भय्यू महाराज व समर्थकांनी फोनवरून धमकी देत कायदेशीर नोटीस आणि आयोजकांच्या संपत्तीबाबत माहिती अधिकाराचा वापर सुरू केला आहे. यातून मराठा क्रांती मोर्चा आयोजकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. भविष्यात खोटे गुन्हे, जीवघेणा हल्ला किंवा जीवितास धोका संभवण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रांती मोर्चा संयोजकांना संरक्षण देऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. भय्यू महाराज यांची माफी मागण्याचा प्रश्नच नाही. त्यांच्या नोटिशीला मात्र वकिलांमार्फत नक्की उत्तर देऊ, असेही जगताप यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

सकल मराठा समाजाच्या मूक मोर्चानंतर माध्यमांसमोर मोर्चाचे श्रेय लाटण्याच्या हेतूने भय्यू महाराज यांनी केलेल्या वक्तव्याचा आपण पत्रकार परिषदेत निषेध केला व समाजाच्या वतीने त्यांना मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करण्याचा अधिकार नसल्याबाबत पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर भय्यू महाराज यांनी त्यांच्या समर्थकांमार्फत नोटीस पाठवून, माहितीचा अधिकार टाकून तसेच फोनवर धमक्या देऊन वैयक्तिकरीत्या त्रास दिला आहे. आम्ही त्यांच्या भक्तामार्फत आलेल्या नोटिशीला उत्तर देऊ, परंतु माफी मागणार नाही, असे प्रकाश जगताप यांनी सांगितले.

माफीचा प्रश्नच नाही

भय्यू महाराजांच्या भक्ताने वकिलामार्फत उस्मानाबादसह विविध ठिकाणच्या लोकांना नोटीस पाठवून समर्थकांमार्फत फोनवर धमकी दिली आहे. नोटीस मिळाल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हॉटेल रोमा पॅलेस येथे बुधवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मूक मोर्चा निघाले. याचे श्रेय राज्यातील कोणत्याही व्यक्तींनी न घेण्याचे ठरले आहे. उस्मानाबादमध्ये निघालेला मोर्चा हा श्रेयासाठी कोणत्याही व्यक्तीने पुढाकार घेऊन आयोजित केलेला नव्हता. तो जागृत आणि अन्यायाची जाणीव झालेल्या समाजबांधवांचा होता. मात्र भय्यू महाराजांनी वृत्तवाहिन्यांद्वारे घेतलेली भूमिका कोणालाही मान्य नव्हती. त्यामुळे आम्ही त्यांच्या भूमिकेचा निषेध केला. या गोष्टीमुळे भय्यू महाराज यांनी त्यांच्या भक्त अथवा समर्थकांमार्फत आपल्यासह ८-९ जणांना कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले आहे. आपण चुकीचे बोललो नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या नोटिशीला मात्र कायदेशीर उत्तर देऊ, असेही त्यांनी या वेळी सांगितले.  मुंबई येथील असद पटेल व तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील आनंद माणिक चिनगुंडे या दोन भय्यू महाराज समर्थकांनी उस्मानाबाद पालिकेत आपल्या ‘हॉटेल रोमा’च्या जागेबाबत व बांधकाम परवान्याबाबत माहिती अधिकार टाकून त्रास देण्याचे उद्योग सुरू केले आहेत, असे स्पष्ट केले.