आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने नागरिक, विद्यार्थी आणि व्यापारी या सर्वाच्या सोयीसाठी मोफत वायफाय सुविधा देण्याचा निर्णय बीड नगरपालिकेने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात पाच भागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा देण्यात येईल. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने संपूर्ण शहर वायफायमय करण्यात येईल. दिल्ली व इस्लामपूरनंतर मोफत वायफाय सुविधा देणारे बीड हे देशातील तिसरे शहर ठरणार आहे.
पालिकेतील गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शनिवारी पत्रकार बठकीत मोफत वायफाय सुविधेची माहिती दिली. शहरातील नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या दृष्टीने, स्मार्ट व डिजिटल शहर बनविण्याच्या उद्देशाने वायफाय सुविधा मोफत उपलब्ध देण्यासाठी मागील एक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. पालिकेने रिलायन्स जिओ इन्फो या कंपनीशी करार करून पहिल्या टप्प्यात बशीर गंज, सुभाष रस्ता, सिद्धिविनायक संकुल परिसर, शाहूनगर व मोमीनपुरा या पाच भागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मोफत वायफाय झोन देण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने संपूर्ण शहरात ही सुविधा देण्यात येणार आहे.
या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन रोजगार संधी, आवेदनपत्र भरणे अशा विविध स्वरूपात फायदा होणार आहे. या बरोबरच व्यापारी वर्ग, नागरिकांनाही लाभ होणार असून संपूर्ण शहरात वायफाय सुविधा दिल्यावर पालिकेचा कारभारही ऑनलाईन होण्यास मदत होईल. विविध प्रकारची कागदपत्रे, मालमत्ता कर, पाणी कर आदींसाठी ऑनलाईन सुविधेचा वापर करणे शक्य होणार असल्याचे डॉ. क्षीरसागर म्हणाले. डॉ. क्षीरसागर, नगराध्यक्ष रत्नमाला दुधाळ, उपनगराध्यक्ष नसीम इनामदार, जिओ इन्फोचे नदीम शेख यांच्या उपस्थितीत बशीरगंज चौकात वायफाय सुविधेच्या कामाला सुरुवात करण्यात आली.