‘पाककलेसाठी पद्म पुरस्कार’ वगैरे बातम्या अलीकडल्या, पण नव्या पाककृती आत्मसात करणे तसेच जुन्या चवी टिकवून ठेवणे हे सांस्कृतिक कार्यच असल्याची जाणीव आधीपासूनची आहे. दुर्गा भागवतांनी पाककृतींबद्दल जे काम मराठीत केले, त्यासही असा- संस्कृतिसंवर्धन आणि जतनाचा स्वाद होता.. त्याची आठवण यावी अशा एका इंग्रजी पुस्तकाची ही ओळख.. अर्थातच पाककृतीवर्णनाविना!

वासंती दामले
वरवर पाहता पाककृतींचेच, असे वाटणारे हे पुस्तक हाती घेण्यास कारणीभूत ठरलेली पहिली बाब म्हणजे लेखिका रुक्मिणी श्रीनिवास या प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ एम. एन. श्रीनिवास यांच्या पत्नी आहेत. दुसरे म्हणजे त्या त्यांच्या आठवणी, नाश्त्याच्या विविध प्रकारांसह या पुस्तकात सांगत आहेत व तिसरे म्हणजे पुस्तकाचे रूप व छपाई अत्यंत आकर्षक आहे. रुक्मिणी यांचे वडील मिलिटरी अकाऊंट सíव्हसमध्ये नोकरीला होते व त्यांची पहिलीच नेमणूक क्वेट्टय़ाला झाली होती. त्यानंतरही ते भारतात कराची, पुणे, जबलपूर वगरे ठिकाणी बदली होऊन गेले. हे महत्त्वाचे एवढय़ासाठी की, शिक्षण व विविध प्रकारचे अनुभव यामुळे त्यांचे विचार व वागणे उदार झाले व त्याचा फायदा त्यांच्या मुलींना झाला. त्यांना आठ मुली व एक मेंदुविकाराने ग्रस्त मुलगा, असे असूनही त्यांनी मुलींना उत्तम शाळांतून शिकवले, त्यांना स्वातंत्र्य दिले व महत्त्वाचे म्हणजे या मुलींशी त्यांचा उत्तम संवाद होता. त्यांची आईही या अनुभवांमुळे, शेजारणींशी मनमोकळी दोस्ती व देवाणघेवाण असणारी झाली. अशा तऱ्हेने घरापासून दूर राहणारे लोक, जी जवळ असतील तीच आपली मंडळी हे स्वीकारू लागतात तसे या कुटुंबाचेही झाले. मुलींच्यात लेखिका दुसरी असल्याने तिने हे सर्व अनुभव जवळून पाहिले. या आयुष्यादरम्यान शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून शिकलेले पदार्थही यात आहेत. लेखिका स्वत: कट्टर शाकाहारी असल्याने यातील सर्व पदार्थही शाकाहारीच आहेत, परंतु त्यात वैविध्य आहे. लग्नानंतर नवऱ्यासह अनेक देशांत व शहरांत राहण्याचा त्यांना योग आला. तेव्हाही त्या अनेक पदार्थ शिकल्या. एवढेच नाही तर त्यांच्याकडे असणाऱ्या स्वयंपाकाच्या बाईंकडूनही शिकलेल्या चांगल्या पदार्थाचा समावेश या पुस्तकात आहे. शाळा संपवल्यावर चेन्नईमध्ये, क्वीन मेरी कॉलेजमध्ये तिचे पुढील शिक्षण झाले. तिथून जवळच्या छोटय़ाशा उपाहारगृहात त्या वेळी मिळणाऱ्या स्वादिष्ट पदार्थाची कृतीही यात आहे. मद्रास विद्यापीठातून एम.ए. करताच, भूगोल विषयाची प्राध्यापिका म्हणून क्वीन मेरी कॉलेजमध्येच त्यांची नेमणूक झाली. काही महिन्यांतच श्रीनिवास यांच्याशी ओळख होऊन त्याचे पर्यवसान विवाहात झाले. या विवाहानंतर रुक्मिणी यांचे वेगळेच आयुष्य सुरू झाले.
