इंग्रजीतच लिहिल्या गेलेल्या कादंबरीला दिल्या जाणाऱ्या ‘मॅन बुकर पारितोषिका’च्या जोडीने, इंग्रजीत भाषांतरित झालेल्या ललित लेखकांना २००४ पासून दर दोन वर्षांनी ‘मॅन बुकर इंटरनॅशनल’ पारितोषिक दिले जाई. यंदा यापैकी आंतरराष्ट्रीय पारितोषिकाचे निकष बदलले आणि यंदापासून ‘मॅन बुकर इंटरनॅशनल’ हे दर वर्षी- तेही एकाच भाषांतरित कादंबरीसाठी दिले जाईल. आंग्लेतर भाषांतील लेखकांना प्रेरणा देणाऱ्या या ब्रिटिश पारितोषिकाची यंदाची मानकरी ठरलेल्या ‘द व्हेजिटेरियन’ या कादंबरीचा हा परामर्श;  सोबत, या कादंबरीच्या लेखिका व अनुवादिका यांचीदेखील ओळख..
गेल्या दीडेक दशकांमध्ये कलेच्या संदर्भात दक्षिण कोरियाचे नाव घेतले जाते, ते चित्रपटांसाठी आणि तेही- त्यांच्या धोपटमार्ग सोडणाऱ्या सूडपटांमुळे. गुन्हेगारी, आर्थिक चढ-उतार, उत्तर कोरियाशी तणावपूर्ण संबंध यातून गेल्या काही पिढय़ांच्या दहशत-जाणिवा विस्तारत गेल्या. त्याच वेळी सर्वच बाबतींत ग्लोबल जगण्याशी एकरूप झालेल्या दक्षिण कोरियाच्या चित्रकर्त्यांनी िहसा, सेक्स यांना कलात्मकतेच्या टोकावर नेऊन सिनेमे बनविले. साचेबद्धता मोडून सूड संकल्पनेचा नवा क्रूर अध्याय त्यांच्या चित्रपटांतून उमटला. हॉलीवूडच्या स्टुडिओजनी दखल घेत या चित्रपटांच्या अमेरिकी आवृत्त्या काढायला सुरुवात केली आणि कोरिअन सूडपटांचे स्वतंत्र दालन सिनेअभ्यासकांसाठी तयार झाले. उदाहरणादाखल, ‘ओल्डबॉय’, ‘सिम्पथी फॉर मिस्टर व्हेन्जेनन्स’, ‘बिटरस्वीट लाइफ’, ‘चेझर’ ही काही जगभर पोहोचलेली कोरियाई सूडपटांची नावे. या चित्रपटांतून हिंसा अटळ असल्याचा एक करडा विचारपंथ तयार झालेला दिसतो. पुस्तकाच्या पानात या चित्रपटांचा उल्लेख यासाठी की, दक्षिण कोरियाई लेखिका हान कँग यांची या आठवडय़ातच ‘मॅन बुकर इंटरनॅशनल’ पारितोषिक मिळविणारी ‘द व्हेजिटेरियन’ ही कादंबरी नेमकी या सिनेसंस्कृतीने तयार केलेल्या करडय़ा विचारपंथाशी एकरूप झालेली दिसते. ती आपल्या आत्मसूडाच्या संकल्पनेला विविध पातळ्यांवर घासूनपुसून एका अतिसामान्य घटनेतून सुरू झालेल्या भीषण कुटुंबविघटनाला समोर आणते.
यातील अतिसामान्य घटना आहे, ती प्रमुख व्यक्तिरेखेने एका स्वप्नाला आधार मानून मांसाहाराला आयुष्यातून हद्दपार करण्याची. ही घटना मिश्राहारी किंवा स्वातंत्र्योत्तर भारतात आहारसहिष्णू संस्कृतीतच वाढलेल्या आपल्या भारतीय जनमानसासाठी फारशी महत्त्वाचीही वाटू नये. पण मांसाहार हा अविभाज्य भाग असलेल्या दक्षिण कोरियाई राष्ट्रातील एका अतिसाधारण कुटुंबामधील महिला शाकाहारी राहण्याचा निश्चय करते, तेव्हा त्याचे पडसाद हिंसक बनलेले पाहायला मिळतात. पकडून ठेवणारी छळवादी गोष्ट ‘द व्हेजिटेरिअन’ सांगते. तिचे संदर्भ जितके स्थानिक आहेत, तितकेच जागतिक पातळीवर सारख्याच प्रमाणात वैचारिक घुसळण करणारे आहेत.
