा झाली तर आपण भाषा समजण्याची क्षमता गमावतो. आपल्याला वाचलेल्या शब्दांचा आणि बोलण्याचा बोध होत नाही. १८६४ मध्ये पॉल ब्रॉका नावाच्या वैज्ञानिकाने असे दाखवून दिले होते, की मेंदूतील विशिष्ट भागास इजा झाली तर आपण उच्चार आणि व्याकरण समजण्याची क्षमता हरवून बसतो. त्या भागाला अर्थातच ‘ब्रॉका’ हे नाव प्रदान करण्यात आले. तर ब्रॉका आणि वेर्निकचा भाग हे मेंदूतील दोन्ही भाग भाषाज्ञानाशी आणि अर्थातच वाचनाशी निगडित आहेत. या जगजाहीर दाखल्यातील वाचनस्नायूच्या ताकदीनुसार आपल्यात साधारण, असाधारण आणि शून्य वाचक ठरत असतात.

आजच्या वेगवान युगामध्ये साहित्य-सिनेमा आणि कलाप्रांतात स्टार्स-रेटिंगपद्धती इतकी वाढली आहे, की शहाणपणाचा साधारण निर्देशांक असलेल्यांपासून साऱ्यांनाच दिशादर्शक तंत्र ज्ञात झाले आहे. एखाद्या सिनेमाला तो कितीही चांगला असला तरीही झोपवून टाकायची किंवा कितीही वाईट असला तरी तारून नेण्याची क्षमता सध्या काही संकेतस्थळांमध्ये आहे. त्यात समीक्षक आणि दर्शक यांच्या रेटिंग्जवरून आजची एक पिढी सिनेमा पाहायचा की टाळायचा याचा निर्णय घेते. वाचनाबाबतही अशाच प्रकारच्या तीर्थस्थळांची निर्मिती गेल्या दशकभरात झाली आहे. गुडरीड्स, अ‍ॅमेझॉन, न्यू यॉर्क टाइम्स बेस्टसेलर्स आणि कित्येक वृत्तपत्र-मासिकांतील पंडित समीक्षकांकडून केल्या जाणाऱ्या शिफारसी यांच्यासोबत लिटररी एजंट्सद्वारे समाज-वृत्त माध्यमांत एकाच वेळी पुस्तक आणि लेखकाचा प्रसिद्धीमारा केला जातो. यांद्वारे एकटय़ा अमेरिकी साहित्यपटलातून जगापर्यंत महिन्याला माग ठेवता येणार नाहीत इतक्या उत्तमोत्तम पुस्तकांची सहज उपलब्धता होते. पण विविध मार्गानी त्यातील निम्म्या पुस्तकांना वाचायचे ठरविले, तरी पूर्ण वाचून डोळ्यावेगळी होताना चौफेर दमछाक होण्याची शक्यता अधिक असते. डोळ्यांवर ताण येतो, मान आणि डोके दुखायला लागते. वाचनासाठी दररोज नवी आकर्षण केंद्रे तयार होत असतात. त्यांना थोपवत, रोजच्या जगण्यातील भावना निर्देशांकाचा चढाव उतार सांभाळत, जगरहाटीची दैनंदिन कामे करीत, स्वभाषेसोबत देशातील आणखी एखाद्या भाषेतील साहित्याचे वाचन करण्याची खुमखुमी शिल्लक असेल, तर वाचनस्नायूवर ताण प्रचंड येतो आणि बैठय़ा स्थितीचे शारीरिक धोके वात-पित्तासोबत अनेक त्रासाला आमंत्रित करतात. वाचन हे छंदोव्यसन एका वर्गाकडून कितीही आदराचे मानले गेले तरी, किती कठीण असते, हे जाणून घ्यायचे असेल, तर ‘बुकर’ या पुस्तक जगतातील ऑस्कर समजल्या जाणाऱ्या पारितोषिका’२ च्या निवड मंडळातील सदस्यांच्या मुलाखती आणि विधाने जाणून घेणे आवश्यक आहे. एका बुकर पुरस्कारानंतर दुसऱ्या पुरस्काराची लांबोडकी यादी तयार होईस्तोवर दरवर्षी नव्याने निवडल्या जाणाऱ्या निवड समितीमधील मान्यवर सदस्यांना शे-दीडशे पुस्तके पूर्ण वाचून मते बनवायची जबाबदारी असते. आपली नेहमीची कामे सांभाळून किंवा पूर्णपणे सोडून या दीडेकशे पुस्तकांचे वाचन कशा पद्धतीने तापदायक असते, हे सांगणाऱ्या कित्येकांच्या मुलाखती आज उपलब्ध आहेत. या सगळ्यांचा वाचनस्नायू दांडगा आहे याबाबत शंकाच नाही.

