जॉन अपडाइकचा चरित्रवेध घेणारं हे नवं पुस्तक, अपडाइकच्या कथा-कादंबऱ्या वाचलेल्यांना लेखक जवळून पाहण्याचा आनंद देईल.. पण समजा अपडाइकचं काहीच वाचलं नसेल, तरी एका लेखकाचं घडणं, लेखक असण्यामुळे होणारा त्रास याबद्दल या चरित्रातून समजेल. अपडाइक विकारी नव्हता, नेमस्त होता. त्याचं आयुष्य अचाट-भन्नाट नव्हतं.. तरीही ते आयुष्य त्यानं कथा-कादंबऱ्यांतून कसं टिपलं, हेच वाचण्यात मौज आहे..

जॉन अपडाइकबद्दलच्या कुठल्याही लेखात दोन विशेषणे त्याच्याबद्दल नेहमी सापडतात. ती म्हणजे- प्रोलिफिक (बहुप्रसव) आणि एरिडय़ूएट (व्यासंगी). याचे कारण अपडाइक हा केवळ प्रतिभावंत लेखक नव्हता, तर विलक्षण वाचक आणि अभ्यासकही होता. त्याने केलेल्या ग्रंथपरीक्षणामध्ये ‘फॉउलर्स मॉडर्न इंग्लिश युजेस’ आणि बायबलचे नवे भाषांतर आहे. शिवाय जगभरचे लेखक आहेतच.

वयाच्या बाराव्या वर्षी त्याने न्यूयॉर्कर वाचायला सुरुवात केली. शाळा-कॉलेजमध्ये असताना त्याने अडीचशे लेख, कथा इत्यादी मासिकांत लिहिले होते. शिलिंग्टन या पेन्सिल्वेनियामधील शहरात तो मोठा झाला. तिथेच त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर हॉर्वर्ड विद्यापीठात त्याने इंग्रजी वाङ्मयाचा अभ्यास केला. हे सारे शिक्षण शिष्यवृत्तीवर झाले. तिथेच परदेशी अभ्यास करण्यासाठीची शिष्यवृत्ती मिळाल्यावर तो ऑक्सफर्डला गेला आणि तेथील रस्किन विद्यापीठात त्याने चित्रकलेचा अभ्यास सुरू केला, कारण त्याला व्यंगचित्रकार व्हायचे होते, वॉल्ट डिस्ने त्याचा आदर्श होता. त्याच सुमारास त्याने लग्नही केले आणि त्याच वेळेस न्यूयॉर्कर त्याच्या कथा प्रसिद्ध करीत होते.

त्याच्या सुरुवातीच्या तीन कथांसाठी न्यूयॉर्करने ४००, ३५०, ३०० म्हणजे जवळपास १०५० डॉलर्स इतके मानधन दिले. त्या वेळी त्याच्या शिक्षक असलेल्या वडिलांचा वार्षिक पगार होता १२०० डॉलर्स. त्याने लेखक व्हायचे ठरवले त्याला हीसुद्धा गोष्ट कारणीभूत ठरली आणि त्याच्या आईला लेखिका व्हायचे होते, पण ती होऊ  शकली नाही, हीदेखील. (नेमाडे म्हणतात तसे) लेखकांचे काहीच वाया जात नाही, त्याप्रमाणेच चित्रकलेच्या शिक्षणाने अत्यंत चित्रमय आणि समृद्ध शैली त्याने विकसित केली जी त्याचे वैशिष्टय़ ठरली.

न्यूयॉर्करची संपादिका कॅथेरिन व्हाइट हिने सुरुवातीला आणि नंतर विल्यम मॅक्सवेलसारख्यांनी त्याच्या कथा संपादित केल्या. उभ्या आयुष्यात त्याने जवळपास दोनशेहून अधिक कथा आणि इतर तीसेक कादंबऱ्या लिहिल्या, ज्यात रॅबिट आर्मस्ट्राँग या नायकाला घेऊन कादंबरी चतुष्टयही आहे. अथकपणे तो लिहीत असे. दोन लग्ने, चार मुले असा संसार आणि जवळपास नियमित वाचन-लेखन करणारा मध्यमवर्गीय-उच्च मध्यमवर्गीय आयुष्य जगणारा हा लेखक खरा कसा होता हे कळण्यासाठी त्याचे चरित्र वाचायला हवे. प्रचंड अभ्यास करून लिहिलेले हे चरित्र आहे. बहुतेक अमेरिकन चरित्रे जी प्रसिद्ध होतात, त्यात चरित्रनायकाच्या संबंधित प्रत्येक गोष्टीचा हवाला दिलेला असतो. परिणामी परिशिष्टातील संदर्भाची यादीच भली मोठी होते. या पुस्तकात ती सत्तर पानांत पसरलेली आहे.

