जिल्हय़ात १६ हजार ६१ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी पुनर्निरीक्षणात ३ हजार २२९ जणांची नावे वगळण्यात आली. यातील काही नावे दोन वेळा यादीत आली होती, तर काही मतदारांचा मृत्यू झाल्याने यादीतून त्यांची नावे वगळण्यात आली आहेत. ४ हजार ६७५ मतदारांच्या नाव, लिंग, वय, आडनाव, पत्ता इत्यादी तपशिलात बदल केला असून, ४०२ मतदारांची नावे अन्य भागांत स्थलांतरित केली आहेत.

निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी सांगितले, की एकापेक्षा अधिक ठिकाणी नावे असलेल्या मतदारांच्या नोंदी कमी करण्यासाठी त्यांच्या छायाचित्रांची तुलना करून दुबार नावे वगळण्यात येत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयाद्यांच्या दुरुस्तीसाठी १७ त्रुटी तपासण्याची यादी देण्यात आली होती. त्यापैकी मतदारांचे नाव नसणे, घर नंबर नसणे, वडील किंवा पतीचे नाव नसणे, छायाचित्र नसणे, मतदारयादीत एकाच व्यक्तीचे दोन ‘इपिक आयडी’ क्रमांक असणे इत्यादी पाच त्रुटीच जालना जिल्हय़ात आढळून आल्या आहेत. मतदान केंद्र सुसूत्रीकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत गुगल अ‍ॅपवर नकाशे तसेच मतदान केंद्रांची छायाचित्रे अपलोड करण्यात आली आहेत. छायाचित्र तुलनेचे काम जिल्हय़ात शंभर टक्के पूर्ण झाले असून, यासंदर्भात संबंधितांना मतदान कें द्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जालना जिल्हय़ामध्ये होणार असलेल्या आगामी नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध प्रारूप मतदारयादी वापरण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०१७ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. गेल्या १६ सप्टेंबर रोजी सुरू झालेला हा कार्यक्रम १४ ऑक्टोबपर्यंत चालणार आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नवीन मतदार या काळात नोंदणी करू शकतील. त्याशिवाय नाव, लिंग, वय, आडनाव, पत्ता इत्यादी संदर्भातील दुरुस्तीही करू शकतील.