औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगांव तालुक्यातील घाटनांद्रा-पाचोरा रस्त्यावरील डोंगराच्या दरीत अल्पवयीन मुलीचे प्रेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मुलीची ओळख पटली असून मिना रामा राठोड (वय १६) असे तिचे नाव आहे. सोयगाव तालुक्यातील बनोटी पोलीसांत मुलगी हरवल्याची तक्रार तीच्या नातेवाईकांनी दिली होती. त्यांनतर पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांना घाटातील मृतदेह दाखवल्यानंतर त्याची ओळख पटली. या प्रकरणी नातेवाईकांनी हत्येचा संशय व्यक्त केला असून आरोपींना पकडल्याशिवाय मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारी मिना शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता घरी आल्यानंतर विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. नंतर ती घरी परतलीच नाही. त्यामुळे गावालगतच्या विहीरीत आणि नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला, मात्र ती सापडली नाही. शेवटी शनिवारी उशिरा पोलीसांत हरवल्याची तक्रार देण्यात आली.

घाटनांद्रा-पाचोरा रस्त्यावरील घाटात मुलीचे प्रेत पडलेले असल्याची माहिती एका गुराखी व्यक्तीने पोलीसांना दिली. प्रेत खोल दरीत १७० ते २०० फुट फेकण्यात आल्याने लवकर ओळख पटत नव्हती. घटनास्थळावर श्वाण पथकाव्दारे चौकशी करण्यात आली. या घटनेचा पोलीसांनी पंचनामा करून प्रेताची उत्तरीय तपासणी करण्यासाठी औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात पाठवले. याविषयी सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपी विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.