राज्यात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या विरोधात आंबेडकरी संघटनांनी शुक्रवारी परभणीत निषेध आंदोलन केले. शिवसेनेचे खासदार संजय जाधव हेही सहभागी झाले. आंबेडकरी संघटनेने ‘बंद’ची हाक दिली होती. परंतु ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. परभणीतील बलात्कार प्रकरणातील आरोपी मोहन गुजर व परिसरातल्या सर्व गुंडांवर झोपडपट्टी दादा विरोधातील कायद्यानुसार कारवाई व्हावी, अशी मागणीही मोर्चाद्वारे करण्यात आली.

शाहू-फुले-आंबेडकरांच्या राज्यात गेल्या काही दिवसांपासून लंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. नेरुळ येथे स्वप्नील सोनवणे याचा खून झाला, तर परभणीत एका विवाहितेवर तलवारीचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला. या घटनांच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी संघटनांनी आंदोलन केले. भीमनगर येथून हा मोर्चा निघाला. ‘बंद’ला अल्प प्रतिसाद मिळाला. सकाळी काही काळ बाजारपेठेत दुकाने बंद राहिली. मात्र रास्ता रोको आंदोलनानंतर जनजीवन पूर्ववत सुरूझाले.

खासदार जाधव यांनीही वाढत्या गुन्हेगारीस पोलीस यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप केला.

वाकोडे यांनी गुंडाची दहशत मोडून काढण्यासाठी वेळीच प्रशासनाने एमपीडीसी या कलमांतर्गत कारवाई करावी, असे सांगितले. आंदोलनात भन्ते मुदितानंद, गौतम मुंडे, सिद्धार्थ भराडे, रवि सोनकांबळे, चंद्रकांत लहाने, सिद्धार्थ कसारे, सुशीलाबाई निसर्गन, निर्मलाबाई कनकुटे आदी सहभागी झाले होते.