अत्यंत मेहनतीने लिहिलेल्या या पुस्तकात एका लेखकाचा प्रवास कसा होतो हे आहेच, शिवाय त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या गोष्टी म्हणजे अगदी विवाहबाह्य़ संबंधांची कथादेखील यात येतेच; पण त्याहून अधिक काही यात आहे. एक माणूस स्वत:च्या नेमस्त अशा व्यक्तिगत आयुष्यातूनही इतका साहित्यिक ऐवज कसा बाहेर काढू शकतो आणि त्याला साहित्याचे रूप कसे देऊ  शकतो हे प्रामुख्याने या पुस्तकातून लक्षात येते. चरित्रलेखक अ‍ॅडम बिगले याचे वडील जॉनचे मित्र होते. कॉलेजात ते दोघे एकत्र होते, परिणामी अगदी पाळण्यात असल्यापासून लेखकाची जॉन अपडाइकशी ओळख होती. प्रस्तावनेत त्याने ते लिहिले आहेच. जॉन अपडाइकच्या सर्व लेखनटप्प्यांचा त्याने वेध घेतलेला आहे. एक म्हणजे तेरा-चौदाव्या वर्षी ऐंशी एकरच्या शेतजमिनीवर काढलेल्या एकटेपणाच्या काळापासून ते लग्न, न्यूयॉर्करमध्ये काही काळ नोकरी, नियमित लेखन यासंबंधींची माहिती आली आहे. याच काळात तो उदयोन्मुख कथालेखक म्हणून पुढे आला. या संदर्भात कॅथेरिन व्हाइट आणि नंतर विल्यम मॅक्सवेल या दोन संपादकांनी त्याच्या कथेची कशी पाठराखण केली, त्याच्या लेखनात कसे बदल सुचवले आणि लेखक म्हणून त्याला विकसित व्हायला याची मदत कशी झाली हे फार सुंदररीत्या पुस्तकात आलेले आहे. वैवाहिक जीवनाचा काळ आणि कादंबरी लेखन याबद्दलचे तपशील पुस्तकात बरेच आहेत. ‘ऑलिंजर स्टोरीज’ हा जॉन अपडाइकचा सुरुवातीच्या काळातला, पण महत्त्वाचा लघुकथासंग्रह. तो स्वत: पेन्सिल्वेनियामधल्या शिलिंग्टनमध्ये वाढला. शिलिंग्टनला समांतर ऑलिंजर असे नाव त्याने कथानायकासाठी घेतले. या कथांमधील सुरुवातीच्या कथेत नायक दहा वर्षांचा आहे, नंतर तो हळूहळू मोठा होत जातो. कॉलेजात जातो. तिथे भेटलेले मित्रमैत्रिणी आणि इतर गोष्टी त्याच्या कथांमध्ये येतात. ‘हॅप्पिएस्ट आय हॅव बीन’ ही त्याची गाजलेली कथा त्याच काळातली. या कथेबद्दल कोणी तरी लिहिले आहे, की या कथेचा मुद्दा काय आहे ते कळत नाही. तेव्हा अपडाइकने त्याला उत्तर देताना म्हटले, की ‘पॉइंट इज गेट रीअवॉर्डेड एक्सपेक्टेड.’ पण म्हणून त्याच्या साऱ्या कथा ओंजळीत आनंदाचे क्षण येतात हे दाखवणाऱ्या आहेत असेही नाही. ज्याला ‘कमिंग ऑफ एज’ असे म्हणतात तो काळ जे. डी. सालिंजरच्या ‘कॅचर इन द राय’ने चित्रित केला होता. त्यातला सालिंजरचा सिनेसिझम टाळून पौगंडावस्थेत येणारे अनेक अनुभव, अनेक गोष्टी अपडाइकच्या कथांमध्ये आल्या आहेत. या सगळ्या कथांमध्ये एक सूत्र आहे. नंतरच्या कथा या अपडाइकच्या आयुष्यावर बेतलेल्या असल्या तरी त्यामध्ये विविध प्रकार आहेत. सुख-दु:खांच्या कथांबरोबरच काव्यमय शैली लिहिलेली कथा असेल किंवा बेक हा नायक घेऊन जगभरातील त्याचे प्रमाण दाखवणे, यांसारख्या कथा असतील किंवा मेपल्स नावाचे दाम्पत्य घेऊन त्याने बऱ्याच कथा लिहिल्या. चार मुले असलेले हे दाम्पत्य परस्परांपासून वेगळे होताना ते मुलांना ही गोष्ट हळूहळू सांगायचे ठरवतात. त्यावरची ‘सेपरेटिंग’ ही कथा त्याने लिहिली. पॉलीन कीलसारख्या समीक्षिकेने एके ठिकाणी म्हटले आहे, की लघुकथा ही सिनेमासाठी नेहमीच चांगली असते आणि सेपरेटिंगसारखी कथा ही त्याचे उत्तम उदाहरण आहे. तर हे करीत असतानाच पुस्तकांची परीक्षणे, निबंध लेखन, कविता असे सगळेच वाङ्मय प्रकार त्याने हाताळले आहेत.

