झारकाळातील रशियाची क्रांतीकडे वाटचाल होणे कसे आवश्यकच होते, हे सांगणारी अनेक पुस्तके आजवर आली. मात्र हे पुस्तक झारचा रशिया हा देश म्हणून कसा होता आणि वंशीय पायावर अर्थव्यवस्था अवलंबून असणारा हा देश किती कठीण भूराजकीय अवस्थेतून जात होता याचीही जाण देते..
ई. एच. डॉमिनिक लायविन यांचे ‘टुवर्डस् द फ्लेम- एम्पायर, वॉर अ‍ॅण्ड द एण्ड ऑफ झारिस्ट रशिया’ हे नवीन आलेले अतिशय वेगळे पुस्तक आहे. लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे, बहुतेक पुस्तके पाश्चिमात्य दृष्टिकोनातून लिहिली गेली अथवा बोल्शेविक क्रांतीबद्दल सहानुभूती असलेल्यांनी लिहिली. अर्थात अभ्यासकाला या दोन्ही प्रकारच्या पुस्तकांचा उपयोग झाला. आणि इतिहासात अंतिम वाक्य नसतेच. हेही पुस्तक तसे नाही. याचे वेगळेपण लेखकाने जी नवीन माहिती वापरली आहे व ज्या वेगळ्या दृष्टिकोनातून ती मांडली आहे त्यात आहे. १९९१ मध्ये, रशिया इतर प्रांतांपासून वेगळा झाल्यावर, त्यांनी तिथली अभिलेखागारे (आर्काइव्ह्ज) उघडली. त्या वेळी मुख्यत: पाश्चिमात्य देशातील अभ्यासक बराच काळ तिथे मुक्काम ठोकून होते. सर्व कागदपत्रे खुली झाल्यावर ‘नवी काही माहिती येते आहे का?’ याची खूप उत्सुकता होती. ही उत्सुकता काही अंशी या पुस्तकामुळे शमते. काही अंशीच, कारण नवी असली तरी अभिलेखागारांमध्ये मिळालेली माहितीच यात आहे. पण युद्धाकडे व क्रांतीकडे बघण्याच्या दृष्टिकोनात फारसा फरक यामुळे पडेल असे नाही. मग हे पुस्तक कुणी, कशासाठी वाचावे? तर आंतरराष्ट्रीय संबंधांचा जे अभ्यास करतात त्यांनी, राष्ट्रवादाचा व राष्ट्रांचा उदय केव्हा व कसा झाला याविषयी जाणून घेण्यात ज्यांना प्रामाणिक रस आहे त्यांनी, झारकालीन रशियाविषयी ज्यांनी फक्त पाश्चात्त्य दृष्टिकोनातून अथवा कम्युनिस्ट दृष्टिकोनातून वाचले आहे त्यांनी, अशा सगळ्यांनी हे पुस्तक वाचावे. यामध्ये प्रथमच भूराजकीय कारणांवर सतत भर दिलेला आढळतो. लेखक हे स्पष्ट करतो की, ‘हे पुस्तक रशियाकडून जगाकडे’ पाहत आहे. पुस्तकाचे महत्त्व यात आहे हे भान संपूर्ण पुस्तकात लेखकाने अजिबात सुटू दिलेले नाही.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखक म्हणतो की, आजवर असेच समजले गेले आहे की, पहिले महायुद्ध हे वसाहतवादी सत्तांनी, वसाहती व त्यातील कच्च्या मालाचा पुरवठा व त्यांचा बाजार यासाठी लढले. परंतु आज कुठल्याही इतिहासकाराला हे मान्य नाही. इंग्लंड व अमेरिका आजवर हे मानत आले आहेत की प्रश्न, युरोपबाहेरच्या वसाहतींमुळे निर्माण झाला. अनेक राष्ट्रांवर स्थापन केलेली सत्ता, तीही त्यापैकी बऱ्याच गटांच्या मनाविरुद्ध, म्हणजे