मराठीत सात सक्कं त्रेचाळीसही प्रयोगशील कादंबरी लिहिणारे किरण नगरकर पुढे इंग्रजीत रुळले. त्यांच्या इंग्रजी कादंबऱ्यांची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. मराठी इंग्रजी अशा दोन्ही भाषांतील साहित्य व्यवहाराचा अनुभव असणाऱ्या नगरकरांनी अलीकडेच मुंबईत झालेल्या टाटा साहित्य महोत्सवा द्वैभाषिक लेखकांसमोरच्या आव्हानांविषयी चिंतन मांडलं. त्याचा हा संपादित अंश..

मी माझं पहिलं पुस्तक मराठीत का लिहिलं, असा प्रश्न मला नेहमीच विचारला जातो. खरं सांगायचं तर, मलाही त्याची पूर्ण कल्पना नाही! पुढे मी इंग्रजीत लेखन केलं, पण हे लेखन मी कमावलेल्या इंग्रजी भाषेतून केलेलं आहे. माझं प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमात झालेलं असलं तरी पाचवीपासून पुढे पदव्युत्तर शिक्षण हे इंग्रजीत झालेलं आहे. त्यामुळे यात जी इंग्रजी भाषा शिकलो त्यातून ते लेखन झालं आहे. आता ‘सात सक्कं त्रेचाळीस’बद्दल.. तर एका रात्री मी दिलीप चित्रेंच्या घरी गेलो होतो. दिलीपचे वडील ‘अभिरुची’ नावाचे साहित्यविषयक नियतकालिक चालवत होते. ‘अभिरुची’च्या अंकासाठी एका कथेची मागणी चित्रेंनी माझ्याकडे केली. तिथून मी घरी परत आलो आणि एक लघुकथाच लिहायला घेतली! त्या रात्री ही मराठीतील कथा मी लिहून पूर्ण केली. ती ‘अभिरुची’त छापूनही आली; पण काय झालं माहीत नाही, ही कथा लिहिल्यानंतरच्या दुसऱ्याच रात्री मी कादंबरी लिहायला घेतली – ‘सात सक्कं त्रेचाळीस’. तिच्या कथानकाबद्दल माझ्या मनात आधी काहीच ठरलेलं नव्हतं. अकस्मात लिहायला सुरुवात झाली. कदाचित ‘अभिरुची’साठी लिहिलेल्या कथेचा पुढचा भाग म्हणूनही ही कादंबरी सुचली असावी.

माझे गुरू रा. भा. पाटणकर हे एकदा मला म्हणाले होते की, कोणतीही भाषा तितकीच समृद्ध होऊ शकते, जितकी तुम्ही तिला कराल. या वाक्याचा माझ्या मनावर खूप प्रभाव आहे. मी ‘सात सक्कं..’मध्ये वापरलेली मराठी ही मराठी वाचकांना माहीत असलेल्या मराठीपेक्षा निराळी होती. याविषयी जयवंत दळवींची प्रतिक्रिया आठवते.. त्यांना कोणी तरी या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाविषयी विचारले, तर ते म्हणाले की, आधी ती मराठीत अनुवादित व्हायला हवी म्हणून! पण त्या वेळी ‘मौज’ने ही कादंबरी प्रकाशित केली, १९७४ च्या डिसेंबरमध्ये. त्याच वेळी मी ‘बेडटाइम स्टोरी’ हे नाटक लिहीत होतो. तो आणीबाणीचा काळ होता. डॉ. लागूंच्या घरी या नाटकाचे वाचन आम्ही केले. त्या वेळी ‘मौज’चे भागवतही उपस्थित होते. या नाटकात मी महाभारतातील भीष्म पितामह यांच्यावर लिहिलं होतं. या पात्राबद्दल माझं काही म्हणणं होतं. द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी असो किंवा कौरव-पांडव युद्धासाठी परस्परांसमोर उभे ठाकले तेव्हाही भीष्म काहीच बोलले नाहीत. कौरवांनी ते करू नये, हे ते त्यांना सांगू शकले नाहीत. हे सर्व मी ‘ककल्ड’मध्येही पुन्हा थोडय़ा वेगळ्या संदर्भात वापरलं आहे; पण ‘बेडटाइम स्टोरी’चे प्रयोगही होऊ दिले नाहीत.

‘रावण अ‍ॅण्ड एडी’ या इंग्रजी कादंबरीची पहिली सत्तर पानं मी सुरुवातीला मराठीत लिहिली होती; पण पुढे ते पूर्णत्वाला गेलं नाही. याचं कारण म्हणजे, मला मराठीत वाचकच नव्हते.. महाराष्ट्रीय माणसाला पुस्तक विकत घेण्याची सवयच नाही. आम्हाला पुस्तकं भेट मिळालेली चालतात. त्यासाठी इतरांनी ती खरेदी करावी, पण आम्ही स्वत: खरेदी करत नाही. इंग्रजी लेखकांना जसा राष्ट्रीय स्तरावर व्यापक वाचकवर्ग मिळतो, तसा भारतीय भाषांमध्ये लिहिणाऱ्या लेखकांना मिळत नाही. ‘ककल्ड’ या माझ्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे तिच्याकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं. भाषालेखकांच्या पुस्तकांना असा वाचक वर्ग मिळत नाही.

२००२ साली भारत सरकारने भारतीय भाषांमध्ये लिहिणाऱ्या लेखकांची एक परिषद आयोजित केली होती. त्यात अनेक भाषालेखक सहभागी झाले होते. त्या परिषदेतील बहुतेक भाषालेखकांचं म्हणणं असं होतं की, इंग्रजीतून लिहिणाऱ्या भारतीयांचे साहित्य अस्सल नसते. ते केवळ ‘मार्केट’समोर ठेवून लिहिले जाते.. त्या वेळी अ‍ॅलन सिली तिथे होते. त्यांनी एक प्रश्न सर्वाना विचारला की, मी अँग्लो-इंडियन आहे. माझी मातृभाषा इंग्रजी आहे. तर माझ्यासारखे आयुष्य असणाऱ्यांनी काय करावे?.. त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर तिथे कोणालाही देता आले नाही. हाच प्रश्न मला मराठीच्या बाबतीत विचारावासा वाटतो. दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, विलास सारंग आणि मी- आम्ही चौघेही द्वैभाषिक लेखक. आम्ही जेव्हा मराठीत लिहितो तेव्हा आमचे साहित्य अस्सल आणि इंग्रजीत लिहिले की ते अस्सल नसते, असे काही आहे का? याउलट सलमान रश्दींसारखे लेखक इंग्रजीतच खरे साहित्य असल्याचे सांगतात. मला रश्दींना विचारावासे वाटते की, तुम्ही एका तरी भारतीय भाषेतील साहित्य वाचले आहे का? कशाच्या आधारावर हे ठरवले जाते? आपल्याकडचे प्रादेशिक पक्षांचे राजकारणी मराठीबद्दल बोलत असतात, पण त्यांची मुले मात्र इंग्रजी माध्यमात शिकतात. इंग्रजीतून शिक्षण घ्यायला काही हरकत नाही; पण इतर भारतीय भाषांबद्दल त्यांची भूमिका काय आहे? तरुण पिढीने दोन भाषांमध्ये लिहायला काय हरकत आहे? आपल्याला तीन-चार भाषा का येऊ नयेत? याचा अर्थ प्रत्येकाने आपल्या भाषेकडे परत जावे असेही नाही. तर खरी गरज आहे ती, आपल्याला माहीत असणाऱ्या भाषांवर प्रेम करण्याची!