ऊसतोड मजुरांसह समाजातील विविध घटकांतील वंचित मुलांच्या पालनपोषण व शैक्षणिक पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या आर्वी (ता. शिरूर) येथील शांतिवन प्रकल्पात बांधण्यात येणाऱ्या शाळेच्या इमारतीसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आपल्या खासदार निधीमधून ४० लाख रुपयांची मदत दिली. याबाबतचे प्रशासकीय आदेश निघाले असल्याची माहिती प्रकल्प विश्वस्त दीपक नागरगोजे यांनी दिली.
बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांबरोबरच अनाथ, लालबत्ती, तमाशा कलावंत, भीक मागणाऱ्या मुलांच्या पोषणासाठी व शैक्षणिक पुनर्वसनासाठी मागील १५ वर्षांपासून दीपक व कावेरी नागरगोजे हे दाम्पत्य शांतिवन प्रकल्प चालवत आहेत. समाजातून मिळणाऱ्या मदतीवर चालणाऱ्या या प्रकल्पात या वर्षी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्याही पोषण व शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली. ३०० मुलांचे कायम पालकत्व आणि ५०० मुलांच्या शिक्षणाची सोय या प्रकल्पात केली जात आहे. वंचित घटकातील मुलांचे पोषण आणि शैक्षणिक पुनर्वसन करताना या प्रकल्पातील मुलांनी गुणवत्तेचे अनेक पुरस्कार पटकावले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाबा आमटे यांच्या समाजसेवेचे ध्येय समोर ठेवून सुरू असलेल्या या शांतिवनच्या कामाची देशभरातील अनेकांनी दखल घेऊन मदतीचा हात पुढे केला. दुष्काळग्रस्तांसाठी काम करणारे अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ संस्थेच्या वतीनेही शांतिवनमध्ये वसतिगृहासाठी मदत देण्यात आली. नागरगोजे यांच्या कामाची दखल घेऊन डॉ. मंदार परांजपे आणि प्रसिद्ध क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी सचिन तेंडुलकर यांना सविस्तर माहिती दिल्यानंतर तेंडुलकर यांनी या प्रकल्पासाठी खासदार निधीतून ४० लाख रुपयांची मदत दिली. शाळेच्या खोली बांधकामासाठी ३० लाख रुपये, तर कंपाऊंड िभतीसाठी १० लाख रुपये निधीचा प्रशासकीय आदेश बजावण्यात आला आहे.