मराठवाडय़ातील काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रश्न; संघटना विस्कळीत

कर्जमाफीच्या निर्णयाचे निकष प्रत्येक दिवसाला बदलण्याच्या घोषणा सुरू आहेत. होणाऱ्या घोषणा आणि वस्तुस्थिती यामधील विरोधाभास लक्षात घेऊन सरकार विरोधी जनमत संघटित करण्याची संधी शिवसेनेने घेतली. शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर कराव्यात अशी मागणी करत ढोल वाजविण्यात सत्तेतील शिवसेनेने विरोधी पक्षाची जागा गिळून टाकली आणि मराठवाडय़ातून काँग्रेसची मंडळी प्रश्न विचारू लागली आहे, कोठे आहेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण. कारण अशोकराव मराठवाडय़ात दिसेनासे झाले आहेत. अधून-मधून नांदेड दौरा करून ते जातात. मराठवाडय़ातील अन्य जिल्ह्यात त्यांचा संपर्कही होत नसल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे मराठवाडय़ात सत्तेमध्ये भाजप आणि विरोधात शिवसेना असे चित्र दिसून येत आहे.

कर्जमाफीच्या निर्णयातील विरोधाभास सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडय़ाचा दौरा केला. तत्पूर्वी औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कर्जमाफीच्या निर्णयावर तिरकस टोमणेबाजी केली. मिश्किलपणे सरसकट आणि निकषांची खिल्ली त्यांनी उडवली. काँग्रेसच्या नेत्यांनी ते कामही नीटसे केले नाही. समृद्धी महामार्गाबाबत काँग्रेसची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे. शेतकरी संपामध्ये काँग्रेस कार्यकर्ते कोठेच दिसले नाहीत. शेती क्षेत्रातील अभावाचे जिणे ज्या मराठवाडय़ात आहे. तेथे संपाचे नेतृत्व तर तयार झाले नाहीच. या भागातील जे कार्यकर्ते या प्रश्नावर लढू पाहत होते, त्यांना काँग्रेसचे सहकार्यही केले नाही. या अनुषंगाने काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार रजीनीताई पाटील म्हणाल्या, परिस्थिती कॉंग्रेसला उभारी देण्यासाठी योग्य आहे. पण एक प्रकारची मरगळ जाणवते आहे. आता संघटनात्मक पातळीवरील निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यानंतर काही उत्साह वाढला तर बरे होईल. पण सध्या काँग्रेसमध्ये विशेषत: मराठवाडय़ातील काँग्रेसमध्ये अनुत्साहाचे वातावरण आहे.

नक्की काय घडतेय?

