मराठवाडय़ात काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर या पावसाळ्यात मोठी मनुष्यहानीही झाली आहे. पुरात वाहून गेलेल्या व  बुडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या ७० वर गेली आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत दिली जाते. ४७ जणांना अशी मदत वाटप झाली आहे.

नांदेड, बीड, उस्मानाबाद व लातूर या चारही जिल्ह्य़ांत मोठे पूर आले. त्यात अनेकजण वाहून गेले. जनावरांचेही मोठे नुकसान झाले आहे. २५९ जनावरे मृत पावली असून लहान १५० जनावरे वाहून गेली. घरांची पडझडही मोठय़ा प्रमाणात झाली आहे. मराठवाडय़ातील ८ जिल्ह्य़ांत ३१ घरे पडली असून ६०३ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्य़ात सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. पूर्णत: पडझड झालेल्या ३१ घरांपैकी दोन प्रकरणांमध्ये मदत देता येऊ शकते, असा अहवाल देण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यांना मदत मिळालेली नाही. अंशत: पडलेल्या कच्च्या घरांना २९ लाख रुपयांची मदत देण्यात आली. नांदेड जिल्ह्य़ात सर्वाधिक १६ व्यक्तींचा मृत्यू झाला असून औरंगाबाद, जालना, बीड व लातूर जिल्ह्य़ांत ४ ते ६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.