अपडाइकबद्दल समीक्षक लिहिताना नेहमीच असे म्हणत असतात, की तो विद्वान आहे, त्याची भाषाशैली अप्रतिम आहे, पण तरीही या कथा किंवा कादंबऱ्यांनी कधी उत्तुंग उंची गाठली नाही. अपडाइक चांगला लेखक आहे, पण तो ‘ग्रेट’ लेखक नाही असे समीक्षक बऱ्याचदा लिहीत. परंतु अपडाइकच्याच नव्हे, तर न्यूयॉर्करमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या साऱ्याच कथा या विशिष्ट प्रकारच्या असतात. त्यांच्यावर शहरी-मध्यमवर्गीय असल्याचा एक आरोप होता.

अपडाइक एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडला हे तिच्या नवऱ्याला कळले, ते टेलिफोनच्या बिलांवरून आणि एक दिवस त्याने तातडीने अपडाइक पती-पत्नीला सांगावा धाडला. एखाद्या कादंबरीत घडावी अशी ही घटना. चरित्रकार मात्र विलक्षण ‘डीटॅच’ होऊन ती मांडतो. या घटनेत त्या स्त्रीच्या नवऱ्याने अपडाइकला सांगितले, की तू आणि माझ्या बायकोने लग्न करावे आणि आधीच्या बायकोपासून घटस्फोट घ्यावा. अपडाइकने याला मान्यता दिली. इतकेच नव्हे तर त्या नवऱ्याने आपला वकीलही अपडाइकच्या पत्नीच्या मदतीसाठी देऊ  केला. पण नंतर अपडाइकचे मन पालटले. कारण त्याला चार मुले होती. त्यावर त्या स्त्रीच्या नवऱ्याने आणखी एक उपाय सुचवला, तो म्हणजे अपडाइक पती-पत्नीने काही काळ दूर जावे. त्यामुळे ते इटली आणि फ्रान्सच्या प्रवासाला गेले; पण काही काळाने अपडाइकचा घटस्फोट झाला. हा सगळा काळ अपडाइकने लिहिलेल्या मेपल्स दाम्पत्याच्या कथेत कसा परावर्तित होतो, हे पाहणे विलक्षण आहे.