नांदेड मतदारसंघात नागेश शिंदे नागलीकर यांची काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली. अगदी वपर्यंत त्यांच्या नावासाठीच्या परवानग्या घेण्यात आल्या. पण नांदेड जिल्हाध्यक्षाला काँग्रेस कार्यकारिणीच नाही. अशीच गत औरंगाबादची. आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांवर टीका करुन काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून नामदेवराव पवार यांची निवड झाली. गेल्या काही महिन्यापासून ते कारभार रेटायचा प्रयत्न करीत आहेत. पण पक्षाकडून कोणता कार्यक्रमच येत नसल्याने सारे काही निवांत आहे. खरे तर काँग्रेसचा गड असणाऱ्या लातूर जिल्’ाातही फारसे काही घडताना दिसत नाही. या जिल्’ाात असेही अशोकराव चव्हाण फारसे फिरकत नाहीत. लातूर जिल्हा काँग्रेसमध्ये ढवळाढळव झालीच तर ती अमित देशमुख आणि दिलीपराव देशमुखांनी करावी. पण, सरकारविरोधात वातावरण तापविण्यात या जिल्ह्यातील नेतेही पुढाकार घेताना दिसत नाहीत. लातूरमध्ये काँग्रेसचे चार प्रदेश सरचिटणीस आहेत. अमित देशमुख, आमदार बसवराज पाटील मुरुमकर, शैलेश पाटील चाकूरकर, शिवाजी पाटील कव्हेकर आणि अशोक पाटील निलंगेकर. यातील एकही सरचिटणीस पक्ष विस्तारासाठी मतदारसंघाबाहेर पडत नाही. एक काळ असा होता की काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या राज्यातील दौऱ्याचे नियोजन प्रदीप राठी यांच्याकडे असायचे. आता ते काँग्रेसच्या कार्यक्रमात पाठीमागे चौथ्या रांगेत बसतात. बीडमध्ये काँग्रेस कधी रुजली नाही. त्या जिल्ह्य़ातील नेत्या रजनीताई पाटीलच पक्ष संघटनेमध्ये मरगळ असल्याचे मान्य करतात. खरे तर मराठवाडय़ात काँग्रेसचे देशपातळीवरचे मोठे नेते अशी ओळख असणारे शिवराज पाटील चाकूरकर आहेत. पण त्यांचा कोणी सल्लाही घेत नाहीत.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष संघर्ष यात्रेमध्ये दिसतील असे अपेक्षित होते. मात्र, ते संघर्ष यात्रेत गायब असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर दोन कार्यक्रमात दिसले. तोपर्यंत ते संघर्ष यात्रेत नव्हते. ‘त्यांनी यायला पाहिजे होतं’ या शब्दात कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर कॉंग्रेसचे मराठवाडय़ात एकही आंदोलन झाले नाही. सरकार विरोधी रोष शेतकऱ्यांमध्ये दिसत असतानाही काँग्रेस काही मदानात उतरली नाही. त्यामुळे आता प्रत्येक जिल्’ाातून प्रश्न विचारला जातो आहे, ‘कोठे आहेत अशोकराव?’

गेल्या काही दिवसापासून पक्षात काही घडत नव्हते. पण आता नव्याने प्रदेशाध्यक्ष दौरा करणार आहेत. बुधवारी  ते बुलढाणा दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे शेतकरी आणि व्यापाऱ्याशी जीएसटीवर चर्चा करणार आहेत. त्यांनतर ऑगस्ट महिन्यात केंद्रातील कॉंग्रेसचे काही नेतेही मराठवाडय़ात येणार असल्याचे अशोकराव चव्हाण यांच्या समर्थक आमदारांनी सांगितले. ऑगस्टमध्ये माजी मंत्री गुलाम नबी आझाद यांचा दौरा औरंगाबादला होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

सक्रियता कुठे आहे?

  • शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर कराव्यात अशी मागणी करत ढोल वाजविण्यात सत्तेतील शिवसेनेने विरोधी पक्षाची जागा गिळून टाकली आणि मराठवाडय़ातून काँग्रेसची मंडळी प्रश्न विचारू लागली आहे, कोठे आहेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण.
  • प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड मतदारसंघात नागेश शिंदे नागलीकर यांची काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली. अगदी वपर्यंत त्यांच्या नावासाठीच्या परवानग्या घेण्यात आल्या. पण नांदेड जिल्हाध्यक्षाला काँग्रेस कार्यकारिणीच नाही. अशीच गत औरंगाबादची.
  • आता संघटनात्मक निवडणुका होऊ घातल्या आहेत. पण सध्या मराठवाडय़ातील काँग्रेसमध्ये अनुत्साहाचे वातावरण आहे.

आता प्रदेशाध्यक्ष दौरा करणार आहेत. बुधवारी  ते बुलढाणा दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे शेतकरी आणि व्यापाऱ्याशी जीएसटीवर चर्चा करणार आहेत. त्यांनतर ऑगस्ट महिन्यात केंद्रातील कॉंग्रेसचे काही नेतेही मराठवाडय़ात येणार असल्याचे अशोकराव चव्हाण यांच्या समर्थक आमदारांनी सांगितले.