अडीच वर्षांपूर्वी केंद्रात, त्यापाठोपाठ राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपने पक्षस्थापनेच्या ३५ वर्षांनंतर महाराष्ट्रातील नगरपरिषदांच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले. यानिमित्ताने पक्षातील जुन्या मंडळींनी आनंद व्यक्त करतानाच, भाजपला नगरपरिषदांमध्ये सर्वप्रथम मुदखेड (जि. नांदेड) येथे एकहाती सत्ता मिळाली होती, याची आठवण करून दिली. पण त्याच मुदखेडमध्ये आता या पक्षाला काँग्रेस पक्षाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध झगडावे लागत आहे.

नांदेडपासून २५ कि.मी. अंतरावर असलेले मुदखेड हे रेल्वेच्या जंक्शनचे ठिकाण. येथील नगरपरिषद खूप जुनी. निजाम राजवटीत तिला ‘पूर पालिका’ म्हणत असत. त्यानंतर १९५६ साली तिचे रूपांतर नगरपरिषदेत झाले. तेव्हापासून या संस्थेत काँग्रेस किंवा स्थानिक आघाडीची सत्ता राहिली. १९८५ पर्यंत हा परिपाठ कायम होता.

megablock
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे – लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द, काही उशिराने धावणार
pm narendra modi pune visit marathi news, pm modi pune 6 march marathi news,
मोठी बातमी : पुणे मेट्रो रामवाडीपर्यंत ६ मार्चपासून धावणार; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका
badlapur railway station home platform marathi news, home platform inauguration by raosaheb danve marathi news
बदलापुरच्या होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण, सोहळ्यापूर्वी महाविकास आघाडीची निदर्शने

१९८०च्या सुमारास केंद्र सरकारातील उलथापालथीनंतर त्या वेळच्या जनसंघीयांनी जनता पक्षातून अलग होत भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. त्यानंतर पाच वर्षांनी अन्य नगरपालिकांसोबत मुदखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत हा पक्ष स्वतंत्रपणे उतरला. आता वयाच्या सत्तरीत असलेले राम लक्ष्मीकांतराव चौधरी तेव्हा ३८ वर्षांचे होते. ज्या गावात मुस्लिम आणि मागासवर्गीयांचे प्रमाण ५० टक्क्यांवर होते, तेथे चौधरी यांनी दाखवलेल्या राजकीय धाडसाला मोठे यश मिळाले. २० पकी १४ जागा जिंकून चौधरी यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात स्थानिक स्वराज्य संस्थेवर सर्वप्रथम भाजपचा झेंडा फडकवला.

त्याआधी १९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे देशभर काँग्रेसबद्दल निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत भाजपसह सर्व पक्षांची धुळधाण उडाली होती. लोकसभेत भाजपला केवळ २ जागा मिळाल्या. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाला नगण्य जागा मिळाल्या. अशा वातावरणातही काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राम चौधरी यांनी एकहाती चमत्कार घडवून आणत नगरपरिषदांतील पक्षाच्या सत्तेचा श्रीगणेशा केला. १९८५ ते १९९५ अशी सलग १० वर्ष त्यांनी नगराध्यक्षपदही भूषवले आणि पुढेही म्हणजे २००१ पर्यंत मुदखेड पालिकेत पक्षाची सत्ता कायम राखली. विशेष म्हणजे १९८५च्या निवडणुकीत त्यांनी मुदखेडच्या मुस्लिमबहुल भागातून दोन मुस्लिम कार्यकर्त्यांना भाजपच्या चिन्हांवर निवडून आणले आणि नंतरच्या काळात फरजाना बेगम अली अकबर या महिलेला नगराध्यक्षपदी विराजमान केले.

१९९९ साली काँग्रेसकडून अशोक चव्हाण यांची मुदखेड विधानसभा मतदारसंघात ‘एन्ट्री’ झाली. ते आधी आमदार आणि मग मंत्री झाले. त्यानंतरच्या पालिका निवडणुकांत मुदखेडची सत्ता हस्तगत करण्यासाठी काँग्रेसने सर्व प्रकारच्या तंत्रांचा वापर करीत तब्बल १७ वर्षांची भाजप राजवट संपुष्टात आणली. नांदेड जिल्ह्यात भाजपला त्या आधी किंवा नंतरच्या काळातही अन्य कोणत्याही पालिकेत अशाप्रकारे निर्वविाद सत्ता मिळाली नाही. २००२च्या आधीपासून चौधरी यांची पक्षनेतृत्वाकडून कोंडी करण्यात आली. एका नेत्याने (आता दिवंगत) त्यांच्यावर डूख धरला होता. त्यातून एकाकी पडलेल्या चौधरी यांना २००२ नंतर पक्ष सोडावा लागला. आधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग काँग्रेस असा राजकीय प्रवास करून ते २०१४ मध्ये पुन्हा स्वगृही दाखल झाले. आता १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या मुदखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने त्यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार उभे केले असले, तरी पक्षातील जुने आणि नवे नेते मुदखेडबाबत गंभीर असल्याचे दिसत नाहीत. नगरपरिषदांतील पक्षाच्या सत्तेचा श्रीगणेशा ज्या मुदखेडमध्ये झाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी विशेष लक्ष घालावे, अशी अपेक्षा चौधरी यांनी येथे व्यक्त केली. १९८४-८५ दरम्यान देशात दोन खासदार, काही आमदार आणि मुदखेड पालिकेची एकहाती सत्ता हेच पक्षाचे भांडवल होते याकडे चौधरी यांनी लक्ष वेधले.

भाजपला एकहाती सत्ता देणारी पहिली नगरपरिषद अशी ओळख मुदखेडची असून, त्यानंतर या पक्षाला अकोट नगरपरिषदेत सत्ता मिळाली. भाजपच्या ताब्यात आलेली पहिली ग्रामपंचायत म्हणजे देवणी (जि. लातूर) होय.