जगातील फुटबॉलप्रेमीसांठी पर्वणी असणाऱ्या फिफाच्या (फेडरेशन इंटरनॅशनल ऑफ फुटबॉल असोशिएशन) १७ वर्षांखालील विश्वचषकाचे यजमानपद यंदा भारताला मिळालं आहे. या स्पर्धेसाठी ‘फुटबॉल फिव्हर’ तयार व्हावा, यासाठी विधिमंडळापासून ते गावातील गल्ली बोळात सर्वत्र फुटबॉल खेळवला गेला. विशेष म्हणजे या फिव्हरमध्ये फुटबॉलला किक मारणाऱ्या एकाही खेळाडूला या खेळाविषयी आपुलकीची भावना नव्हती, असेच म्हणावे लागेल. कारण ज्याला या खेळाची माहिती नाही, त्याला आपुलकी असेलच कशी?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकीकडे फुटबॉलचा माहोल निर्माण केला जात असताना ज्यांच्यासाठी हा खेळ एक पॅशन आहे, त्या क्रीडा शिक्षकांसोबत ‘खेळ’ सुरु आहे. सरकारच्या धोरणाला कंटाळून अनेक उमद्या क्रीडा शिक्षकांनी मैदान सोडलं आहे. कसलाही पाया न घालता ऑलम्पिकमध्ये पदकांची लयलूट करण्याची स्वप्नं सरकारला पडत आहे. राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण पदकं मिळवलेल्या बीडच्या वर्षा कच्छव यांनी ७२ टक्के गुणांसह बीपीएड पूर्ण केलं. पण ज्या देशातील महिलांनी ऑलिम्पिक गाजवले त्याच देशात वर्षाचे खेळाच्या मैदानात उतरण्याच्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागली. क्रीडा क्षेत्राचे शिक्षण घेऊन नोकरी न मिळाल्यानं सध्या ती घरकामात रमली आहे. वर्षाचे वडील शेतकरी आहेत. तिचे पहिली ते सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण बीड जिल्हयातील आडस येथील आजोळीमध्ये झाले. ग्रामीण भागात खेळाचा उत्साह नसल्यामुळे तिला या काळात आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून देण्याची संधीच मिळाली नाही. पण माध्यमिक शिक्षणासाठी बीडच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयात दाखल होताच वर्षा खो-खो चॅम्पियन म्हणून ओळख निर्माण केली. इतर मैदानी खेळातही ती तरबेज होती.

इंदोरमधील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत निवड झाल्यानंतर तिने बारावीच्या बोर्डाची परीक्षा सोडून खेळाला प्राधान्य दिलं. सुवर्ण पदक मिळवून तिने आपला निर्णय योग्यही ठरवला. विद्यापीठातही तिने सुवर्ण वेध घेतला. परिस्थितीमुळे खेळातील प्रवास पूर्ण होणार नसल्यामुळे तिनं क्रीडा शिक्षक होण्याचा संकल्प केला. उत्तम गुणांनी ती पास झाली. मात्र बीपीएडचं शिक्षण पूर्ण केल्यानंतरही तिला नोकरी मिळाली नाही. ‘कष्टाचं चीज झालं नाही’ हे चार शब्द तिच्या मनातली घुसमट सांगून जातात.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात वसलेल्या कळेवाडीच्या प्रताप कळे याचा प्रवास वर्षापेक्षा वेगळा नाही. मनात खेळाची आवड आणि घरची हलाखीची परिस्थिती यातून पदवीच्या शिक्षणानंतर त्यानं बीपीएडचं शिक्षण घेतलं. पण सरकारी धोरणामुळं यशाचा मार्ग त्याला सापडला नाही. प्रताप सांगतो, बऱ्याच वर्षांपासून क्रीडा शिक्षकाची भरती झाली नाही. त्यामुळं आता तरी होईल असं वाटलं होतं. बीपीएडला प्रवेश घेतला. ७५ टक्के गुणांसह परीक्षा पास झालो. मात्र दोन वर्षानंतरही क्रीडा शिक्षक भरतीची जाहिरात आली नाही. खेळाच्या शिक्षकाची स्वप्ने पाहणारा प्रताप दुग्ध व्यवसाय आणि शेती करत कुटुंबाला हातभार लावतोय.

बीड जिल्हातील अशोकच्या आयुष्याचा तर खेळच झालाय. कारण बीपीएडचे शिक्षणपूर्ण केल्यानंतर तो वाहन चालक होऊन त्याच्या आयुष्याचा प्रवाहत बदललाय. क्रीडा शिक्षकांच्या भरती नसल्यामुळे अशोकनं गावातील खासगी संस्था चालकाशी संपर्क साधला. त्यांनी त्याला काही दिवस त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून रुजू व्हायला सांगितलं. साडेतीन वर्षे काम करुनही त्याला शिक्षक म्हणून संधी मिळाली नाही. आता तो कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी प्रवाह बदलून पुण्यात वाहन चालवण्याच्या काम करतोय.

वर्षा, प्रताप आणि अशोक ही फक्त प्राथमिक उदाहरण आहेत. सरकारच्या उदासीन क्रीडा धोरणामुळे हजारो उच्च शिक्षित तरुणांच्या स्वप्नासोबत खेळ सुरु आहे. खेळात एक वेगळी कामगिरी करण्यासाठी शालेय जीवनापासून तंत्रशुद्ध पद्धतीनं मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं. १९ वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेसाठी फिफाचं यजमानपद मिळालं म्हणून एकदिवसीय ‘क्रीडाप्रयोग’ केल्यानं खेळ बहरणार नाही.  फुटबॉल खेळाचे यजमानपद मिरवायला हरकत नाही. पण पण क्रीडा शिक्षकांच्यासोबत सुरु असलेला ‘खेळ’ थांबणं गरजेचं आहे. तो थांबला तरच दर्जेदार खेळाडू घडतील.