हातउसने घेतलेले पसे देण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी कळंब येथील माणिक विठ्ठलराव कातमांडे यास एक महिन्याचा कारावास, तसेच फिर्यादीस ४ लाख ३० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश गुरुवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले.
कळंब येथील माणिक कातमांडे व इतरांनी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करून संस्थेच्या कामानिमित्त सभासदांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये जमा केले. कातमांडे संस्थेचे अध्यक्ष आहेत. उस्मानाबाद येथील वीरभद्र स्वामी यांनी आरोपी कातमांडे याच्याशी मत्रीचे संबंध असल्यामुळे कातमांडेस १ लाख रुपये हातउसने दिले. यानंतर कातमांडे याने सभासदांकडून जमा केलेल्या पशातून संस्थेचे कोणतेही कामकाज केले नाही. परिणामी पसे देणाऱ्या सर्व सभासदांनी आपापले पसे परत करण्याची मागणी केली. त्यावर आरोपी कातमांडे याने सदस्यांना उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या कळंब शाखेचे धनादेश दिले. मात्र, कातमांडे हे बँकेचे थकित कर्जदार असल्यामुळे धनादेश वटले नाहीत. त्यामुळे कातमांडे यांनी वीरभद्र स्वामी यांच्याकडे सभासदांचे पसे देण्यासाठी म्हणून आणखी ३ लाख ५० हजार रुपयांची मागणी करून ते घेतले. सर्व पसे दोन महिन्यांत परत देण्याची त्याने हमीही दिली. परंतु कातमांडेने ही रक्कम परत न देता केवळ २३ हजार रुपये रोख दिले व ४ लाख २३ हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र, खात्यावर पुरेशी रक्कम नसल्यामुळे हा धनादेश वटला नाही. त्यामुळे स्वामी यांनी अॅड. महेंद्र देशमुख यांच्यामार्फत न्यायालयात धनादेश न वटल्याबाबत कातमांडेविरुद्ध फिर्याद दिली. या प्रकरणी अॅड. देशमुख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. व्ही. देशमुख यांनी आरोपी कातमांडे यास वरील शिक्षा सुनावली.