टंचाई स्थितीत पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्याचा उपक्रम निलंगा तालुक्याच्या केळगाव येथील आनंदमुनी विद्यालयातील शिक्षक बाबासाहेब लोंढे यांनी राबविला. शाळेत पक्ष्यांसाठी स्वखर्चाने १०० कुंडय़ा झाडांना अडकविल्या असून त्यात विद्यार्थी पक्ष्यांसाठी पाणी ठेवत आहेत.
जिल्हय़ातील प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. माणसे पिण्याच्या पाण्यासाठी धडपड करून पाणी मिळवत आहेत. मात्र, पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यास फार कमीजण झटतात.
लातूर शहरात पक्षिमित्र महेबूब सय्यद यांनी आपल्या घरात पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ‘एक घास पक्ष्यांसाठी काढून ठेवा’, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. त्यास प्रतिसाद देत निलंगा तालुक्यातील केळगाव येथील शिक्षक-विद्यार्थ्यांनी महेबूब सय्यद यांच्या घरी जाऊन त्यांच्या उपक्रमाची पाहणी केली व आपल्या शाळेत शंभर कुंडय़ा पिण्याच्या पाण्यासाठी विविध झाडांना लटकावून त्यात नियमित पाणी भरले जात आहे. या उपक्रमामुळे पक्ष्यांची अडचण दूर होत आहे. पाण्याबरोबरच घासभर अन्नही शाळेतील विद्यार्थी पक्ष्यांसाठी ठेवत आहेत.
लातूर शहरातील क्रीडासंकुल मदानावर नियमित फिरणाऱ्या मंडळींनी शंभर पाण्याच्या कुंडय़ा झाडांना बांधल्या असून एक झाड एकाने दत्तक घेतले आहे. झाडाला बांधलेल्या कुंडीत संबंधित व्यक्ती नियमित पाणी टाकतो. यातून पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. पाणी वाचवणे, त्याचा योग्य उपयोग करणे या बाबतीत लातूरकरांत चांगलीच जागृती झाली असून माणसांबरोबरच प्राणी-पक्ष्यांसाठीही पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विविध मंडळी पुढे येत आहेत.