पुढील वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात खासगी प्रवासी बस उलटून घडलेल्या अपघातात २६ जण जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर येळी गावानजीक रविवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. यातील नऊ गंभीर जखमींना उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले. अपघातानंतर चालक फरारी झाला.
पुणे-औराद शहाजानी माग्रे निलंग्याला जाणारी खासगी प्रवासी बस (एमएच १२ के क्यू ३००६) रात्री पुण्याहून निघाली होती. सकाळी सहाच्या सुमारास उमरग्यानजीक येळी गावाजवळ बसने पुढील वाहनास मागे टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्यावरच उलटली. बसमध्ये २८ प्रवासी होते. काही प्रवास जागे, तर काही झोपले होते.
अपघातात अनेक प्रवाशांचे हात-पाय मोडले, तर काहींना डोक्याला मार लागला. छाया मुकुंद पाटील (कोंडजीगड, तालुका निलंगा), शिवदास बळीराम कुन्हाळे (अंबुलगा, निलंगा), राम बिभीषण जगताप (वय ४०, बोरगाव), बालाजी चव्हाण (वय ५६, मुळज, उमरगा), माया बरमानंद मारुती (वय ३०, कोटमाळ, बसवकल्याण), उज्ज्वला कुन्हाळे (वय ४५, कलमुगळी, निलंगा), सविता विश्वनाथ जाधव (वय ४५, उजळंब, बसवकल्याण), उमाबाई बालाजी चव्हाण (वय ५०, मुळज, उमरगा), सौदागर शिंदे (वय ४०, अनसरवडा, निलंगा), निकिता जाधव (वय ८) या जखमींवर उमरगा येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. ओंकार सूर्यवंशी (वय ५, पुणे), लक्ष्मीबाई बाबळसुरे (वय ४०, कोंडजीगड), निकिता जाधव (वय ४६, उजळंब), प्रमोद जाधव (वय ४६, उमरगा), मोतीराम पवार (वय ३२, निलंगा), दिशा जाधव (उजळंब, बसवकल्याण) आदी गंभीर जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले. बसचा चालक फरारी असून त्याच्याविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.