बेगमपुरा परिसरातील दस्तनोंदणीत गडबड कशी झाली, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आदेश दिल्यानंतर महसूल यंत्रणेनेसुद्धा तहसीलदार रमेश मुनलोड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. दरम्यान, पोलीस निरीक्षक सावंत यांच्याकडे या जमीन प्रकरणातील सर्व कागदपत्रे बुधवारी सोपविण्यात आली. बेगमपुरा परिसरातील १०४ घरांचा ताबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नुकतीच मोठी कारवाई करण्यात आली.
औरंगाबाद शहरातील ९९/१ व ९९/२ क्रमांकाच्या जमिनीवर गरव्यवहार झाले कसे, याचा शोध घेताना गहाण दिलेल्या जमिनीवरील मालकाची नोंद कोणत्या वर्षांत बदलली व कोणाच्या कार्यकाळात असे व्यवहार झाले, याचा शोध घेतला जाणार आहे. अकृषी जमिनीचे एनए ४४अन्वये कारवाई झाल्यानुसार दस्तनोंदणी करू नये, अशा सूचना देऊनही वारंवार व्यवहार होत आहेत. दस्तनोंदणी कार्यालयात मुखत्यारपत्र देऊन केले जाणारे व्यवहार गर असल्याचे दिसून आले. हे व्यवहार तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १९७४ पासून झालेल्या या व्यवहारात नक्की कोणत्या काळात बदल झाले, याची तपासणी केली जाणार आहे. गहाणखत असतानाही मूळ मालक माधव सोनवणे यांच्या नावाने असणारी जमीन कोरडे यांच्या नावे कशी झाली, त्यानंतर झालेले व्यवहार कसे झाले यांची कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत. या जमिनीच्या अनुषंगाने दिलेल्या विविध न्यायालयीन निर्णयांची कागदपत्रे देण्यात आल्याचे तहसीलदार रमेश मुनलोड यांनी सांगितले.
बहुतांश तलाठी मंडळींनी खासगी लोक नेमलेले असल्याने कोणी घोळ घातले, याचा शोध लागणे अवघडच असल्याचे सांगितले जात आहे. या व्यवहारात अडकलेले तलाठी कदाचित हयात नसतील, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे गरव्यवहारात मूळ चूक करणाऱ्यांवर कारवाई होईल का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात कागदपत्रे तपासून अहवाल सादर करू, असे तहसीलदार मुनलोड यांनी सांगितले. बेगमपुरा भागातील या व्यवहारातील भूमाफियांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. या व्यवहारात बरेच मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे.