माथाडी कामगारांनी मागणी केल्याप्रमाणे १ एप्रिलपासून नवीन वाढीव दराने हमाली व लेव्हीची रक्कम ठेकेदाराने माथाडी बोर्डात भरावी, यासाठी जवळपास ३०० हमालांनी मागील तीन दिवसांपासून काम बंद ठेवले. त्यामुळे उस्मानाबाद रेल्वेस्थानकातील मालधक्क्यावर विविध योजनांतर्गत येणारे जवळपास २२ टन धान्य उघडय़ावर पडले आहे. हमाल हमालीसाठी आणि ठेकेदार जुन्याच हमाली दरानुसार पसे देण्यावर ठाम आहेत.
उस्मानाबाद रेल्वे मालधक्का येथील वाढीव दर औरंगाबादच्या प्रेसिडेंट कॅरिअर या ठेकेदारास हमाल माथाडी कामगारांनी एप्रिलपूर्वी सादर केले होते. एप्रिलमध्ये सहायक कामगार आयुक्तांनी पुढील दोन वर्षांची महागाई लक्षात घेऊन मालधक्क्यावरील रेल्वे डब्यातील ५० किलोचे पोते उतरवणे व भरण्यासाठी २ रुपये १७ पसे, माल काढून पूर्वीच्या प्रचलित पद्धतीने मालमोटारीत सरळ भरण्यासाठी ३ रुपये १७ पसे, वाराईचा दर अन्नधान्यासाठी ४० रुपये प्रतिटन व खतासाठी ५० रुपये ठरविण्यात आला होता. हे दर १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत अमलात राहणार आहेत.
हमालीच्या दरावर सध्याची माथाडी मंडळाची ३० टक्के लेव्ही माथाडी मंडळात सर्व हुंडेकऱ्यांनी दरमहा विहित मुदतीत जमा करणे अपेक्षित होते, मात्र मागील दीड महिन्यापासून जवळपास ३०० हमालांची जवळपास ८ लाख ६० हजार ३१७ रुपये हमाली व २ लाख ५८ हजार लेव्ही औरंगाबादच्या ठेकेदाराने माथाडी मंडळात भरली नाही. त्यामुळे हमालांची उपासमार सुरूआहे. मागील तीन दिवसांपासून हमालीच्या मागणीसाठी रेल्वे डब्यातील माल उस्मानाबादच्या मालधक्क्यावर उतरवला आहे, मात्र हा माल मालमोटारीत भरला नाही. पोते उतरवताना अनेक पोती फुटली, त्यामुळे धान्याची नासाडी झाली. मालधक्क्यावर सध्या जवळपास २२ टन माल उघडय़ावर आहे.
ऊन-पावसाच्या लहरीपणात पाऊस झाल्यास हा सर्व माल भिजून सरकारच्या धान्याची नासाडी होण्याची भीती आहे. हमाल माथाडी कामगार आणि ठेकेदाराच्या वादाबाबत मागील तीन दिवसांत कसलाही निर्णय होत नसल्याचे कामगारांनी सांगितले. नवीन दराप्रमाणे हमाली देण्यास ठेकेदार तयार झाल्यास आम्ही पुन्हा काम करू, अशी कामगारांची भूमिका आहे.