जम्मू काश्मीरमधील पुंछमध्ये पाकिस्तानशी लढताना भारतीय लष्कारातील दोन जवान शहीद झाले. काश्मीर खोऱ्यातील ही घटना देशातील कानाकोपऱ्यात वाऱ्यासारखी पसरली. मात्र, ही दु:खद घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शहीद नाईक संदीप सर्जेराव जाधव यांच्या घरी अद्यापही समजू दिलेली नाही. केळगाव पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर गोकुळवाडी वस्ती हे जाधव यांचे गाव. त्या ठिकाणी जाधव यांचे कुटुंबीय राहतात. ही दु:खद घटना रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घरी पोहोचू दिली नव्हती. यासाठी गावातील काही तरुणांनी त्यांच्या वस्तीवर असलेल्या टीव्हीचे केबल कनेक्शन बंद करून टाकले. आज सकाळपासून त्यांच्या घराजवळून जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर तरुण उभा आहेत. कोणी नातेवाईक आला तर त्याला त्या ठिकाणाहून परत पाठवले जात आहे. जवळचे नातेवाईक आहेत त्यांना फोन करून याबतची कल्पना दिली गेली आहे. अंत्यविधीची तयारी करण्यासाठी पोलीस अधिकारी गावात पोहोचले आहेत. मात्र त्यांनाही वस्तीवर जाऊ दिलेले नाही. त्यासाठी लागणारी व्यवस्था गावकरी करत आहेत. संदीप जाधव यांच्या मृत्यूची घटना घडली त्यावेळी त्यांची आई मावशीकडे गेली होती. त्यांना पीक विम्याचे बँकेत पैसे मिळत आहेत, असे सांगून घरी आणण्यात आले आहे.

जाधव गेल्या १५ वर्षांपासून लष्करी सेवेत होते. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बुलढाणा येथील सैन्यभरतीत पहिल्याच प्रयत्नात ते भरती झाले. बेळगाव येथून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. गुजरातमध्ये काही काळ कर्तव्य बजावल्यानंतर त्यांचे पुंछमध्ये पोस्टिंग झाले होते. सिल्लोड तालुक्यातील शेतकरी कुटुंबात जाधव यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सर्जेराव जाधव सिद्धेश्वर साखर कारखान्यात नोकरीला होते. जाधव यांना एक भाऊ आणि एक बहिण आहे. यासोबतच जाधव यांच्या पश्चात एक मुलगी आणि सात ते आठ महिन्याचा मुलगा आहे.

संदीप जाधव यांनी पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी केळगावमधील मोरेश्वर विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेवून महाविद्यालयीन शिक्षणासाठी रामकृष्ण महाविद्यालयात कला शाखेला प्रवेश घेतला. शाळेत असताना शांत स्वभावाचे असल्यामुळे सर्वांसोबत मिळून मिसळून राहत. त्यांच्या या गुणामुळे त्यांची मित्र मंडळीही जास्त होती. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सैन्य भरती प्रवेश परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ते भरती देखील झाले.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप जाधव याचे पार्थिव शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या गावी आणण्यात येणार आहे. जम्मूमधील पुंछ विभागात पाकिस्तानी लष्कराच्या बॅट तुकडीने गुरुवारी हल्ला केला. भारतीय लष्कराने प्रत्युत्तरदाखल केलेल्या हल्ल्यात बॅटचा एक सैनिक ठार झाला, तर एक सैनिक जखमी झाला. यात महाराष्ट्रातील श्रवण माने आणि संदीप जाधव दोन जवानांना वीरमरण आले.