नंतर बऱ्याच काळानंतर तो वेगळा झाला. घटस्फोटानंतर अपडाइकने काढलेला एकटेपणाचा चरचरीत काळ आणि तो दाखवणाऱ्या कथा अशी सांगडही चरित्रकार घालतो. परिणामी असे होते की, पूर्ण पुस्तकभर अपडाइक हा माणूस म्हणून आपल्याला दिसण्यापेक्षा अपडाइकच्या जीवनाचे तपशील आणि कथा-कादंबरीतले त्याचे धागेदोरे शोधणे असाच प्रवास आपण वाचक म्हणूनही करीत राहतो. अपडाइक अनेकदा ज्या कथा लिहायचा त्या मध्यमवर्गीय असत इतकेच नव्हे, तर अनेकदा अपडाइकचा नायक हा न्यूयॉर्करचा वाचक असायचा, अशी टीका लेखक करतो. एके ठिकाणी त्याने म्हटलेय, ‘‘त्याच्या एका कथेत नायिका जेवणानंतर पॅरिस रिव्ह्य़ू वाचत असते. अपडाइक कथा न्यूयॉर्करला पाठवणार नसता तर त्या ठिकाणी न्यूयॉर्कर साप्ताहिक असले असते.’’ साप्ताहिक म्हणून न्यूयॉर्करचे काही सामथ्र्य आणि काही मर्यादा होत्या. बहुतेक मोठय़ा, अगदी नोबेलविजेत्या लेखकांनाही न्यूयॉर्करने प्रसिद्धीस आणले, घडवले आहे. शिवाय नॉन-फिक्शन म्हणजे वृत्तांतवजा लेखनामध्ये न्यूयॉर्कर नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. हिरोशिमावरचा पूर्ण अंक भरून लेख, हना र्आदतची न्यूरेम्बर्ग खटला वृत्तांत, सायलेंट स्प्रिंगची क्रमश: मालिका अशा वृत्तांतांसाठी न्यूयॉर्कर प्रसिद्ध आहे. याच न्यूयॉर्करमध्ये अपडाइकने अठरा महिने काम केले. या अठरा महिन्यांच्या काळात छोटे-मोठे लेख, न्यूयॉर्करच्या सुरुवातीला असणारे लेख, टिपणे लिहिणे आणि हे करता करता त्याने कसे कादंबरी लेखन केले याविषयी या पुस्तकात वाचायला मिळते.

अपडाइकने ‘होम’ नावाची अडीचशे पानाची एक पूर्ण कादंबरी लिहिली, पण ती छापायला दिली नाही किंवा तो गोल्फ आणि पोकर खेळत असे, अशांसारखे अनेक चरित्रात्मक तपशील आपल्याला येथे समजतात. अपडाइकचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तो सरळ लिहीत असे. त्याला लिहिण्यात कधी अडचण आलेली नाही. ठरवल्याप्रमाणे तो रोज किमान तीन पाने लिहायचाच. त्याच्या एक सहकाऱ्याने म्हटले आहे की, ‘मी अकरा वाजता कामावर जायचो आणि अपडाइक साडेदहाला आलेला असायचा. तो माझ्या शेजारच्या केबिनमध्ये बसायचा आणि दिवसभर त्याच्या टाइपरायटरची धडधड ऐकू यायची, अगदी संध्याकाळी निघतानाही. याप्रमाणे अथकपणे अपडाइक लिहीत असे.’

अपडाइकने आयुष्यात केलेला सगळा पत्रव्यवहार आणि कादंबऱ्यांचे ड्राफ्ट हे सारे त्याने विद्यापीठाला दिले. विद्यापीठाने त्याच्या शेवटच्या काळात ३० लाख डॉलर्सला ते विकत घेतले. परिमाणी चरित्रकाराला खूप मोठा ऐवज आपोआप उपलब्ध झाला, पण त्याचबरोबर अपडाइकचे मित्र, शाळेतले सोबती, त्याचे संपादक, त्याची पत्नी-मुले, न्यूयॉर्करचे संपादक अशा साऱ्यांना भेटून त्याने खूपच चरित्रात्मक सामग्री जमवली आहे. अपडाइकचे लेखन वाचलेल्यांना यातून पुन:प्रत्ययाचा आनंद मिळेल. अपडाइकचे काहीच न वाचलेल्यांना कदाचित एक लेखक कसा घडतो आणि भौतिक सुखसमृद्धी लाभली तरी लेखक असणे किती त्रासाचे असते हे त्यातून कळू शकेल.

