माणूस असण्याचा नेमका अर्थ आधी परमेश्वर, धर्म, प्रेषित, गुरू, पंथ अशा धारणांवर आधारित होता. औद्योगिक क्रांतीनंतर माणसाच्या आयुष्यावरची ही बाह्य़स्रोतांची हुकमत सैल होऊन ती व्यक्ती या अंत:स्रोताकडे आली. आणि आता नव्या तंत्रधर्मामुळे पुन्हा ती हुकमत संगणकासारख्या बाह्य़स्रोताकडे जाते आहे.. माणूसपणाचा अर्थ शोधण्याच्या मानवी धडपडीच्या या तीन टप्प्यांबद्दल होमो डय़ीउसया पुस्तकात युवाल हरारी यांनी केलेल्या विवेचनाविषयी..

‘होमो डय़ीउस’ या पुस्तकाच्या शेवटच्या भागात विविध प्रकाराच्या डेटाप्रणाली, डेटा आणि त्याच्या विश्लेषणावर आधारित निरनिराळ्या शक्यतांचा विचार करताना हरारी त्या प्रणालीचा संदर्भ माहितीशी लावतात. साम्यवादाच्या वेळात रशियाच्या निरनिराळ्या भागांत लोक काय खातात, तिथे पीक-पाण्याची काय अवस्था आहे, किती अवजारांचे उत्पादन करायला पाहिजे, लोक कुठली कुठली पुस्तके वाचतात या आणि अशा इतर अनेक माहितींवर साम्यवादाच्या कार्यप्रणालीची दिशा ठरायची. रशियातल्या सर्व भागांतली सर्व प्रकारची माहिती मिळवून त्यानुसार पॉलिट ब्युरो आपले निर्णय घ्यायचा. माहिती विस्फोटानंतर अलीकडे माणसे काय खातात, कुठली पुस्तके वाचतात, कुठली गाणी ऐकतात किंवा त्यांच्या असंख्य आवडीनिवडी या फेसबुक, अ‍ॅपल, गुगल यांसारख्या कंपन्यांच्या मालकीच्या असलेल्या निरनिराळ्या अल्गोरीदम्सला जोडलेल्या आहेत. हा डेटा इतका प्रचंड मोठा आहे, की त्याचा वापर करून माणसाला व्यक्तिगत आनंद देता येईल अशी किती तरी अ‍ॅप्स आणि यंत्रे बनवून त्याद्वारे व्यक्तींची करमणूक, मानसिक गरजा आणि इतर  किती तरी लहानसहान प्रश्न सोडविले जाऊ शकतात. एका व्यापक अर्थाने, तंत्रधर्मातले संगणक आणि अल्गोरीदम्स हे नवे पॉलिट ब्युरो आहेत, असे म्हटले जाऊ शकते. अर्थात, तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर जगाची आजची परिस्थिती ही शंभर वर्षांपूर्वी उदयास आलेल्या साम्यवादापेक्षा बरीच वेगळी आहे. संकलित राष्ट्रीय माहितीवर काही काळ प्रगती करू शकलेला आणि तग धरून राहिलेल्या रशियात माहितीचे प्रमाण जसजसे वाढू लागले तसे या प्रचंड माहितीचे प्रशासकीय निर्णयांत बदल करताना लहानमोठय़ा चुका होऊ लागल्या. माहितीचा एकूण आवाका वाढला, परंतु त्या वेगाने आणि अनुरूपतेने निर्णय न घेता आल्याने रशियात एका काळानंतर डेटासंबंधी काम करणे अशक्यप्राय होऊन बसले आणि सोव्हिएत संघराज्याचे पतन सुरू झाले. आधुनिक तंत्रधर्मामध्ये डेटा, त्याचे विश्लेषण आणि संभाव्य निर्णय हे माणसाच्या अखत्यारीत नसून त्यासाठी पूर्णत: संगणकाचा वापर करण्यात येणार आहे. हे संगणक दमणार नाहीत, आकडेवारीत चुका करणार नाहीत आणि ते शक्याशक्यतेचे गणित माणसांपेक्षा जास्त वेगाने आणि अचूक निर्णायकी पद्धतीने देत असल्याने समाजव्यवस्थेच्या निर्णयप्रक्रियेत सर्वोच्च पातळीचे काम करू शकतील.

Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
कायद्याची पदवी, यूपीएससीसाठी सोडली सीएची नोकरी; जाणून घ्या IAS सोनल गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास
Whatsapp New Feature Search Messages by Date Marathi News
WhatsApp ने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आणले भन्नाट फीचर! चुटकीसरशी शोधता येतील कोणतेही चॅट्स!
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !

साम्यवादी काळात जमा झालेला डेटा हा समाजाधारित आणि एका सरसकट प्रक्रियेचा भाग होता. भांडवलशाहीत माहिती आणि डेटा संकलित करताना तो एकाच ठिकाणी जमा न होता वेगवेगळ्या ठिकाणी आणि स्वरूपांत जमा झाल्याने तो बहुविध आणि तपशीलवार होण्यास प्रचंड मदत झाली आहे. त्यामुळे जगासंबधी अद्ययावत आणि इत्थंभूत माहितीचे संगणकीकरण होणे भांडवलशाहीमुळेच शक्य झाले आहे, असे स्पष्टपणे हरारी मान्य करतात. आज अल्गोरीदम्सला माणसांविषयी जितकी माहिती आहे तितकी माहिती खुद्द माणसांनाही नाही, याशिवाय भांडवलवादातला डेटा हा विभाजित आणि वर्गीकृत असल्याने तो गेल्या पन्नास वर्षांत कमालीचा तपशीलवार आणि सामथ्र्यशालीही झाला आहे. जगातल्या अनेक व्यवहारांचे आणि प्रक्रियांचे संगणकीय यांत्रिकीकरण झाल्याने, या संगणकांनी बनविलेले निरनिराळे अल्गोरीदम हे अधिकाधिक हुशार होत चाललेले आहेत. पुरेसा डेटा आणि पुरेशी संगणकीय क्षमता असल्यास माणसांना माणसांपेक्षा अधिक चांगले जाणण्याची क्षमता अल्गोरीदम्समध्ये येऊ शकते. असे झाल्यास माणसांचे व्यक्तिगत आणि सामुदायिक निर्णय हे माणसे स्वत: न घेता त्यासाठी ते अल्गोरीदमवरती विसंबून राहू शकतात. असे झाल्यास माणसाचे स्वत:वरचे आणि समुदायावरचे नियंत्रण हे अल्गोरीदमच्या हातात जाऊ शकते, असा कुतूहलजन्य अथवा भीतीदायक निष्कर्ष हरारी मांडतात.

अल्गोरीदम्स नेमके कसे विकसित होते, हे सांगताना ‘अ‍ॅमेझॉन’ या जगप्रसिद्ध कंपनीच्या अल्गोरीदमसंदर्भात हरारी यांनी एक उदाहरण दिले आहे. अ‍ॅमेझॉनच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये पुस्तकाच्या पारंपरिक दुकानांप्रमाणे सर्वासाठी सर्व पुस्तके किंवा सर्वासाठी काही पुस्तके असे सरसकटीकरण करावे लागत नाही. वाचकाचे वय, देश, लिंग आणि त्याने अगोदर वाचलेल्या पुस्तकाची माहिती घेऊन अ‍ॅमेझॉनचे अल्गोरीदम प्रत्येक वाचकाला आवडेल असे संभाव्य पुस्तक सुचवू शकते आणि ते तुम्हाला व्यक्तिगतरीत्या आवडण्याची शक्यताही जास्त असते. अ‍ॅमेझॉनवरून विकत घेतलेले पुस्तक त्याच कंपनीने विकसित केलेल्या किंडल या साधनावर वाचत असताना तुम्ही एखादे पुस्तक कुठपर्यंत वाचले, कुठल्या परिच्छेदानंतर तुम्ही ते वाचायचे थांबविले किंवा बंद केले, पुस्तकाचा कुठला भाग तुम्ही परत वाचून काढला असे निरनिराळे डेटापॉइंटस अ‍ॅमेझॉनच्या अल्गोरीदमला पुरविले जाऊ शकतात, ज्यातून तुमच्या वाचण्याच्या आवडीनिवडींविषयी आणि सवयींविषयी अजून विस्तृत माहिती मिळवून अल्गोरीदम आणखी समर्थ होते. गोष्ट इथेच थांबत नाही. अनेक साधनांमध्ये आजकाल कॅमेरा लावलेला असतो. या कॅमेऱ्यांचा वापर करून, तुम्ही पुस्तक वाचत असताना कुठल्या प्रसंगाला तुमचे डोळे विस्फारले गेले, कुठला प्रसंग वाचताना तुमचा चेहरा भावुक झाला अशा स्वरूपाची माहिती गोळा करून ती अल्गोरीदमला पुरवली जाऊ शकते. याहूनही पुढच्या टप्प्यात एखाद्या संगणकीय चिपचे थेट तुमच्या शरीरात रोपण केल्यानंतर पुस्तक वाचताना प्रत्येक वाक्यागणिक तुमच्या हृदयाची स्पंदने, शरीराचे तापमान आणि तुमचा रक्तदाब कसा बदलत होता हे अ‍ॅमेझॉनच्या अल्गोरीदमला कळू शकते. पुस्तक वाचून संपवेपर्यंत तुम्ही त्यातला बराचसा तपशील विसरून गेलेले असाल, पण अ‍ॅमेझॉनच्या अल्गोरीदमने तुमच्याविषयी मिळवलेली माहिती विसरली जाणार नाही. इथे माणूस पुस्तक वाचत असताना ते पुस्तकही माणसाला वाचत असते, असे म्हणता येईल. माणसाला असे सविस्तर वाचणाऱ्या पराकोटीच्या स्मार्टनेसची ही शक्यता नजीकच्या भविष्यकाळातली असून अशाच प्रकारचे असंख्य अल्गोरीदम येत्या दहा वर्षांत वापरात आलेले असतील.

