औरंगाबाद महापालिकेत ‘वंदे मातरम्’मुळे निर्माण झालेल्या वादानंतर दोन नगरसेवकांविरोधात पालिकेने कठोर पावले उचलली आहेत. महापालिका प्रशासनाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन आणि काँग्रेसचे नगरसेवक सोहेल शेख यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. यापूर्वी त्यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले होते. महापौरांच्या सुचनेनुसार, त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती  पालिका आयुक्त मुगळीकर यांनी दिली.

‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीतावरुन महापालिकेतील वादाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील वंदे मातरम् या संघटनेने महापौरांची भेट घेतली होती. राष्ट्रीय गीताचा अवमान करणाऱ्या नगरसेवकांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी दोन्ही नेत्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली होती. सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला ‘वंदे मातरम्’ सुरु असताना एमआयएम आणि काँग्रेस नगरसेवक बसून राहिले होते. त्यामुळे पालिकेत चांगलाच वाद निर्माण झाला. त्यानंतर शिवसेना, भाजप आणि एमआयएमचे नगरसेवक या मुद्द्यावर आपसात भिडल्याचे पाहायला मिळाले. वादामुळे दिवसभरासाठी सभागृह तहकूब करावे लागले. यावेळी सभागृहात माईकची तोडफोड आणि नगरसेवकांचा एकमेकांना धक्काबुक्कीचा प्रकार घडला. याप्रकरणानंतर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्याकडूनही  सय्यद मतीन यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.