साम्राज्य! अशी वेगळी व्याख्या लेखक करतो. उदा. रशिया. त्याचे हेही म्हणणे आहे की, २०व्या शतकाच्या सुरुवातीला जर्मनीची प्रगती बऱ्यापैकी होती. एकीकरण झाले तेव्हा अन्न व कच्च्या मालाबाबत जर्मनी स्वयंपूर्ण होता. १९१४ पर्यंत त्याला बरेचसे अन्न व कच्चा माल आयात करावा लागत होता. तसेच सतत वाढण्याची खरी अथवा काल्पनिक गरज त्यांना वाटत होती. त्यांना धास्ती इंग्लंडच्या नौकादलाची होती. युरोपमधील सत्तातोल (बॅलन्स ऑफ पॉवर) सांभाळण्याची गरज इंग्लंडच्या स्वत:च्या सुरक्षेपुरती मर्यादित होती. १९१५ साली, इंग्लंडला भारतातून मिळणारा महसूल हा रशिया किंवा ऑस्ट्रियन साम्राज्याच्या महसुलापेक्षा जास्त होता. साहजिकच, भारतातील राज्य टिकवण्याची त्यांना जास्त चिंता होती. युरोपीय राजकारणाचा तोल बिघडू न देण्याइतपतच इंग्लंडची भूमिका होती. पश्चिम युरोपीय, पूर्व युरोपीय स्लाव लोकांना कमी प्रतीचे, गावंढळ व मागास मानायचे. पश्चिम स्लाव निदान त्यांच्या धर्माचे म्हणजे रोमन कॅथोलिक होते (पोलिश, झेक, स्लोवाक इत्यादी). बायझन्टाइनकडून स्वीकारलेला ऑथरेडॉक्स ख्रिस्ती धर्म पूर्व स्लावांचा होता. एके काळी पोपची इच्छा सर्व युरोप स्वत:च्या छत्राखाली आणण्याची होती व त्यासाठी स्वीडनला आदेश देऊन, त्यांना रशियाशी लढाई करायला लावली होती. ही अर्थात जुनी गोष्ट. पण विषयाचे कंगोरे समजण्यासाठी ही माहिती आवश्यक ठरते.
प्रचंड मोठा भूप्रदेश, मंगोल आक्रमकांशी दोनशे वर्षे दिलेले तोंड व अतिशय थंड हवामान, यामुळे हा प्रदेश खरोखर मागासलेला होता. पीटर पहिला या राजाने, रशियाला युरोपीय तोंडावळा दिला. ही अठराव्या शतकाची गोष्ट. १९व्या व २०व्या शतकात युरोपीय राजकारणात त्यांचा सहभाग लक्षणीय होता. तसेच १९व्या शतकात रशियन साहित्य, कला, संगीत हे उच्च कोटीला पोहोचले होते. रशियाची राजनैतिक पत्रापत्री व प्रसिद्ध-अप्रसिद्ध आठवणी तपासताना लेखक म्हणतो की, त्याची सततची चिंता, युद्ध सुरू झाल्यास त्याच्या जहाजांची बोस्फरस- डारडानेलसच्या सामुद्रधुनीत कोंडी होऊ शकते, ही होती. तरीही कागदपत्रांवरून कळते की, मुत्सद्दी हे जाणून होते की कॉन्स्टन्टिनोपलवर चढाई केल्यास संपूर्ण युरोप त्यांच्या विरोधात जाईल. त्याचबरोबर बायझन्टाइनचे साम्राज्य नष्ट झाल्याने, त्यांच्याच ख्रिस्ती धर्माचे अनुयायी असलेले, पूर्व स्लाव (बल्गार, सर्ब, ग्रीक, इत्यादी) ही रशियाचीच जबाबदारी असेल, हेही त्यांना वाटायचे. हे स्लाव आधी ऑटोमन आधिपत्याखाली होते व मग कॅथोलिक ऑस्ट्रियाखाली. त्यांच्यातील आपापसांतील चढाओढीचे व युरोपीय राजकारणावर त्यांच्या होणाऱ्या परिणामाचे वर्णन लेखक सविस्तर करतो.
