शहरात ५० रुपयांच्या बनावट नोटा चलनात असल्याचे एका विद्यार्थ्यांकडे व्यवहारातून आलेल्या एका नोटेवरून उघडकीस आले आहे. सिडको भागात ही बनावट नोट सापडली आहे. या नोटेवरील पांढऱ्या जागेच्या चौकोनाला प्रकाशाच्या ठिकाणी ठेवून पाहिले असता त्यात रेषेतून रेखाटलेले महात्मा गांधीजींचे चित्र दिसत नाही.

बनावट नोटेवर माजी गव्हर्नर म्हणून रघुराम जी राजन यांची स्वाक्षरी आहे. खऱ्या व बनावट नोटेवरील काही सूक्ष्म नक्षीकामात अगदीच किरकोळ फरक असून तो लक्षात येण्यासारखा नाही. खऱ्या व बनावट नोटेवरील क्रमांकाच्या चढत्या-उतरत्या प्रकारातही फरक आहे.

खऱ्या नोटेवरील पांढऱ्या भागाला प्रकाशाच्या दिशेने ठेवून पाहिले तर त्यात गांधीजी दिसतात. तर बनावट नोटेत गांधीजी खऱ्या नोटेवर असलेल्या उजवीकडील भागाप्रमाणेच गांधीजी दिसतात. मात्र बनावट नोटेवरील डावीकडील पांढऱ्या भागात मात्र गांधीजी दिसत नाहीत. शिवाय दोन्ही नोटांची जवळून पडताळणी केली तर रंगात आणि कागदातही अगदीच न कळणारा फरक असून सर्वसामान्य माणसाला बनावट नोट लक्षात येणारी नाही. किंवा अनेक नोटांमध्ये समावेश करून दिली तर तेही सहज लक्षात येणार नाही. बनावट नोटेतील उजवीकडील वरील बाजूचा व खालच्या बाजूकडील क्रमांक सरळ पद्धतीने छापण्यात आलेले आहेत. तर खऱ्या नोटेवरील क्रमांक उजवीकडून डावीकडे येताना उतरत्या क्रमाने व लहान-लहान होत गेलेली आहेत. बनावट नोटेचा रंग अधिक गडद आणि जांभळ्यात लाल रंग मिसळला गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. खऱ्या नोटांचा रंग हा काळसर जांभळा आहे.

चलनात बनावट नोटा असल्याचे पोलीस आणि बँक कर्मचारीही खासगीत बोलताना मान्य करतात. मात्र एक-एक नोट सापडली तर त्या व्यक्तीला पकडता येत नाही. कारण त्याच्याकडे ती बनावट नोट अनेक ठिकाणाहून चलनातून आलेली असते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तर बँक कर्मचारीही त्याबाबत अधिक चौकशी करीत नाही.

केवळ ही बनावट नोट असल्याचे ग्राहकाला लक्षात आणून दिले जाते. मात्र बँकेकडून तक्रार दाखल केली जात नाही. त्यासाठी किमान पाच बनावट नोटा आढळलेल्या असाव्या लागतात, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

औरंगाबाद शहरात मे महिन्यात दोन हजार, पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या व्यक्तीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कटकटगेट परिसरातून पकडले होते. मात्र त्याच्याकडे ५० रुपयांच्या नोटा आढळून आल्या नव्हत्या. त्यापूर्वी शहरात व नारेगाव भागात एकाकडे २ हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. त्याचे धागेदोरे अंबडसह हिंगोलीपर्यंत असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. पुढे तपासात पोलिसांच्या हाती काही आले नाही.