कादंबरीचे तीन स्वतंत्र विभाग आहेत. हे तिन्ही भाग दोन-दोन वर्षांच्या कालखंडाने घडतात. त्या तिन्ही भागांचे कथानिवेदक निरनिराळे आहेत. त्यापैकी पहिला भाग आहे ‘यिआँग हे’ या प्रमुख व्यक्तिरेखेच्या नवऱ्याच्या निवेदनाने उलगडणारा. त्यानंतरचा भाग, तिच्या अत्याकर्षणातून अल्पकाळाचा तिचा प्रेमी बनलेला कलाकार मेहुणा सांगत असलेल्या शोकांतिकेचा. अन् अंतिम भाग तिच्या बहिणीच्या नजरेतून मनोरुग्णालयात दाखल झालेल्या यिआँग हे बाबतच्या चमत्कारिक वर्णनांचा. पहिल्या ‘द व्हेजिटेरियन’ भागात पोटभरू जुजबी महत्त्वाकांक्षा असलेल्या नवऱ्याच्या तोंडून आपल्या तितक्याच सर्वसाधारण पत्नीविषयी माहिती मिळते. त्याच्या पत्नीने एकाएकी फ्रिजमधून सर्व मांसयुक्त खाद्यांना कचरापेटी दाखविल्यानंतर अल्पकाळामध्ये त्यांच्यातील नात्यांत वाढत चाललेल्या दुराव्याची ही गोष्ट प्रवाही निवेदनामुळे सुरुवातीला गमतीशीर वाटते. धडावरल्या अंतर्वस्त्राशी फारकत घेणाऱ्या फ्रेंच किंवा युरोपीय स्त्रीवादाचा पुरस्कार करणारी यिआँग हे, ही नायिका नंतर आपला पती मांस खात असल्यामुळे त्याचा गंध बदलतो म्हणत त्याच्यापासून लांब राहायला लागते. अनेक दिवस मांसाहाराशी काडीमोड घेतल्यामुळे पत्नीचे घटत जाणारे वजन आणि स्वत:ची होणारी खाद्य कुचंबणा संपुष्टात आणण्यासाठी तो सासुरवाडीत पत्नीची तक्रार करतो. त्याची सासुरवाडी या घटनेने चिंतित होत कुटुंबभोजनाचा मुहूर्त आखते. या मुहूर्तामध्ये यिआँग हेवर मांस खाण्याची साग्रसंगीत सामूहिक सक्ती होते. जिची परिणती तिच्या आत्महत्येच्या पहिल्या प्रयत्नापर्यंत पोहोचते.
कादंबरीचा ‘मंगोलियन मार्क’ हा दुसरा भाग यिआँग हे हिचा घटस्फोट होऊन दोन वर्षे घडून गेल्यानंतरचा आहे. एकटी राहून आणि शाकाहार धरून सुकत चाललेल्या यिआँग हेच्या बदलत गेलेल्या शरीराचे आकर्षण तिच्या कलाकार मेहुण्याला अस्वस्थ करून सोडते. लौकिकार्थाने बेकारच असलेल्या या कलाकाराला आपली भविष्यातील सर्वोत्तम कलाकृती यिआँग हेमध्ये दिसू लागते. व्हिडीओ कलावंत आणि नव्वदोत्तरी काळातला दृश्यकलावंत म्हणून स्वत:ची ओळख सांगणारा, पण आतापर्यंत थातुरमातुर कामगिरीच करणारा हा कलाकार तिचे चित्र, चलचित्र बनवण्यासाठी सज्ज होतो. त्याची तशी कलाकृती खरोखरच बनत असताना एककल्ली बनत जाते. न-परतीच्या वाटेवर कलाकृतीच नव्हे, त्याचे संतुलनही बिघडायला लागते आणि यिआँग हे या मेहुणीशी त्याने शरीरसंबंध ठेवल्याचे पत्नीला कळताच तो आत्महत्या करतो.
