पाणीटंचाई आणि जलसंधारणाच्या चर्चेत वार्षिक आराखडय़ातील तरतुदीच्या आकडय़ांवर फारशी चर्चा न होताच २६६ कोटी ५ लाख रुपयांचा पुढील वर्षांचा आराखडा सोमवारी मंजूर करण्यात आला. जलयुक्तच्या कामांसाठी मिळालेल्या २३ कोटी ८१ लाखपैकी २० कोटी ३५ लाख रुपयांच्या खर्चास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. गेल्या वर्षी केलेल्या तरतुदीतील १०० टक्के खर्च झाल्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी या वेळी सांगितले .

वार्षिक आराखडा बैठकीत पाणीटंचाई आणि जलयुक्त शिवार योजनेच्या कामावर चर्चा झाली. कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ७ हजार लोखंडी दरवाजे आवश्यक असल्याचे सर्वेक्षण केल्याचे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगितले. मात्र, दुरुस्ती होत नसल्याने पाणी वाया जात असल्याची तक्रार आली. पालकमंत्र्यांनी किती दरवाजे बसविले व किती दुरुस्ती  झाली, याची माहिती विचारली. या बंधाऱ्यात सिमेंटची भिंत घालावी, अशी सूचना केली होती. मात्र, त्यास तांत्रिक मान्यता नसल्याने हे काम करता आले नसल्याचे चौधरी यांनी सांगितले.

ही माहिती सांगताना आकडेवारी पूर्ण नसल्याचे सांगताच पालकमंत्री चिडले. बैठकीत सगळी माहिती सांगितली जावी, असे त्यांनी दटावले. ही कामे तातडीने कशी करता येतील, याकडे लक्ष देण्याची सूचना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. या बैठकीनंतर डोंगरी भाग विकासासाठी १ कोटी ९ लाख रुपयांचा स्वतंत्र आराखडाही मंजूर करण्यात आला. डोंगरी विकास कार्यक्रमात सोयगाव हा संपूर्ण गट असून कन्नड, खुलाताबाद व सिल्लोड हे तीन उपगट आहेत. या कार्यक्रमासाठी २ कोटी ९३ लाखांचे प्रस्ताव आल्याचे सांगण्यात आले. बैठकीस आमदार हर्षवर्धन जाधव, इम्तियाज जलील, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, भाऊसाहेब चिकटगावकर, सुभाष झांबड, नारायण कुचे, जि. प. अध्यक्ष श्रीराम तुपे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.