औरंगाबाद शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळ तात्काळ हटावावी, असे आदेश कोर्टाने दिले होते. मात्र सामाजिक आणि राजकीय दबाव मोठ्या प्रमाणत असल्याने कारवाई अद्याप झालेली नव्हती. कोर्टाच्या आदेशानंतर अखेर शुक्रवारी २३ धार्मिक स्थळे हटवण्याचे नियोजन पालिकेकडून करण्यात आले. त्यापैकी पंधरा ठिकाणची अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यात आली. धार्मिक स्थळांवरील आतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेकडून खास तयारी करण्यात आली होती. यासाठी चार स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून प्रत्येक पथकात दोन जेसीबी, दोन टिप्पर, जीप आणि ट्रक अशी वाहन देण्यात आली होती. उपायुक्त रवींद्र निकम, आयुब खान, एम बी काझी आणि व्ही एम निकम यांच्या नेतृत्वाखाली चार पथक तयार करण्यात आली होती. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. पहिल्या टप्प्यात डीपी रस्त्यावर करण्यात आलेली अतिक्रमण काढण्यात येणार होती. त्यासाठी २३ अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी तयार करण्यात आली होती. यातील १५ ठिकाणी कारवाई करण्यात आली. कारवाईच्या वेळी काही ठिकाणी किरकोळ तणाव निर्माण झाला होता.

सकाळी नरेगाव येथून कारवाईला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पैठण रोड, आयटीआय कॉलेजच्या पाठीमागील भागातील अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली. मुकुंदवाडी येथील कारवाई दरम्यान थोडा तणाव निर्माण झाला. पुढील टप्प्यात मनपाचे राखीव भूखंड, सिडकोच्या जागा, हरित पट्ट्यातील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. अधिक पोलीस बंदोबस्त घेऊन तिथे कारवाई करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी सांगितले.