‘होमो डय़ीउस’ हे पुस्तक माहिती तंत्रज्ञान आणि जैविक तंत्रज्ञानात येऊ घातलेल्या विस्मयकारी शक्यतांबद्दल बोलत असताना दोन्ही क्षेत्रांचा एकत्रित विचारही करते. माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान ही क्षेत्रे समांतर राहिलेली नसून माहिती तंत्रज्ञानाचा जैव तंत्रज्ञानासोबतचा मिलाफ हा माणसाच्या पुढच्या सामर्थ्यांच्या महत्त्वाकांक्षांशी जोडला गेला आहे. गेल्या दोन दशकांत फक्त माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राशी निगडित असलेल्या किती तरी कंपन्या आता जैव तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करूलागल्या आहेत. कधीकाळी माणसे संगणकाला हॅक करीत असत, आता संगणक माणसाला हॅक करीत आहेत. जगातल्या एकूण एक माणसांसंबंधी शक्य होईल तितका व्यक्तिगत डेटा केंद्रीय संगणकांत जमा करण्याचे काम माहिती क्षेत्रातल्या कंपन्या करीत आहेत. समूहातल्या सर्व माणसांची इत्थंभूत माहिती एका केंद्रीय संगणकात असणे हे स्टॅलिन, लेनिन अथवा मार्क्‍सने व्यक्त केलेल्या शक्यतांच्याही खूप पुढच्या शक्यतांना जन्म देते. अल्गोरीदम आणि संगणकामुळे होणाऱ्या बदलांमुळे एका विशिष्ट वयाच्या पुढचे लोक व्यथित झालेले आहेत. वयाने आणि अनुभवाने मोठे झालेल्या अनेकांचे जग इतके झपाटय़ाने बदलते आहे, की या बदलांना नेमके कसे सामोरे जायचे आणि जगण्याच्या प्रक्रियेत कसे जिवंत राहायचे, असा कळीचा प्रश्न त्यांना पडतो आहे. तरुणांबाबत मात्र परिस्थिती नेमकी उलट आहे. वेगाने होत जाणारा प्रत्येक बदल हा तरुणाईला सुखावणारा असून हे बदल अजून वेगाने व्हावेत याबद्दल ही पिढी आग्रही आहे.

