शेतकरी संपानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीची रक्कम बँकेत जमा होईपर्यंत शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून हजार रूपय पीक कर्ज देण्याची घोषणाही करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ते दिलेच नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा; अशी तक्रार औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण एमआयडीसी पोलिसात एका शेतकऱ्याने दिली. पैठण तालुक्यातील वाहेगाव येथील संतोष सखाराम सोनवणे या शेतकऱ्यांकडे दोन एक्कर शेतजमीन आहे. एसबीआयच्या ईसारवाडी शाखेतून त्यांनी कर्ज घेतले होते. कर्जमाफीची घोषणा झाल्याने नवीन कर्ज घेता येईल. त्यातून शेतीची कामे करता येतील, असे त्यांना वाटले. मात्र तत्वतः आणि निकष शब्दांमुळे बँका दारात उभे करत नसल्याचा अनुभव त्यांना आला. शिवाय निर्णयाची अंमलबजावणी होईपर्यंत दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र त्याची पूर्तता झाली नाही. पत्नीचे दागिने गहाण ठेऊन पेरणी करण्याची वेळ आली, असे  सोनवणे म्हटले आहे.

निसर्ग साथ देत नाही. सरकार घोषणा करून त्याची अंमलबजावणी न करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घोषणा केली. मात्र दोन महिने होत आले तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला नाही. ही एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक असल्यानं त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी तक्रार एमआयडीसी पोलिसात त्या शेतकऱ्याने दिली.