बाल्कन लढाया या नावाने इतिहासात प्रसिद्ध असणारे प्रकरण, इथे वेगळे यासाठी वाटते की या इतिहासाचा वेध लेखकाने या देशांमध्ये असलेले रशियाचे राजदूत व विदेशमंत्री, तसेच झार निकोलस दुसरा यांच्या पत्रांवरून घेतला आहे व याच अनुषंगाने जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रान्स या युरोपच्या बडय़ा खेळाडूंच्या परदेशनीतीवर परिणाम करणाऱ्या बाबींची चर्चा केली आहे. उदा. ईस्टोनिया, लाटविया या बाल्टिक प्रदेशातून स्थलांतर करून जर्मनीत जाणाऱ्या जर्मनांनी, लोकांचे मन रशियाविषयी कलुषित केले होते. याच प्रकरणात, विदेश विभागात काम करणाऱ्या व्यक्तींची कौटुंबिक पाश्र्वभूमी, त्यांची विचारसरणी, त्या अनुषंगाने त्यांनी घेतलेले निर्णय वगैरेची सविस्तर माहिती मिळते. काही मजेदार माहितीही. उदा. राजदूताचे पद पैसा देणारे नव्हते. त्यामुळे जास्तकरून सरंजामी कुटुंबाची मुले अथवा ज्यांना कमाईचे दुसरे साधन असे, तेच या व्यवसायाकडे वळत. ही बरीचशी कुटुंबे मूळ बाल्टिक जर्मन पण आता ऑथरेडॉक्स धर्म पालन करणारी होती. तर एका राजदूताविषयी लेखक म्हणतो की, तो-बाब्रीन्स्की- कॅथरीन दुसरी हिच्या अनौरस पुत्राचा वंशज होता.
यात एक संपूर्ण प्रकरण त्या काळच्या प्रसारमाध्यमांवर लिहिले आहे. बहुसंख्य निरक्षर, शेतकरी प्रजेवर लिखित माध्यमांचा कितीसा प्रभाव पडणार? लेखकही हे कबूल करतो की, समाजातील काही मूठभर- निर्णय घेणारे- लोक हेच प्रसारमाध्यमांतही मुख्य भूमिका वठवत होते. रशियाच्या किंवा स्लाव शेतकऱ्यांच्या संदर्भात पाहिल्यास, युरोपीय राजकारणाशी त्यांचे काही देणेघेणे नव्हते. स्लाव किंवा रशियन शेतकऱ्यांना, जर्मनी कुठे आहे हेही सांगता आले नसते. पण जमिनीचा प्रश्न त्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा होता. बाल्कन प्रश्न अवघड व स्फोटक झाला तो बल्गेरियन व सर्बियन बुद्धिजीवींमुळे. मासिडोनियात बल्गेरियन, सर्ब, अल्बानियन, ग्रीक शेतकरी, पिढय़ान्पिढय़ा, गुण्यागोविंदाने मसिडोनियन म्हणून राहत होते. त्या प्रदेशावर हक्क सांगणे, त्यासाठी वादविवाद करणे, हमरीतुमरीवर येणे व त्यासाठी लढाया करणे हे त्या-त्या वंशाचे बुद्धिजीवी व राज्यकर्तेच करत होते. मुख्यत: यात शिक्षक होते. बल्गार व सर्ब दोघेही ऑथरेडोक्स ख्रिस्ती, वंश स्लाव पण गत मोठेपणाच्या कहाण्यांतून, वंशश्रेष्ठत्वाच्या भावनेने फुगणे व फुगवणे, यातून सर्व प्रश्न उभे राहिले. रशियाचे तिथे असणारे राजदूत कधी स्लाव एकीकरणाच्या स्वप्नाने भारलेले तर कधी वास्तवाची जाण असणारे होते. रशियाचा भूविस्तार झाला. पूर्वेकडील