हेसुद्धा तसे सर्वसामान्य आयुष्य म्हणता येईल. स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताच्या निरनिराळ्या प्रांतांत राहण्याची संधी अनेकांना मिळाली; पण काही स्वभावगत गुण व काही आनुवंशिकतेने आलेले गुण, शिवाय मिळत गेलेली संधी, यामुळे त्यांचे आयुष्य वेगळे घडत गेले. म्हणजे वडिलोपार्जति जमीन असणारे त्यांचे वडील, ते सोडून त्या काळी क्वेट्टय़ासारख्या ठिकाणी नोकरी करायला गेले. एकुलता एक मुलगा मानसिक विकलांग असून त्यालाही भरपूर प्रेम देऊन आठही मुलींना उत्तम शिक्षण दिले. भावा-बहिणींशी उत्तम संबंध असूनही, मुलींच्या लग्नाबद्दलचे जुन्या मताच्या आत्याचे दडपण स्वत:च्या मनावर येऊ दिले नाही तसेच मुलींनाही दिले नाही. हे त्यांच्या वाचनातून तसेच त्यांच्या चिंतनातून आले आहे हे रुक्मिणींच्या लिखाणातून कळते. निवृत्त झाल्यावर तंजावरला आले तोवर फक्त सगळ्यात मोठय़ा मुलीचे लग्न झाले होते. त्यांच्या शेजारच्या डॉक्टर मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम पारंपरिक रीतीने झाला, त्याचे सविस्तर वर्णन मनोरंजक पद्धतीने रुक्मिणी करतात व या सर्व प्रकाराबद्दल वडिलांची नापसंतीही त्या स्पष्ट नोंदवतात; पण अशा प्रसंगी जे खाद्यपदार्थ केले जातात त्याची कृती त्या आपल्याला सांगतात. पुस्तकात नोंदवलेल्या प्रत्येक प्रसंगाशी निगडित खाद्यकृती त्या आपल्याला सांगतात, बरोबर त्यांचे सुंदर फोटो या खाद्यपदार्थाचे रूप आपल्यापुढे सादर करतात. रुक्मिणी जेव्हा श्रीनिवास यांच्याशी लग्न ठरवतात तेव्हा या अय्यर म्हणजे शिवोपासक व श्रीनिवास अय्यंगार म्हणजे विष्णुउपासक या दोन्ही घरून या लग्नाला आनंदाने संमती मिळते. दक्षिण प्रांतात या दोन्ही उपासकांतील भेद पराकोटीचे होते हे बघता दोन्हीकडील वडीलधारे खऱ्या अर्थाने प्रागतिक होते. नातेवाईकांनी अर्थात थोडी कुरकुर केली. अर्थात या शिव-विष्णू युतीमुळे आपला फायदा म्हणजे अय्यर-अय्यंगार दोन्ही पद्धतींच्या पदार्थाची ओळख व कृती आपल्याला माहीत होते.
रुक्मिणींची आणखी एक मनावर उमटलेली प्रतिमा म्हणजे उत्तम शिक्षण व नोकरी असूनही लग्न झाल्यावर त्यांनी ही नोकरी सहज सोडून दिली. अर्थात तो त्या काळाचा महिमा होता हे नि:संशय! श्रीनिवास हे अत्यंत मोठे समाजशास्त्रज्ञ.. त्यांना सहचरीही त्यांच्या तोडीची मिळाली व म्हणूनच त्यांचे सहजीवन यशस्वी झाले. लग्नाचे एक वर्ष बडोद्यात, त्यानंतर लंडनमाग्रे अमेरिकेचा प्रवास, तेथील जीवन वा त्यानंतरही त्यांचे जीवन त्या समरसून जगल्या. जातील तिथले खाद्यपदार्थ आपलेसे केले व ते आपल्यापर्यंत पोहोचवले. तिथल्या अडचणीसुद्धा त्यांनी हसतखेळत मांडल्या आहेत. उदा. परदेशी पन्नास-साठच्या दशकात जाणाऱ्या शाकाहारींची कोंडी व त्यामुळे उपाशी राहायला लागल्याचे प्रसंग त्यांनी रंगवून सांगितले आहेत. श्रीनिवास अशा वेळी थोडेफार सामिष चालवून घेत, उपाशी या एकटय़ाच. हेही खरे की, नवऱ्याने त्यांना ‘खायलाच हवे’ असा आग्रहही धरला नाही. त्यांना पाटा-वरवंटय़ाची सवय! तेव्हाचे मिक्सर त्यांच्या काही मनास येईनात. नवऱ्याला व त्याच्या एका सहकाऱ्यास त्यांना काय हवे ते कळे ना. शेवटी तो त्यांना घेऊन समाजशास्त्र विभागाच्या मानववंशशास्त्र संग्रहालयात घेऊन गेला. तिथे त्यांना अमेरिकन इंडियन स्त्रिया मका वाटण्यासाठी आपल्यासारखा पाटा व त्रिकोणी वरवंटा दिसला व त्यांचे काम भागले. त्या पाटय़ा-वरवंटय़ाचा सुरेख फोटोसुद्धा आहे. फोटो बघून आपल्याला मजा वाटते. आजतागायत अमेरिकन बाजारातून तसाच पाटा-वरवंटा आणून त्या वापरतात.
श्रीनिवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये समाजशास्त्र विभाग स्थापन करण्यास राहिले व नंतर अनेक वष्रे बंगलोरला इन्स्टिटय़ूट ऑफ इकॉनॉमिक चेंज स्थापन करून त्यात शिकवले. या दोन्ही ठिकाणी रुक्मिणींना त्यांचा विषय भूगोल शिकवण्याची संधी मिळाली. नवऱ्याच्या मृत्यूनंतर, दोन्ही मुलींच्या आग्रहास्तव त्या बराच काळ शिकागोला असतात. तिथे व त्याआधीही लोकांच्या आग्रहास्तव त्या शाकाहारी स्वयंपाकाचे क्लासेस घेतात. आनंदी व समाधानी स्वभाव असला, की माणूस समोर येईल त्या परिस्थितीत सुखाने राहतो हा धडाही सहज जाताजाता त्या आपल्याला शिकवून जातात.
त्यांच्या विद्यार्थ्यांच्या, तसेच त्यांच्या मुलींच्या आग्रहाखातर हे पुस्तक त्यांनी लिहिले. त्यांचे बहुसंख्य विद्यार्थी पुरुष आहेत. पाककृती सांगताना मापे व अनेक नावे अमेरिकन वाचकाला उपयोगी पडतील अशी जरी असली तरी अनेकदा त्याची भारतीय नावेही दिली आहेत. एक देखणे, उपयुक्त व भेट देण्यायोग्य पुस्तक वाचल्याचा आनंद या पुस्तकामुळे जरूर मिळतो.
vasantidamle@hotmail.com