अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह येथील शाळेचे मुख्याध्यापक विजय नकाशे यांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित दोषींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवावा व नकाशे परिवाराला एक कोटी रुपयांची मदत करावी, या मागणीसाठी विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
पंचायत राज समितीने ठपका ठेवल्याच्या आरोपावरून सेमाडोह येथून विजय नकाशे यांना निलंबित करण्यात आले. मात्र, निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करताना अशा प्रकारची कारवाई झाल्याने नकाशे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. या नराश्यातून त्यांनी शाळेतच गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. या घटनेने विदर्भासह राज्यात खळबळ उडाली. नकाशे यांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत करावी तसेच भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात या मागण्यांसाठी राज्य इंटक शिक्षक संघटना, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, राज्य पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभा आदी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दिवाळीच्या सुट्टय़ा असतानाही आज झालेल्या आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला. इंटकचे मधुकर उन्हाळे, पदवीधर प्राथमिक शिक्षक संघाचे शंकरराव इंगळे, बाबुराव रामोड, कास्ट्राईबचे साहेबराव पवार, साहेबराव शेळके, पद्माकर कुलकर्णी, दत्ताप्रसाद पांडागळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान सर्वच संघटनांच्या प्रतिनिधींनी शिक्षकांकडून करून घेण्यात येणारी अशैक्षणिक कामे, शाळा खोली बांधकाम, शालेय पोषण आहार, ऑनलाईन नोंदणी या योजनांसाठी स्वतंत्र यंत्रणेची नियुक्ती करावी अशी मागणी केली. सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.