यंदा बारोनेस लोला यंग या बहुपेढी कृष्णवंशीय महिलेकडे निवड मंडळाचे अध्यक्षत्व आहे. त्या समाजकार्यकर्त्यां, अभिनेत्री-लेखिका-फॅशनधुरिणी आणि विविध साहित्यिक-राजकीय मंडळांवर सदस्या आहेत. दुसऱ्या सदस्या फ्रेंच-इराणी पत्रकार व समीक्षक लिला आझम झांगने यांनी इराणी महिला-राजकारण व साहित्य-समीक्षा प्रांतांत कैक वर्षे नाव कमावलेले आहे. तिसरे सदस्य टॉम फिलिप्स यांनी प्राचीन पुस्तकांवर कलाकारीचा प्रयोग चाळीस वर्षे अव्याहत सुरू ठेवला आहे, तर चौथ्या सदस्या ब्रिटिश कादंबरीकार सारा हॉल यांचे एक पुस्तक २००४ साली बुकरसाठी नामांकित झाले आहे. तर वैचारिक प्रवासलेखनामध्ये कॉलिन थब्रॉन यांचे नाव कित्येक दशके जाणकारांच्या ज्ञानपल्ल्यात आहे. यात नेहमीप्रमाणेच काही असाहित्यिक आणि काहीच साहित्यिक असे समीकरण असले, तरी वाचन झपाटय़ाचा एक दुवा समान आहे. अन् त्यामुळे त्यांनी निवडलेल्या कलाकृती पाहता यंदा बुकरवर सट्टा लावणाऱ्या बुकींची सर्वाधिक पंचाईत झाली आहे. काल प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात तर बुकरवर सट्टा लावणाऱ्यांना आपल्या पाच मित्रांबरोबर सट्टा लावण्याचा गमतीशीर सल्ला दिला आहे. म्हणजे लघुयादीत शिरलेल्या प्रत्येक पुस्तकावर मित्रांना घेऊन सट्टा लावावा. पारितोषिक मिळाल्यानंतर सहा जणांनी एकाला मिळालेला फायदा वाटून घ्यावा!

अर्थात, समूहाने किंवा एकटय़ाने सट्टा लावण्याचा वृत्तपत्रीय संदेश गमतीतून आला असला, तरी यंदाच्या स्पर्धेतील तीव्रता स्पष्ट करणारा आहे. यंदा १४५ पुस्तकांना वर्षभरात वाचून त्यातून वादमान्यतेने तयार केलेल्या सहा तुल्यबळ पुस्तकांच्या यादीत तीन अमेरिकी, एक पाकिस्तानी-ब्रिटिश आणि दोन ब्रिटिश लेखकांची पुस्तके आहेत. पॉल ऑस्टर या तीन दशके बलवान कादंबरी लिहिणाऱ्या लेखकाची जवळ जवळ नऊशे पृष्ठांची ‘फोरथ्रीटूवन’ ही कादंबरी आहे. दोन दशके फक्त कथा आणि पठडीबाहेरची पत्रकारिता करून अमेरिकेच्या आघाडीच्या लेखकनावांत असलेल्या जॉर्ज सॉण्डर्स यांची ‘लिंकन इन द बाडरे’ ही चारएक गाजलेल्या पुस्तकांनंतरची पहिली कादंबरी कलाकृती आहे. तीन पुस्तकांनी पाकिस्तान आणि आशियातील राजकीय-सामाजिक स्थितीचा ब्रिटिश नजरेतून शोध घेणाऱ्या मोहसिन हमीद यांची ‘एक्झिट वेस्ट’ ही कादंबरी ब्रेग्झिटोत्तर पाश्र्वभूमीवर स्पर्धेत मिरवत आहे. चारवेळा नामांकन मिळूनही पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या अ‍ॅली स्मीथ यांची ‘ऑटम’ ही नवी कादंबरी बुकरलढाई लढणार आहे. पुस्तकांच्या दुकानात अल्पवेळ काम करून लिहिण्याची हौस पूर्ण करणाऱ्या २९ वर्षीय फियोना मॉझले हिची पहिली कादंबरी ‘एल्मेट’, तसेच प्रसिद्धीची कोणतीच पाश्र्वभूमी नसलेली एमिली फ्रिडलण्ड या अमेरिकी लेखिकेची ‘हिस्ट्ररी ऑफ वुल्व्ज’ ही आणखी एक नव्हाळीची कादंबरी पन्नास हजार पौंडाच्या पारितोषिकाला पटकावण्यासाठी स्पर्धेत आली आहे.