तिसऱ्या ‘फ्लेमिंग ट्रीज’ या भागात यिआँग हे हिचा शाकाहार टोकाला पोहोचतो. यात तिला आपल्या शरीराचे झाडामध्ये रूपांतर होत असल्याची जाणीव होते. अन्न ग्रहणाऐवजी आपले शरीर सूर्यप्रकाशाद्वारे झाडांप्रमाणे प्रकाशसंश्लेषणाची क्रिया घडवत असल्याचा भ्रम व्हायला लागतो. या भ्रमामुळे तिची रवानगी (ती असायला हवी अशा) मनोरुग्णालयातच केली जाते. इथे तिची देखभाल करणारी असते तिची बहीणच- म्हणजे त्या कलाकार मेहुण्याची पत्नी. झाले गेले विसरून ही बहीण, यिआँग हेच्या जगण्याच्या लढय़ामध्ये सामील होते. मात्र माणूस म्हणून यिआँग हे हिला परत आणण्याचे सारेच मनसुबे आपोआप उधळले जातात.
कादंबरीमध्ये यिआँग हे हिच्या शाकाहारी बनण्याचे तपशिलात स्पष्टीकरण दिले जात नाही. एक धूसरसे चेहरायुक्त दिसलेले स्वप्न, ज्यामुळे मी मांस खाणे थांबविणार असल्याचे ती जाहीर करते. पूर्णत: शाकाहार अवलंबल्यानंतर तिच्या माणूसपणातून निवृत्त होण्याच्या आणि झाडपणात रूपांतरित होण्याच्या जाणिवांचे वर्णन कादंबरीमध्ये अगदी सविस्तर येते. आधी नवऱ्याशी घटस्फोट, त्यानंतर कुटुंबातील सदस्यांचा बहिष्कार, मेहुण्याशी लादलेल्या नात्यातून घडणारी दुर्घटना, बहिणीच्या अतिसुखी संसाराच्या बदललेल्या रूपाची कारणमीमांसा हे सारे केवळ मुख्य व्यक्तिरेखेच्या शाकाहारी बनण्याच्या निर्णयापाशी येऊन पोहोचते.
लग्नसंस्था, नातेसंबंध, कुटुंबाकडून लादले जाणारे अपेक्षांचे ओझे यांच्याविषयी आजच्या जगात रूढ होत चाललेल्या नव्या संकल्पनांना यातल्या पहिल्या दोन भागांमध्ये मोठे स्थान आहे. या दोन्ही भागांतील निवेदक हे अखेर ‘नवरा’ आहेत. आपल्या पत्नीचे सर्वसाधारणपण मान्य असलेल्या पहिल्या भागातील निवेदकाला त्याच्या पत्नीच्या आहारस्वातंत्र्याविषयी आक्षेप आहेत. त्याच्याही मनात पत्नीऐवजी तिच्या बहिणीविषयीच तुडुंब शारीरआकर्षण आहे. एका पातळीपर्यंत शाकाहाराचा अन्न-अत्याचार सहन न झाल्याने हा पहिल्या भागातला निवेदक बिथरत जातो. गंमत म्हणजे दुसऱ्या भागाच्या निवेदकालाही (बहिणीचा नवरा) आपल्या पत्नीऐवजी तिच्या बहिणीचीच -म्हणजे यिआँग हे हिची- ओढ अधिक वाटते. अन् त्याला संधी साधण्याची वेळ येते, तेव्हा तो ती पूर्णपणे वापरून घेतो. त्याचबरोबर त्याच्या क्षेत्रात असलेल्या त्याच्या कलात्मक बाहेरख्याली नात्याचाही येथे ओझरता आणि गंमतशीर उल्लेख होतो. काही प्रमाणात इथे शुद्ध कलेच्या नावाखाली निवेदकाचा दडपणयुक्त पोर्नोग्राफिक प्रवास सुरू होतो. मग लैंगिक संबंधांची अत्यंत बेधडक वर्णने येऊ लागतात. अन् त्यातील तणाव वर्णनांवर रंगलेली बरीच पाने आपला वाचनवेग वाढविणारी ठरतात. तरीही यातला विनोद हा पुरता गंभीर आणि मानवी मूलभूत प्रवृत्तीतील अगोचरपणावर थेट बोट ठेवणारा आहे.
