दोन आठवडय़ांवर येऊन ठेपलेल्या यंदाच्या बुकर पुरस्कारांमध्ये बाजी मारू शकणारी कादंबरी म्हणून नायजेरियाच्या ‘फिशरमेन’चा बोलबाला आहे. कुटुंबकथेच्या आधारे बदलत्या नायजेरियाविषयी बरेच काही सांगत ही कादंबरी कुण्या एका कोळियाचे शोकगीत म्हणून समोर येते. ते शोकगीत ऐकण्याची तयारी मात्र हवी..

आफ्रिकेतील कोणत्याही राष्ट्राची वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी पूर्वी अमेरिकी वा ब्रिटिश माध्यमांशिवाय जगाकडे पर्याय नव्हता. आजही त्यासाठी याच माध्यमांचे वर्चस्व मोठय़ा प्रमाणावर असले, तरी त्यांतून येणाऱ्या माहिती अथवा परिस्थितीच्या आकलनामध्ये माध्यमांची त्रयस्थ दृष्टी, सांस्कृतिक भिन्नता यांच्यामुळे मर्यादा तयार होतात. या आंतरराष्ट्रीय माध्यमांतून येणाऱ्या वृत्तांकनातून पूर्वग्रहदूषित किंवा या बडय़ा राष्ट्रांच्या सोयीचे सत्य बाहेर येते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये जोमाने पुढे येणारे आफ्रिकी साहित्य इतिहासापासून वर्तमानकालीन सत्याचा सूक्ष्मदर्शी पट जगासमोर आणत आहे. निर्वसाहतीकरणानंतर आफ्रिकी राष्ट्रांमधील बदललेली मानसिकता, एकाच वेळी आदिम आणि पुढारलेल्या संस्कृतीच्या भरणपोषणाची परिस्थिती, इंग्रजीचा सार्वव्यावहारिक पुरस्कार, टोळीयुद्ध, अंधश्रद्धा, पश्चिम-प्रभाव, स्थलांतर यांच्या चरकात तयार झालेल्या सरमिसळ संस्कृतीने जागतिक पटलाशी कसे जुळवून घेतले, यांचा नवा अनुभव इथले साहित्य देत आहे. वोल सोयंका, नदिन गॉर्डिमर, नगिब मेहेफूज, जे. एम. कोएट्जी, चिन्वा अचेबे, बेन ओकरी या पहिल्या आफ्रिकी लेखक पिढीचा वारसा चालवणाऱ्या नवलेखकांचे जथ्थेच नायजेरिया, झिम्बाब्वे, इथिओपिया या देशांमध्ये तयार होत आहेत. या वर्षी बुकर पारितोषिकासाठी ‘फिशरमेन’ कादंबरीद्वारे सर्वात मोठा स्पर्धक म्हणून गाजत असलेले नाव आहे चिगोझी ओबिओमा या नायजेरियाई लेखकाचे.

वाचण्यास खूपच सोपी, मात्र त्यात सामावलेल्या नायजेरियाई वातावरणाचे अक्राळविक्राळ रूप पाहता रचनेच्या दृष्टीने अवघड असलेली ‘फिशरमेन’ कादंबरी कुटुंबकथा, सूडकथा यांसोबत अनेक  साहित्य प्रकारांना एकत्रित करताना दिसते. मात्र या सगळ्याचा परिणाम तिला कोणत्या गटामध्ये टाकावे याबाबत संभ्रम निर्माण करतो. यातला निवेदक कथा घडत असताना नऊ वर्षांचा असून तेथून पुढील काही वर्षांतील नायजेरियाई सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि सर्वात महत्त्वाची कौटुंबिक पाश्र्वभूमी यांच्याशी वाचकाला तो एकरूप करतो. ‘कमिंग एज स्टोरी’ हाही एक उपप्रकार, त्यामुळे या कादंबरीला जोडता येऊ शकतो. वयाने तिशीच्या जवळपास आलेल्या चिगोझी ओबिओमा यांच्या या पहिल्याच लेखन प्रयत्नांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होत आहे, ते या कादंबरीतील ग्लोकल घटकांच्या परिणामामुळे. नायजेरियामधील इग्बो जमातीतील श्रद्धा, अंधश्रद्धा, मिथक, आफ्रिकी पूर्वसूरींच्या कल्पना यांच्यासोबत येट्सच्या कविता, नायजेरियातील आधुनिक कादंबरीचे संदर्भ आणि हॉलीवूडच्या चक नॉरिसच्या सिनेमांशी नाते असे संदर्भाचा मोठा हिशेब ठेवत कादंबरीने लोकप्रियतेचे साम्राज्य काबीज केले आहे.

