श्री क्षेत्र नारायणगडापासूनच जिल्ह्यात गडांची परंपरा सुरू झाली. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना भगवानगडावरून दिल्ली, मुंबई दिसत होती, कारण त्यांचा समाज जागृत होता. मला नारायणगडावरून केवळ समाज आणि समाजाचे भले दिसत असून समाजाच्या आíथक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी आयुष्यभर काम करणार आहे. मराठा समाजाच्या एकत्रीकरणासाठी आता दरवर्षी नारायणगडावर पुण्यतिथी सोहळा साजरा केला जाईल, अशी घोषणा शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी केली, तर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी नारायणगडासाठी सर्वतोपरी मदत करून संस्थानाला शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कौशल्य विकास केंद्र देण्याची ग्वाही दिली.
जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नारायणगडावर नगद नारायणमहाराज द्विशताब्दी पुण्यतिथी आणि महंत शिवाजीमहाराज यांचा अभीष्टचिंतन सोहळा गृहराज्यमंत्री रणजित पाटील, खासदार रजनी पाटील, आमदार विनायक मेटे, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, माजी मंत्री अशोक पाटील, राजेंद्र जगताप, राजेंद्र मस्के, दिलीप गोरे यांच्या उपस्थितीत झाला.
गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले की, समाजाला रुढी-परंपरांच्या जोखडातून योग्य मार्ग दाखविण्याचे काम संत-महंतांनी केले. पूर्वी गाव स्वयंपूर्ण होते. पण सरकारी बाबू निर्माण करण्याच्या इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे बेरोजगारांच्या पिढय़ा निर्माण झाल्या. त्यामुळे कौशल्य शिक्षण आवश्यक झाले असून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी नारायणगड संस्थानाला कौशल्य विकास केंद्र मंजूर करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. सरकारने या वर्षी कौशल्य विकासासाठी साडेपाचशे कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली. संस्थानाच्या ७०० एकर वादातील जमिनीचा आणि विकास आराखडा मंजूर करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
आमदार मेटे यांनी मुख्यमंत्री ऐनवेळी येऊ शकले नसले, तरी त्यांनी नारायणगडाच्या विकासाचा आराखडा मंजूर करण्याचे आणि ७०० एकर वादातील जमीन गडाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. नारायणगडापासूनच गडांची परंपरा सुरू झाली असून भगवानगड, गहिनीनाथगड आणि आता गोपीनाथगड झाला आहे. कोणी कोणत्या गडावरून काय करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण मात्र या गडावरून केवळ समाजकारणच करतो. भगवानगडामुळे खासदार, मंत्री झाले त्यांना नारायणगडाचाही आशीर्वाद मिळाला असल्याचे त्यांनी विसरू नये, असा टोलाही मेटे यांनी भाजपच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांचा नामोल्लेख न करता लगावला.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना भगवानगडावरून दिल्ली, मुंबई तर खासदार रजनी पाटील यांना नारायणगडावरून दुष्काळ दिसत आहे. मुंडेंचा समाज जागृत होता. मात्र, मराठा समाज जागृत नसल्यामुळे मला गडावरून केवळ समाज आणि समाजाचे भलेच दिसते आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी उभारलेला लढा मागील वेळी चुकीच्या पद्धतीने दिलेल्या आरक्षणामुळे न्यायालयात अयशस्वी झाला. मात्र, सहाच महिन्यांत या आरक्षणामुळे ५३ मुलांना शिक्षणात, तर २८ लोकांना नोकरीत फायदा मिळाला. त्यामुळे भविष्यात आरक्षण मिळवण्यासाठी आपला लढा चालू राहील. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक उन्नतीसाठी आता दरवर्षी नारायणगडावर पुण्यतिथी सोहळा साजरा केला जाणार असल्याची घोषणाही मेटे यांनी केली. खासदार पाटील यांनी नारायणगडाच्या विकासासाठी एक कोटीचा निधी देण्याची घोषणा केली.