आगामी लोकसभेत औरंगाबाद मतदारसंघात भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे नाव देखील चर्चेत आहे. त्या शुक्रवारी औरंगाबादमधील सुभेदारी विश्रामगृहावर आल्या होत्या. यावेळी माध्यमांशी संवाद साधत खैरे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. याबाबत पक्ष जो निर्णय घेईल ते मान्य असल्याचे रहाटकर यांनी सांगितले.

याचवेळी खैरे देखील याठिकाणी आले होते. तुम्ही विषय काढला आणि मी आलो. हा योगायोग असला तरी औरंगाबाद हा फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गड असल्याचे सांगत त्यांनी निवडणुकीच्या मैदानात शिवसेनाच बाजी मारेल, असा विश्वास व्यक्त केला.  सलग चौथ्यांदा खैरे या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत खैरेंचा विजयरथ अडवण्याची तयारी भाजपकडून सुरु आहे. खैरे यांच्या विरोधात निवडणूक आखाड्यात कोणाला उभं करायचं याचीही चाचपणी सुरु आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, भाजप आमदार अतुल सावे आणि प्रशांत बंब यांची नावे चर्चेत आहेत. रहाटकर यांना त्यांच्या नावाबद्दल विचारलं असता, पक्ष जो निर्णय घेईल त्यात माझी तयारी असल्याचं त्या म्हणाल्या. पत्रकार परिषद संपून बाहेर पडत असताना खैरे याठिकाणी आले होते. औरंगाबाद हा फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गड आहे, एवढं उत्तर पुरेस आहे, असे ते म्हणाले.