औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अधिक जागा मिळाव्यात यासाठी भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. जि. प.च्या मागील निवडणुकीत ६० गटांपैकी २४ जागांवर भाजपाचे उमेदवार होते. शिवसेनेने ३६ ठिकाणी उमेदवार दिले होते. आता हेच सूत्र उलटे फिरवावे म्हणजे भाजपला ३६ आणि शिवसेनेला २४ जागा मिळतील. युती करायची असेल तर एखाद-दोन जागांवर तडजोड केली जाऊ शकते. मात्र, ताकद वाढल्याने आम्हाला अधिक जागा मिळाव्यात, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.

जि. प.च्या निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय जिल्ह्य़ातील पदाधिकारीच घेतील, असे भाजपच्या प्रदेश कार्यालयातून सांगण्यात आले आहे. सोमवारी रात्री शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. भाजपचे प्रभारी डॉ. भागवत कराड, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, आमदार प्रशांत बंब यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत भाजप नेत्यांनी जागा वाढवून मागितल्या. त्याला शिवसेना नेत्यांनी विरोध दर्शवला. ग्रामीण भागातील भाजपचे कार्यकर्ते वाढले आहेत. त्यामुळे जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या नेत्यांसमोर ठेवला असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. आज सकाळी भाजप कार्यालयात गट आणि गणांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. कन्नड, खुलताबाद आणि गंगापूर या मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी करण्यात आली असून सिल्लोड येथे अन्य तालुक्यांची बैठक होणार आहे. ४०-४५ जागांवर भाजपचा प्रभाव वाढला असल्याचा दावा गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी केला. जिल्हा परिषदेमध्ये ६५ गट आहेत. यापैकी किती जागा कोणाला, यावरून वाद सुरू आहे. तो मिटला तर युती होईल. मात्र, सर्व ६५ गटांसाठी भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.