पुस्तकात साहित्याशी केंद्रीभूत वाद येतातच. कादंबरी सारे काही सांगते, तर कथा एकच गोष्ट पण ती तीव्रतेने सांगते, अशी कथेची व्याख्याही यात येते. न्यूयॉर्करची कथा ठोकताळय़ांवर घासलेली (टिपिकल) असते का, हा वाद अमेरिकन नियतकालिकांतून बऱ्याचदा केला गेलेला आहे. त्याचे उत्तर देताना विल्यम मॅक्सवेल या न्यूयॉर्करच्या संपादकाने सांगितले, ‘सर्वसाधारणपणे कथा हा वाङ्मय प्रकार परिच्छेदानुसार पुढे सरकतो. न्यूयॉर्करची कथा मात्र ओळीओळीने विकसित होत जाते.’ आतापर्यंतच्या कथा आणि न्यूयॉर्करमधील कथा यात फरक काय हे सांगताना त्याने हे म्हणणे मांडले. तो स्वत: उत्तम कथालेखक आणि कादंबरीकार होता. मॅक्सवेलच्या आधी कॅथरीन व्हाइट व नंतर तिचा मुलगा रॉजर अँजेल असे तीन संपादक अपडाइकला लाभले. सुरुवातीला त्याने संपादकाच्या मतानुसार काही फरक केलेही असतील, पण नंतर नंतर – रॉजर अँजेलने असे लिहिले आहे की, ‘अपडाइकच्या कॉपीमध्ये फारसा बदल करायला वाव नसतो.’ अपडाइकबद्दल आणखी एक गोष्ट अशी सांगता येईल, जे या पुस्तकाच्या प्रस्तावनेत चरित्रकाराने म्हटले आहे, की लेखकासाठी चांगले असणे हे काही सुखावह नसते; किंबहुना जगभरात विकारी व्यक्ती हे उत्तम लेखक होते. विकारी मंडळी खूप चांगले लिहितात. दोस्तोवस्कीपासून अ‍ॅलन गिन्सबर्गपर्यंत त्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. पण अपडाइकमध्ये असा कुठलाही लेखकीय विकारीपणा नव्हता. त्या अर्थाने तो नेमस्त होता. त्याचाच समकालीन जॉन चीव्हर. पण त्याच्यात प्रचंड प्रमाणात दारू पिणे, दारू पिऊन धिंगाणा करणे, भांडणे, मारामाऱ्या करणे इथपासून ते काही वर्षे सुखी वैवाहिक आयुष्य तर काही वर्षांतच अचानक समलिंगीपणाकडे वळणे अशा साऱ्या गोष्टी आढळतात. चीव्हर अपडाइकला बराचसा ज्येष्ठ होता आणि अपडाइकने त्याचे कौतुक खूपदा केले आहे; किंबहुना चरित्रकाराला जेव्हा पहिल्यांदा अपडाइक भेटला तेव्हा कोणी तरी त्याला विचारले की, एक माणूस वेगवेगळ्या स्विमिंग पूलला भेट देत जातो ही कथा तुमची का? तेव्हा अपडाइक हसत म्हणतो, ‘‘ती लिहिणे मला जमले असते तर मला खूप अभिमान वाटला असता, पण ती जॉन चीव्हरची कथा आहे.’’ आश्चर्य म्हणजे अपडाइकने लिहिलेला शेवटचा लेख हा जॉन चीव्हरच्या चरित्रावरचा होता. चीव्हरसारख्या लेखकाने लक्षात राहाव्यात अशा ‘इनॉर्मस रेडिओ’ किंवा ‘गुड बाय माय ब्रदर’सारख्या कथा लिहिल्या, पण तो कादंबरी लिहू शकला नाही. अपडाइकने चक्क कादंबरी चतुष्टय़ लिहिले. तरीही त्याच्यामध्ये उत्तुंगतेचा अभाव हा जाणवतच राहतो. हेरॉल्ड ब्लूमसारख्या समीक्षकाने त्याचे वर्णन ‘उंची नसलेल्या कादंबऱ्या विलक्षण शैलीत लिहिणारा कादंबरीकार’ असे केले आहे. त्यामुळेच त्याला कायमच बहुप्रसव हे विशेषण लावण्यात आले. मात्र ‘जीनियस’ हे विशेषण आणि नोबेल पुरस्कार या दोन्हींपासून तो कायम वंचित राहिला.

 

शशिकांत सावंत

shashibooks@gmail.com