‘शेतकऱ्यांना फायदा होत नसेल, तर राजकारण सोडेन’

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत न्यायालयाने हस्तक्षेप करून सरकारला जाब विचारला, तरी कर्जमाफीचा फायदा बँकांनाच होतो, असा जावईशोध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावून दिशाभूल चालवली आहे, असा आरोप करून कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा होत नसेल तर ‘मी राजकारण सोडून देईल’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आव्हान दिले. दुष्काळी परिषदेतून पेटलेला वणवा चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचवून सरकारला कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेण्यास भाग पाडू, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

राज्यातील जनतेने अनेक दुष्काळ पाहिले आहेत. १९७२च्या दुष्काळात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हरित क्रांतीचा नारा दिला, तर शरद पवार यांच्या काळातही दुष्काळात योग्यप्रकारे नियोजन करण्यात आले. केंद्रात कृषिमंत्री असताना तीन वर्षांपूर्वी ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली. दुष्काळ पडला तरी सरकार आपल्या पाठीशी हा विश्वास होता, मात्र यंदा पाऊस कमी झाला असताना सरकारने नियोजनच केले नाही. विधिमंडळात आणि बाहेर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत मागणी केली. सरकारने व्यापाऱ्यांना ९ हजार कोटींचा कर माफ केला. परंतु, कर्जमाफीची दानत दाखवली नाही.

धनंजय मुंडे यांनी सांगितले की, मराठवाडय़ातील दुष्काळाची जगात चर्चा असून, चारा छावण्या, पाण्याचे टँकर आणि शेतकरी आत्महत्याही वाढल्या आहेत. सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराने दुष्काळात सामान्य माणूस होरपळत आहे. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनखर्चावर आधारित जास्तीचा ५० टक्के नफा देण्याची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात भ्रमनिरास झाला. ‘मन की बात’मध्ये विद्यार्थी, व्यापारी, खेळाडू यांचा उल्लेख होतो, पण शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होते.

आमदार क्षीरसागर यांनी. सरकारमध्ये बसून टीका करण्यापेक्षा शिवसेनेने सत्तेला लाथ मारून बाहेर यावे, असे आवाहन केले.

आता तरी साथ द्या’!

सध्या प्यायला पाणी नाही, असे असताना पालकमंत्री पंकजा मुंडे या दारूच्या कारखान्याला पाणी देण्याचे सांगतात. हे कसले राजकारण? मात्र, माध्यमांतून दोन दिवसांच्या पलीकडे हा विषय दाखवला नाही. काही वर्षांपूर्वी माझ्याकडून एक चूक झाली. ती मात्र दोन महिने सारखी दाखवली गेली. या सरकारचे चिक्कीसह अनेक घोटाळे उघडकीस आले. बीड जिल्ह्य़ातील जनतेने विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांना कसेबसे निवडून दिले. इतर उमेदवारांची वाटच लावली, तरीही धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेतेपदाचा लाल दिवा दिला. आता आगामी जि.प., पं.स. निवडणुकीत साथ द्यावी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन अजित पवार यांनी केले.