मराठवाडय़ात सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून ३ वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीसाठी माजी सैनिकांची मदत घेतली जाणार आहे. माजी पंतप्रधान यांनी मंजूर केलेल्या इको बटालियनचा उपयोग यासाठी मराठवाडय़ात केला जाणार आहे. यासाठी १ कोटी लोकांना वनदूत म्हणून घोषित केले जाणार आहे. माजी सैनिकांच्या तुकडीच्या मदतीने केले जाणारे हे वृक्षारोपण या भागातील दुष्काळ हटविण्यास मदत करण्यास उपयोगी पडेल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. औरंगाबाद येथे वन विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

मराठवाडय़ात वन उभे करता येईल, अशी किती जमीन शिल्लक आहे याची माहिती घेतली जात आहे. त्या आधारे किती बटालियन लावाव्या लागतील, हे ठरवता येईल. लष्करी अधिकाऱ्यांशी या संदर्भात शुक्रवारी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

या बठकीस विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, वन विभागाचे महासंचालक ए. आर. चढ्ढा, ब्रिगेडिअर चव्हाण यांची उपस्थिती होती. सैन्य दलातून निवृत्ती घेतल्यानंतर सैन्याचा वननिर्मितीसाठी उपयोग करण्याचा प्रयत्न मसुरीमध्ये झाला होता. तसाच प्रयोग या भागात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तीन वर्षांत ५० कोटी झाडे लावल्यानंतर माजी सैनिकांच्या या बटालियनच्या मदतीने झाडे जगवण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर जाईल, असेही मुनगंटीवार म्हणाले.