प्रांत जेव्हा रशियाच्या आधिपत्याखाली आले तेव्हा असमाधानी शेतकरी तिकडे स्थलांतर करू शकले असते. पण सर्फ पद्धतीमुळे ते जमिनीशी बांधले गेले होते. त्यांची पिळवणूक करणारे जमीनदार त्यांच्या संस्कृतीबद्दल अज्ञानी होते व बरेचसे त्यांची भाषाही बोलायचे नाहीत. रशियातील बहुतेक उच्चशिक्षितही पश्चिम युरोपच्या उदारमतवादी वातावरणात शिकलेले होते. त्यांच्या आकांक्षा ‘लोकशाही सुधारणा’ व ‘उदारमतवादाचा प्रसार’ या होत्या. मध्यमवर्ग जरी लोकसंख्येच्या मानाने फार नसला तरी त्यांची संख्या दुर्लक्षणीय नव्हती व त्यांनाही लोकशाहीची आस होती. पण जी सरंजामशाही होती ती अठराव्या शतकातील राजेशाही व्यवस्था २०व्या शतकात तशीच ठेवू इच्छित होती.
झार निकोलस वयाच्या २६व्या वर्षी राज्यावर आला. लेखकाने जागोजागी त्याचे वर्णन केले आहे त्यावरून तो संशयी, गोंधळलेला व एकटा वाटतो. तो उदारमतवादी मुत्सद्दय़ांचे सल्ले घेत असे, पण शेवटी स्वतला हवे तेच करायचा. त्यामुळे त्याच्या भोवताली असलेल्या लोकांनाही तो बेभरवशाचा वाटायचा. आपले व आपल्या सामान्य प्रजेचे एक विशेष नाते आहे, असे त्याला वाटायचे. ते नाते केव्हा तुटले ते त्याला कळलेच नाही. लेखकाचे मत आहे की, रशिया कसा महान बनेल याचा त्याला ध्यास होता व प्रजेचे हितच त्याला हवे होते. परंतु महानतेचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. या तिन्ही वर्गाच्या अपेक्षा एकमेकांच्यात मेळ घालू शकत नव्हत्या. तर झार कधी सुधारणा करतो म्हणायचा तर कधी परत माघार घ्यायचा. लेखकाच्या मते रासपुतीनला पाश्चिमात्य लोकांनी अवास्तव महत्त्व दिले. झारच्या धोरणांवर त्याचा अजिबात प्रभाव नव्हता. हा मुद्दा विवादास्पद आहे. शेतकरी, मध्यमवर्ग व उच्चवर्ग यात पडत गेलेले अंतर, याची जबरदस्त किंमत १९१७ साली रशियाला चुकवावी लागली. असा पुस्तकाचा एकंदरीत सूर आहे. आधी म्हटले त्याप्रमाणे, त्या वेळचे आंतरराष्ट्रीय संबंध, तेही रशियाच्या बाजूने, समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. पण रशियाचा इतिहास समजून घ्यायला पुरेसे नाही. अर्थात इतिहासाला समजून घेण्यास एकमेव असे पुस्तक नसतेच.

वासंती दामले
ईमेल : vasantidamle@hotmail.com
लेखिका मुंबई विद्यापीठातून इतिहासाच्या प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या असून रशियन व पूर्व युरोपीय इतिहास हा त्यांचा अभ्यासविषय आहे.

 

‘ टुवर्डस् द फ्लेम- एम्पायर, वॉर अ‍ॅण्ड द एण्ड ऑफ झारिस्ट रशिया’
लेखक : डॉमिनिक लायविन
प्रकाशक : अ‍ॅलन लेन
पृष्ठे : ४२९, किंमत : १४९९ रु.