हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाडय़ात यंदा सरासरीपेक्षा २५ टक्के पाऊस अधिक होईल, अशी अपेक्षा आहे. पडणारा पाऊस लक्षात घेता आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास प्रशासकीय यंत्रणांच्या प्रमुखांनी कसे निर्णय घ्यावेत, याचा आढावा मंगळवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी घेतला. २५ मे नंतर मान्सूनपूर्व पाऊस होण्याचीही शक्यता आहे. गेल्या ४ वर्षांपासून ठाण मांडून असणाऱ्या दुष्काळावर या वर्षी मात होईल, असा अंदाज आहे.

मराठवाडय़ात ६५५ पूरप्रवण गावे असून नांदेड जिल्ह्य़ात गोदावरी किनारी सर्वाधिक २०० गावांचा समावेश आहे. जायकवाडीवरील धरणातून किती पाणी येऊ शकते, याचा अंदाज घेऊन पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्याला कसे सामोरे जायचे, याचा आढावा आज घेण्यात आला. या बैठकीला नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार, उपायुक्त जितेंद्र पापळकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते. पूरजन्य स्थितीत लोकनिवाऱ्यासाठी व्यवस्था कुठे असू शकेल? औषधांची उपलब्धता आणि सर्पदंश झाल्यास लसींचा साठा या विषयीचा आढावाही घेण्यात आला. बचावासाठी ४७ बोटी, ४५९ लाइफ जॅकेट व ४४५ जीवन सुरक्षा रक्षक मराठवाडय़ात सज्ज राहतील, असे सांगण्यात आले. विभागातील महानगरपालिकांनी धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना नोटिसा देऊन इमारती रिकाम्या करून घ्याव्या व रहिवासी नागरिकांचे तत्काळ स्थलांतर करावे, शहरातील नाले-गटारी यांची साफसफाईची मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.