भाजपकडून अखेर भगवान घडामोडे यांचा अर्ज शनिवारी दाखल करण्यात आला. गेल्या काही दिवसापासून राजू शिंदे की घडामोडे यावरुन खल सुरू होता. आज शिवसेना व भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. कॉंग्रेस व एमआयएमनेही त्यांचे स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. शिवसेनेने उपमहापौर पदासाठी स्मिता घोगरे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी जाहीर केला होता. त्यावर सेनेमध्ये काहीशी नाराजी होती. मात्र अखेर आज त्यांनी अर्ज दाखल केला.

महापौरपदासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे राजू शिंदे यांच्या नावावर आग्रही होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भगवान घडामोडे यांच्या नावाला हिरवा कंदील दाखविला. तत्पूर्वी भाजप सरचटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी नगरसेवकांशी चर्चा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भगवान घडामोडे यांच्या नावाला पसंती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. खासदार चंद्रकांत खर, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ, भाजपचे आमदार अतुल सावे तसेच पालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मराठा मोर्चांच्या पाश्र्वभूमीवर या समाजाकडे महापौरपद दिले जावे, अशी रणनीती काही नगरसेवकांनी आखली होती. मात्र, भगवान घडामोडे अनेक वर्षांपासून भाजपचे काम करीत असल्याने तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी नेत्यांसाठी केलेला प्रचार याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.