‘मंगोलियन मार्क (स्पॉट)’ या पाश्र्वभागी होणाऱ्या निळसर जन्मखुणेच्या वर्णनासोबत सेमीपोर्न पातळीवर पोहोचणारे आणि तरी कलात्मकतेशी नाते सांगणारे त्याचे स्वरूप बऱ्यापैकी धक्का देणारे आहे.
तिसऱ्या भागात आपले मोडलेले आयुष्य सावरण्याच्या खटपटीतच झाड बनू पाहणाऱ्या बहिणीला पुन्हा माणूसपणात ओढण्याच्या लढाईचा निवेदिकेचा भाग भावपूर्ण होतो. यात यिआँग हे लहानपणापासून उलगडत जाते. भरपूर काव्यात्मक असला, तरी हा भाग कादंबरीतील सर्वात वेदनादायी आहे. निवेदिकेचा रुग्णालयापर्यंतचा प्रवास, मनोरुग्णालयातील वातावरण आणि सर्व प्रयत्नांना थोपवून निसर्गाशी एकरूप होत जाणाऱ्या साध्या तपशिलांमधून मोठा परिणाम लेखिकेने साधलेला आहे.
कादंबरीला त्यामुळे कोणत्या वर्गवारीत टाकावे, असा प्रश्न ती संपविल्यानंतर उपस्थित होतो. काफ्काच्या ‘मॅटमॉर्फसिस’च्या जादूई वास्तववादाशी कादंबरीचा काडीमात्र संबंध नाही. पण तिच्या आतील घटकांमध्ये फ्रेंच कलाविचारांपासून ते स्त्रीवादापर्यंत अनेक संकल्पना आहेत. आजची तंत्रराक्षसाला कवेत घेणारी अतिरेकी पिढी एका हतबलतेनंतर निसर्गाकडे झुकू लागली आहे. या प्रवृत्तीचीही इथली नायिका प्रतिनिधी आहे. त्याचसोबत नाते कुटुंबसंस्थेचा आणि मूलभूत सामाजिक संस्थांचा किंवा ‘सोशल कॉन्ट्रॅक्ट’चा ऱ्हास हादेखील कादंबरीचा एक विषय आहे. त्याहूनही, ही कादंबरी कोरियन सूडपटांशी संलग्न अशा करडय़ा विचारपंथाशी एकरूप आहे. कोरियाच्या सिनेमांतील ‘डोळ्यांच्या अंगावर’ येणाऱ्या क्रूर घटनांइतकीच इथली काही वर्णने वाचकाला क्रौर्याचा नवा आविष्कार मनात उभा करून देण्यात यशस्वी होतात. पुस्तकांमधून आत्मसुडाचे कोरियाई रूप अनुभवायचे असेल, त्यांच्यासाठी ‘द व्हेजिटेरिअन’ कादंबरी आहेच, पण त्याखेरीज या मूळ कोरियन भाषेतल्या कादंबरीवरील त्याच भाषेतला चित्रपटही उपलब्ध आहे!

द व्हेजिटेरियन
लेखिका : हान कँग,
अनुवाद : डेबोरा स्मिथ
प्रकाशक : होगार्थ ( पेंग्विन)
पृष्ठे : १६० किंमत: ४१३ रुपये

 

पंकज भोसले 
pankaj.bhosale@expressindia.com