सुरक्षा, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा यासोबतच महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत मुगळीकर यांनी औरंगाबादच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी त्यांनी पालिकेत स्वच्छ आणि पारदर्शक कारभार पाहायला मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

साधारणतः महापालिकांमध्ये नगरसेवक आणि आयुक्त असा संघर्ष पाहायला मिळतो. यापार्श्वभूमीवर नगरसेवकांसोबत कसं जमवणार असा प्रश्न मृदू स्वभाव असलेल्या नवनिर्वाचित आयुक्तांना विचारण्यात आला होता. याप्रश्नावर मुगळीकर म्हणाले, ‘संघर्षापेक्षा समन्वय महत्वाचा आहे. समन्वय ठेऊन काम करेल. त्यातूनच औरंगाबाद महापालिकेला अव्वल स्थान मिळवून देईल.’ मुगळीकर यांनी सोमवारी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यापूर्वीचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी घेतलेलं चांगले निर्णय यापुढेही राबवणार असल्याचं ते म्हणाले. यातून त्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराच दिला आहे.

तसेच महापालिका आणि शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी स्वत:चा फोन नंबर आणि ई-मेल आयडी सर्वसामान्य नागरिकांसाठी जाहीर केला. कोणतीही अडचण असेल तर थेट संपर्क करण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.