बुकरच्या लघुयादीत आलेली पुस्तके परिपूर्ण आणि ताशीव निकषांवर असतात. यंदा ज्युरींनी पुस्तकांच्या मुखपृष्ठ आणि मलपृष्ठांवर लिहिल्या जाणाऱ्या शिफारसी आणि भलामणींना टाळून पुस्तके निवडण्याचा पवित्रा घेतला.

टॉम फिलिप्स या निवड समीतीमधील सदस्याने या पुस्तकविक्या पद्धतीवर ताशेरे ओढले. ‘हे पुस्तक पिढीचे प्रतिनिधित्व करते’ अशा अर्थाची बेछूट विधाने करणाऱ्या प्रसिद्ध, लोकप्रिय व्यक्तींनी लिहिलेल्या ब्लर्ब्जना टाळून आम्ही यंदा पुस्तके निवडली, असे त्यांनी बुकर पुरस्काराच्या लघुयादीच्या प्रकाशनानंतर स्पष्ट केले. या वेळी कॉलिन थब्रॉन यांनी प्रकाशकांच्या भलामणगिरीची खिल्ली उडविली. एक प्रकाशक आपल्या चारही पुस्तकांच्या मुखपृष्ठावर एकाच प्रकारचे अतिशयोक्त कौतुकशब्द जोडतो. यात लेव्ह टॉलस्टॉय यांच्या कलाकृतीहून प्रस्तुत पुस्तक अंमळही खाली नसल्याचे बिंबवतो, असे थब्रॉन यांचे म्हणणे आहे.

तर या विविध प्रांतांतील, विविध प्रकारच्या वाचनसवयी असलेल्या आणि हेवा वाटायला लावणाऱ्या निवड समितीने तयार केलेल्या यादीचे महत्त्व काय, तर लघुयादीतील चाळीस टक्के पुस्तकांची खुपविक्या पुस्तकांत गणना नाही, दोन पुस्तके लांबोडक्या यादीत येण्यापूर्वी प्रसिद्धीची कंत्राटे घेणाऱ्या तीर्थस्थळांच्या खिजगणतीतही नव्हती. जॉर्ज सॉण्डर्स, पॉल ऑस्टर, अ‍ॅली स्मिथ ही आपापला अगणित वाचकवर्ग बनवून आहेत. मोहसीन हमीद यांचे पाकिस्तानी-ब्रिटिश अस्तित्व आणि त्यांच्या कादंबरीला असलेल्या वर्तमानाचे भान यांमुळे  ‘एक्झिट वेस्ट’चा गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड गाजावाजा झाला. नवी नावे असलेल्या दोन अननुभवी लेखिकांची पुस्तके बुकरफेऱ्यामुळे आता मोठय़ा प्रमाणावर उचलली जात आहेत.

एका वर्षांत फार चांगली पुस्तके वाचली नसल्याची फारच खंत असणाऱ्यांसाठी बुकर पुरस्काराची मोठी किंवा छोटी यादी आत्यंतिक मार्गदर्शक ठरू शकते. निवड मंडळाने वाचनाबाबत प्रचंड शारीरिक-मानसिक ओढाताण साधून विविध निकषांवर पुस्तके निवडलेली असतात. निवडीबाबत आपली ओढाताण आणि श्रम कमी करून वाचत राहण्याचा वेग मंदावू न्यायचा नसेल, तर पुरस्काराची घोषणा होईस्तोवर या यादीतली आपली वाचनचंगळ कुणी रोखू शकणार नाही!

(निवड समितीमधील दोघा सदस्यांच्या वाचनकाळातील मुलाखतींचे आंतरजालावरील दुवे :

*  https://www.theguardian.com/books/2017/jul/15/sarah-hall-my-writing-day

* http://www.wionews.com/world/international-womens-day-in-conversation-with-lila-azam-zanganeh-13135

पंकज भोसले pankaj.bhosale@expressindia.com