येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी सोमवारपासून संपावर असून नाशिक विद्यापीठाने अजूनही संपाची दखल न घेतल्याने बुधवारी या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बुटपॉलिश आंदोलन केले. तीन दिवसांच्या संपामुळे आजारी जनावरांचे हाल होत आहेत.
पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. पदवी वर्षांतील आंतरवासीय कालावधीत निर्वाह भत्त्यात १२ हजारांची वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थी संपावर आहेत. महाराष्ट्र सोडून अन्य राज्यांत आंतरवासीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता १० ते १२ हजार रुपयांपर्यंत दिला जातो. विद्यार्थ्यांचा वाढता खर्च लक्षात घेऊन निर्वाह भत्त्यात वाढ करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. परभणीसह राज्यातील सहा पशुवैद्यकीय महाविद्यालयांत हे आंदोलन सुरू आहे.
नाशिकच्या पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंना संपाची नोटीस देण्यात आली होती. मात्र, संपाबाबत विद्यापीठाने या प्रश्नी
भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. मंगळवारपासून महाविद्यालयातील पशुचिकित्सा विभागही बंद करण्यात आला. येथे आजारी जनावरांवर उपचार केले जातात. मात्र, विद्यार्थी संपावर गेल्याने पशुपालकांना आपली आजारी जनावरे खासगी डॉक्टरांना दाखवावी लागत आहेत. संपाचा बुधवारी तिसरा दिवस होता. या दिवशी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. मोर्चानंतर विद्यार्थ्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंचे बुटपॉलिश करून आंदोलन केले.