कादंबरी सुरू होते पश्चिम नायजेरियामधील अकुरे शहरात राहणाऱ्या सुखवस्तू कुटुंबातील नऊ वर्षीय निवेदक बेंजामिनच्या नजरेतून. वडील नायजेरियाच्या राष्ट्रीय बँकेत नोकरी करणारे आणि आईचा शहरातील प्रमुख बाजारात वस्तुविक्रीचा व्यवसाय असल्याने निवेदकाचे हे ओग्वा कुटुंब शहरात तुलनेने सर्वच बाबतीत प्रगत आहे. देशात आजूबाजूला गरिबी आहे, भ्रष्ट राजकारण आहे आणि जमातींच्या जीवघेण्या लढायाही आहेत. मात्र त्यांची कोणतीही तोशीस शहरात राहणाऱ्या या मोठय़ा कुटुंबाला नाही. त्यांच्या आयुष्यात चहाच्या पेल्याइतकेही वादळ उद्भवू न शकणारी परिस्थिती आहे. ती काही अंशी बदलते, ती त्याच्या वडिलांची दुसऱ्या शहरात बदली झाल्याने. या बदलीमुळे बेंजामिनच्या आधी जन्मलेले त्याचे मोठे तीन भाऊ यांच्या आयुष्यात उनाड मुलांच्या संगतीने धाडसाचे नवे पर्व तयार होते. कठोर आईपासून लपून लोकांनी बहिष्कृत केलेल्या शहराबाहेरील काळ्या नदीवर मासे पकडण्याच्या नव्या उद्योगात ही चारही पोरे रममाण होतात. काही आठवडय़ांसाठी चालणारी त्यांची ही मासेमारी शेजाऱ्यांच्या कर्तव्यदक्ष चहाडीमुळे बंद होते. मात्र तोपर्यंत नदीजवळ राहणाऱ्या वेडय़ा भविष्यकर्त्यांने केलेल्या शापाच्या कचाटय़ामध्ये बेंजामिनचा मोठा भाऊ इकेनाना येतो. ‘कुणा मच्छीमाराच्या हातून तुझी हत्या होणार’, या त्याच्या भविष्यामुळे बिथरणारा इकेनाना आपल्या भावांशी आणि घराशी फटकून वागू लागतो. त्यात बोजा या दुसऱ्या भावाशी त्याचे सर्वात जास्त खटके उडतात. त्यांच्यातील भांडणाचे पर्यवसान इकेनानाच्या हत्येत होते आणि आपल्या हातून घडलेल्या अपघाती हत्येच्या पश्चात्तापाने बोजा आत्महत्या करतो.

सर्वच बाबतींत स्तब्ध आणि संपूर्ण असलेले बेंजामिनच्या कुटुंबाचे आयुष्य मृत्यूच्या घटनांमुळे ढवळून निघते. एकमेकांवर तीव्र प्रेम करणाऱ्या भावंडांच्या मृत्यू आणि आई व वडिलांची बदलत जाणारी मानसिक अवस्था यांमध्ये बेंजामिन आणि त्याच्याहून थोडा मोठा असलेला ओबेम्बे यांचे आयुष्यही बिघडण्यास सुरुवात होते. या साऱ्यामध्ये आपल्या भावांच्या मृत्यूला जबाबदार ठरणाऱ्या वेडय़ा भविष्यकर्त्यांला मारून टाकण्याचा विडा ही अनुक्रमे ११ व ९ वर्षांची पोरे उचलतात.

‘फिशरमेन’ तरीही सर्वार्थाने सुस्थित कुटुंबाच्या विघटनाची गोष्ट बनत नाही. बेंजामिन हा निवेदक ही कुटुंबाची गोष्ट सांगताना १९९० च्या दशकातील नायजेरियाई जीवनातील सारे पदर अत्यंत सूक्ष्मपणे आणि रंजक शैलीत उलगडून दाखवितो. त्याच्या भावांचा अकाली मृत्यू झाला असला, तरी त्यांच्या जिवंत स्मृतींनी तो कादंबरीत प्राण फुंकतो.

राजकीय स्थित्यंतराच्या काळातील कत्तली, असुरक्षित जीवन यांचे संदर्भ आपल्या कुटुंबाशी निगडित लोकप्रिय घटनांनी तो जिवंत करतो. नायजेरियाच्या अर्वाचीन इतिहासातील भ्रष्ट निवडणुका, लष्करी कारवाई यांचे कथानकाला आवश्यक तेवढेच परंतु अत्यंत रोचक संदर्भ निवेदकाने कथेत आणले आहेत.

