पर्यटनाला चालना देण्यासाठी पॅराग्लायडिंग आणि हॉट एअर बलूनची सुविधा

औरंगाबाद हा पर्यटन जिल्हा घोषित असल्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी म्हैसमाळ, शूलिभंजन, वेरुळमध्ये पॅराग्लायडिंग व हॉट बलूनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात यासाठी १३५ कोटी रुपयांच्या योजनांना तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. आचारसंहितेमुळे या योजनांचे काम शिक्षक व जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. तीन टप्प्यांतील हा पर्यटन आराखडा सुमारे ४३५ कोटी रुपयांचा असणार आहे. पॅराग्लायडिंग व हॉट बलूनच्या सोयीसाठी जागतिक स्तरावरील निविदा महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाकडून काढल्या जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

पर्यटनाला चालना देण्यासाठी तीन टप्प्यांतील या कार्यक्रमातील पहिला भाग हा पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा असणार आहे. पिण्याचे पाणी, रस्ते यासाठी मंजूर निधीमधून काम केले जाणार आहे. पर्यटनाला चालना देणाऱ्या आराखडय़ावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक मुंबई येथे घेण्यात आली. या बैठकीत पर्यटनासाठी कोणत्या सुविधा किती कालावधीमध्ये निर्माण करायच्या, या अनुषंगाने चर्चा झाली. पहिल्या टप्प्यातील कामासाठी विशेषत: रस्त्यांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी तरतूद वापरली जाणार आहे. पॅराग्लायडिंगसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा तशा कमी लागतात. त्या सात-आठ महिन्यांत उभारल्यानंतर प्रशिक्षण दिले जाऊ शकते. तीन महिने स्थानिक व्यक्तींना प्रशिक्षित करून हॉट एअर बलून व पॅराग्लायडिंग या सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात. स्किल इंडिया अंतर्गतही या संदर्भातील प्रशिक्षणे होऊ शकतील, असे उच्चपदस्थ अधिकारी सांगतात. वेरुळ पाहण्यासाठी विदेशी पर्यटकांची गर्दी असते. याच परिसरात अन्य पर्यटनस्थळे असल्याने ती विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मोबत्ता तलावामध्ये बोटिंगसाठीही प्रस्ताव देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेकडून यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. म्हैसमाळ येथे राहुटय़ाही उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ते पूर्ण झाले नसले तरी येत्या काळात या पर्यटन आराखडय़ाच्या माध्यमातून वेरुळ परिसरात अधिक उपक्रम घेण्याचे ठरवण्यात आले आहे. निसर्ग पर्यटनासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून, या भागात ट्रेकिंगची सोयही उपलब्ध करून दिली जाणार आहे. पॅराग्लायडिंगसाठी आवश्यक असणारा पर्यावरणाचा अभ्यासही करण्यात आला आहे. यामध्ये वाऱ्याचा वेग तपासला जातो. असा आराखडा पूर्ण असून त्याबाबतच्या निविदा महाराष्ट्र पर्यटन मंडळाकडून प्रकाशित केल्या जाणार आहेत. औरंगाबादला येणाऱ्या विमानांची वाहतूक वाढवण्यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रव्यवहार केला आहे. निवडणुकीनंतर पर्यटन आराखडा अंमलबजावणीमध्ये येण्याची शक्यता आहे.