काळय़ा जादूसाठी पाच वर्षांच्या मुलाचा विहिरीत ढकलून नरबळी दिल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल वर्षांनंतर दोन महिला व शिक्षकासह आठ जणांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मागील वर्षभरापासून आरोपी बळी पडलेल्या मुलाच्या कुटुंबावर काळय़ा जादूचा धाक दाखवून, तसेच पोलिसात तक्रार दिल्यास सर्व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होते. याबाबत या मुलाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दबाव आणून तक्रार देऊ दिली नव्हती, मात्र कन्नडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानंतर देवगाव रंगारी पोलिसांनी अखेर आरोपींवर गुन्हा दाखल केला. यातील सर्व आरोपी फरारी असल्याचे सांगण्यात आले.
रवींद्र काळे यांचा मुलगा यश (वय ५) याचा गेल्या वर्षी २३ जानेवारीला संध्याकाळी पाचच्या सुमारास कन्नड तालुक्यामधील माटेगाव शिवारातील अंकुश अंकुशकर यांच्या शेतातील विहिरीत गणेश शिवाजी इंगळे याच्या बैलगाडीसह पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. फिर्यादी काळे घटनेच्या तीन दिवस आधी सुरत येथे कापसाची गाडी घेऊन गेले होते. काळे यांची पत्नी रेखा त्याच दिवशी आरोपी गणेश इंगळे याच्या पत्नीसमवेत तिच्या शेतात कापूस वेचणीसाठी गेली होती. परंतु शेतात कापूस फुटलेला नसतानाही रेखाला बोलावले होते. त्या दिवशी फक्त एक गोणी कापूस निघाला होता. नंतर इंगळेसह अन्य आरोपी सुरेश इंगळे, रुद्र इंगळे हे दुपारी चारच्या सुमारास घरी गेले, तेथे यश हा मुलगा खेळत होता. आईकडे चल असे म्हणून त्याला बैलगाडीत बसवून शेतात नेले व मुलास विहिरीत ढकलून जीवे मारले. कोणाच्या लक्षात येऊ नये, म्हणून आरोपींनी विहिरीत स्वत:ची बैलगाडी लोटून दिली.
घटनेच्या आदल्या दिवशी आरोपींनी यशची काळय़ा जादूसाठी पूजा केली. हे सर्व मृत यशच्या आईने बघितले होते. परंतु त्यास जीवे मारण्याची धमकी देऊन कोणाला सांगितल्यास तुझ्यासह कुटुंबाला संपवून टाकू, अशी धमकी दिल्याने या प्रकरणावर मागील वर्षभरापासून पडदा टाकण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. यशचे वडील रवींद्र काळे यांनी अॅड. सतीश चव्हाण (चिखलगावकर) व अॅड. शंकर वानखेडे यांच्यामार्फत आरोपींविरुद्ध कन्नड न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर आरोपी गणेश शिवाजी इंगळे, सुरेश बारत इंगळे, शिवाजी नामदेव इंगळे, रुद्र गणेश इंगळे, भारत मच्छिंद्र इंगळे, गोरख नामदेव इंगळे, वर्षां गणेश इंगळे व मंगला शिवाजी इंगळे यांच्याविरुद्ध देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
नराधम गुरुजी!
आरोपींपैकी गोरख इंगळे हा शिक्षक आहे. भावी पिढी घडविण्याऐवजी नरबळीसारख्या कृत्यात सामील होऊन शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचे कृत्य त्याने केल्याने संताप व्यक्त होत आहे.

Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
girl rescued within twelve hours
अपहरण झालेल्या पाच वर्षीय मुलीची बारा तासांत सुटका