कोणाचेही नेतृत्व नसताना ‘समाज’ म्हणून महिला, पुरुष, तरुण-तरुणी, हातात फलक आणि दंडावर काळय़ा पट्टय़ा बांधून लाखोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्याने शहरातील रस्ते गर्दीने जाम झाले. कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ यापूर्वी निघालेल्या मोर्चातील संख्येचे उच्चांक मोडीत काढत मराठा क्रांती ‘मूक मोर्चा’ने अन्यायाविरुद्ध समाजाच्या एकीची ‘वज्रमूठ’ आवळल्याचा संदेश दिला. शहरातील पाच किलोमीटर अंतरावरचे बहुतांशी रस्ते मोच्रेकऱ्यांनी व्यापल्याने सायंकाळपर्यंत वाहतूक ठप्प होती.
बीड जिल्ह्यत कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चातील सहभागी लाखोंच्या संख्येने समाजावरील अन्यायाविरुद्ध संताप व्यक्त करत एकीचा संदेश दिला. शहराबाहेर पोलिसांनी चोहोबाजूंनी ठरवून दिलेल्या वाहनतळांवर उतरून सकाळी सात वाजल्यापासूनच लोकांच्या झुंडी दाखल झाल्या. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मदानावर दहा वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले. मराठा क्रांती मोर्चाच्या दोन हजार स्वयंसेवकांनी मोर्चा जाणाऱ्या रस्त्यासह सर्वत्र तरुणांना तनात करून कोणतीही गडबड होणार नाही याची खबरदारी घेतली होती. जागोजागी पाण्याचे आणि खाण्याचे पॅकेट ठेवण्यात आले होते. मुस्लीम समाजाच्या तरुणांनी अनेक ठिकाणी पाण्याची सोय केल्याने सामाजिक एकतेचा धागाही दिसून आला.
मात्र कोणत्याही ठिकाणी फलक, वैयक्तिक नाव नव्हते. प्रत्येक जण आपले काम असल्याचे समजून शिस्तीने सहभागी झाला होता. माध्यमांच्या लोकांनी नाव विचारले तरी स्वत:चे नाव न सांगता समाजासाठी सर्व जण मिळून काम करत असल्याचे सांगत होते. तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या या रस्त्यावर पूर्णपणे गर्दी झाली होती. नगर रस्त्यावरील चंपावती क्रीडा मंडळाच्या मदानावर महिला व मुलींना पाठवण्यात आले. तरीही रस्त्यावरील गर्दी कमी झाली नाही. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दोषींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली.