भाजप आमदाराकडूनही अधिकाऱ्याला बदडून काढण्याची भाषा

धारूर येथे आढावा बठकीत चुकीची उत्तरे देणाऱ्या बँक अधिकाऱ्याला थेट बदडून काढण्याची भाषा भाजपचे आमदार आर.टी देशमुख यांनी वापरल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली. दोन दिवसांपूर्वीच माजी मंत्री बदामराव पंडित यांनी गटविकास अधिकाऱ्याला ठोकून काढले तर माजलगावात सभापती पतीने गटविकास अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचीही घटना घडली. लोकप्रतिनिधींनी थेट अधिकाऱ्यांनाच टाग्रेट केल्याने जिल्ह्यात अधिकारी विरुद्ध लोकप्रतिनिधी असे चित्र निर्माण झाले आहे.   बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे लोकांची कामे घेऊन आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करतात. मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आता लोकप्रतिनिधी कायदा हातात घेऊन अधिकाऱ्यांना बदडून काढण्याचेच धोरण ठरवत आहेत. तसे जिल्ह्यात अधिकाऱ्यांना बदडणे असे प्रकार नवे नसले तरी दुष्काळी परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधीतील संघर्ष तापदायक ठरू लागला आहे. माजलगाव मतदारसंघातील भाजप आमदार आर. टी. देशमुख यांनी धारूर येथे तालुका आढावा बठक घेतली. या बठकीत तहसीलदार राजाभाऊ कदम, गटविकास अधिकारी मीनाक्षी कांबळे यांच्यासह सभापती अर्जुन तिडके, बँकेचे उपाध्यक्ष गोरख धुमाळ आणि तालुका पातळीवरील बँकांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या वेळी एका बँक अधिकाऱ्याने कर्ज वाटपाबाबत आणि पुनर्गठनाबाबत चुकीची माहिती दिल्याने ते संतप्त झाले. आमदार देशमुख यांनी संबंधितास ठोकून काढण्याची भाषा केली. बठकीत आमदारांच्या दमबाजीने अधिकारी चक्रावून गेले. तर दोनच दिवसांपूर्वी गेवराईत राष्ट्रवादीचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी गटविकास अधिकारी बी. डी. चव्हाण यांना कार्यालयात जाऊन विहीर मंजुरीच्या प्रकरणावरून बेदम मारहाण केली. या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. माजलगाव तालुका पंचायत समिती सभापती पतीनेही बदलीच्या कारणावरून गटविकास अधिकाऱ्याला खालच्या भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. या प्रकारांमुळे लोकप्रतिनिधी विरुद्ध अधिकारी असे चित्र दिसू लागले आहे.