गेल्या शतकात झालेल्या वैज्ञानिक प्रगतीच्या एका निश्चित वेगाच्या टप्प्यात माणूस हा सर्व क्रांतींच्या मध्यभागी होता आणि त्याचे मानसशास्त्र, भावना, आपसांतला व्यवहार हा विज्ञानाच्या पूर्ण कह्य़ात कधीही गेलेला नव्हता. आपल्यासमोर असलेले असंख्य प्रश्न विज्ञान सोडवीत असताना थेट माणसाने माणूस असणे म्हणजे नेमके काय, हाच प्रश्न विचारला आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी मग अनेक माहिती तंत्रज्ञानातल्या कंपन्यांनी कंबर कसली. ज्या वेगाने संगणक ‘माणूस म्हणजे नेमके काय?’ हे समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, त्या वेगाने या प्रश्नाचे निर्णायक उत्तर मिळण्याच्या शक्यताही निर्माण होऊ लागल्या आहेत. असे झाल्यास ‘व्यक्ती’ आणि ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ या मूलभूत संकल्पनाच मोडीत निघतील. ‘व्यक्तिवादा’ची व्याख्याच जर अस्तित्वात राहणार नसेल, तर व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून जगभरातल्या प्रगतिवादी आणि परिवर्तनवादी संकल्पनांच्या मुळाशी असलेल्या ‘मानवतावाद’ या मूलभूत संकल्पनेचे अस्तित्वही मग धोक्यात येईल. औद्योगिक क्रांतीनंतर गेल्या काही शतकांपासून धर्माधारित वा देव या संकल्पनेपासून दूर जाऊन ‘व्यक्ती’ हे मूलभूत एकक मानत अनेक समाजरचना आणि व्यवस्था आकारात आलेल्या आहेत. या समाजरचना आणि व्यवस्थांमधून मानवतावाद वा माणुसकी वजा केल्यास, मागे उरलेल्या वातावरणाला काय म्हणायचे याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही, पण ही अवस्था चिंताजनक निश्चितच आहे.

माणसाच्या दोन लाख वर्षांच्या कालावधीत शेवटची काही हजार वर्षे ही माणसाला स्वत:बद्दल इत्थंभूत माहिती नसल्याने वैज्ञानिक ज्ञानाशिवाय नानाविध तत्त्वशाखांच्या तपशिलांवरही आधारित होती. माणूस असणे म्हणजे नेमके काय आणि व्यक्तीने नेमके कसे जगले पाहिजे, याचा अर्थ जगत्नियंता परमेश्वर, धर्म, प्रेषित, गुरू, पंथ या निरनिराळ्या केंद्रीभूत धारणांवर आधारित होता. माणसाच्या आयुष्यातले अनेक लहानमोठे निर्णय देण्याची अधिकारवाणी या धारणांमध्ये होती. औद्योगिक क्रांतीनंतर माणूस जसजसा स्वत:ला जास्त चांगल्या प्रकारे जाणून घ्यायला लागला तसतसा अधिकारवाणीचा हक्क हा देव वा धर्म यांच्यापासून विलग होऊन तो अधिकाधिक माणसाच्या हाती आला. गेली तीनशे-चारशे वर्षे माणसाच्या आयुष्यावरची हुकमत देव वा धर्म या बाह्य़स्रोतांपासून व्यक्ती या अंतर्गत स्रोतापर्यंत आली आणि आता अल्गोरीदम आणि तंत्राच्या साहाय्याने ही हुकमत पुन्हा बाह्य़स्रोतांकडे जाते आहे. अधिकारवाणी माणसाच्या हातात येण्यासाठी आधुनिक विज्ञानातल्या अनेक सिद्धांतांतला एक महत्त्वाचा आणि समजण्यास तसा बराच सोपा असा चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कारणीभूत आहे. या सिद्धांतात आत्म्याचे अस्तित्वच मान्य केलेले नाही. त्यामुळे आत्मा केंद्रस्थानी मानून निर्माण केल्या गेलेल्या अनेक धर्मसंकल्पना आणि ईश्वराधारित तत्त्वज्ञान हे डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताच्या नेहमी विरोधात राहिलेले आहेत. या विरोधाच्या पुढच्या टप्प्यात देव, धर्म वा आत्मा या संकल्पना जर पूर्णत: मोडीत निघणार असतील तर हजारो वर्षे ज्या दैवी आणि आध्यात्मिक धारणांवरती माणूस जगत आला आहे, त्या तर धोक्यात येतीलच; पण मानवतावाद ही त्यामानाने अलीकडची धारणाही धोक्यात येईल. याचे परिणाम पुन्हा चांगले होतील की वाईट याविषयी हरारी चिंता व्यक्त करतात.

राहुल बनसोडे

rahulbaba@gmail.com