कादंबरीत भीषण घटनांची कमतरता नाही, पण नकारात्मक सुराचा थोडाही पुरस्कार नाही. आजूबाजूच्या कुटुंबेतर माणसांची रंगविलेली व्यक्तिचित्रे अत्यंत खणखणीत स्वरूपात शब्दरूपात येतात. यात कधी प्रचंड आवाज करणाऱ्या लॉरीच्या मालकाची विनोदी व्यथा येते, तर चहाडी करणाऱ्या शेजारणीच्या कोंबडीला मारण्याचा भावांचा कार्यक्रम येतो. नदीकाठी राहणाऱ्या वेडय़ा भविष्यकर्त्यांला मारण्याच्या नियोजनामध्ये ‘थिंग्ज फॉल अपार्ट’ या चिन्वा अचेबे या नोबेल पारितोषिक विजेत्या नायजेरिया कादंबरीचे दाखले येतात. चक नॉरिसच्या देमार सिनेमांनी निवेदक व त्याच्या कुटुंबावर घातलेली मोहिनीही लक्षात येते. आई आणि वडिलांचा कठोर तरी कुटुंबवत्सल स्वभाव या कादंबरीतला विशेष भाग आहे. कादंबरीतील सर्वच प्रकरणांची नावे (वेडय़ा भविष्यकर्त्यांचे प्रकरण वगळता.) ही निवेदक प्राणिप्रेमी असल्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाशी कुठल्या ना कुठल्या प्राण्या-पक्ष्याशी तुलना करत येतात. आईची घरटय़ातील पिलांची सतत काळजी घेणाऱ्या घारीशी तुलना होते, तर मोठय़ा भावाची अजगराशी. पुढे या तुलना सतत घडणाऱ्या प्रसंगाप्रमाणे बदलत जातात आणि त्यानुसार चपखलही ठरतात.

आपल्या चार जाणत्या मुलांना वकील, डॉक्टर, इंजिनीअर आणि वैज्ञानिक रूपात मोठेपणी पाहण्याची इच्छा असलेल्या ओग्वा कुटुंबाचा कर्तापुरुष असलेले वडील नायजेरियातून प्रगत देशांत स्थलांतराच्या प्रवाहामध्ये उतरलेले असतात. सर्वात पहिल्यांदा मोठय़ा मुलाला कॅनडाला पाठविण्याचे त्यांचे स्वप्न प्रवासाच्या आधी आदल्या दिवशी इकेनानाचा पासपोर्ट हरविल्यामुळे धुळीला मिळते. शेवटी सर्वाधिक आशा असलेल्या तिसऱ्या आणि निवेदक बेंजामिनला कॅनडाला पाठविण्याची तयारीही पूर्ण होते, मात्र काळ आणि दैव त्यांच्यासमोर वेगळेच फास वाढून ठेवतो.

कादंबरीमध्ये सर्वात प्रमुख घटक आहे जोरदार स्थित्यंतर. या कुटुंबाच्या बाबतीत ते आहेच, पण त्याशिवाय अकुरे शहरातील कधी काळी लोकप्रिय असलेल्या शुद्ध नदीची वसाहतकाळात झालेल्या गैरवापरामुळे झालेली वाताहत, देशातील भ्रष्टाचारामुळे, राजकीय अराजकामुळे सामान्य माणसांचे आयुष्य वेगवेगळ्या पातळ्यांवर कसे बदलले याचा उल्लेख कथेच्या पाश्र्वभागाला गडद करण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करतो.

येथील ‘फिशरमेन’ ही संज्ञादेखील वेगळ्या पाश्र्वभूमीवर महत्त्वाची आहे. चांगले माणूस बनण्यासाठी, भविष्यात खूप पुढे जाण्यासाठी जगातील सर्वोत्तम गोष्टींना माशांसारखे पकडून ठेवण्याची शिकवण या कादंबरीतील चारही भावांना आपल्या वडिलांकडून मिळालेली असते. मात्र त्या शिकवणीचे पुढे अनपेक्षित घटनांच्या पाश्र्वभूमीवर बदलत जाणारे रूप त्या भविष्यातील यशस्वी ठरू पाहणाऱ्या कोळियाचे शोकगीत म्हणून समोर येते. नायजेरियाच्या इतिहास आणि वर्तमानाचे माध्यमांमधून आपल्यासमोर कधीच न आलेले दाखले येथे सहज डोकावतात हेदेखील कादंबरीचे वैशिष्टय़ आहे. बुकर पुरस्कारासाठी पहिल्या पाचांत नामांकित होणारी प्रत्येक कादंबरी तुल्यबळ असते. यंदा मात्र ‘फिशरमेन’चे पारडे सर्वाधिक जड आहे. या कादंबरीच्या जाळ्यात पुरस्कार अडकेल की नाही यासाठी फक्त दोन आठवडय़ांचा कालावधी उरला आहे.

 द फिशरमेन : चिगोझी ओबिओमा

प्रकाशक : पेंग्विन-रॅण्डम हाऊस

पृष्ठे : ३०४

किंमत : अ‍ॅमेझॉन- हार्डकव्हर : १२४२, पेपरबॅक ३७५

कमल राजे- loksatta@expressindia.com