काही काळ ढगाळ वातावरण होते, ते आता निवळले आहे, असे सांगत शिवसेना-भाजपमधील ताणतणाव तूर्तास दूर झाल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पठण येथे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुतळय़ाच्या अनावरण सभारंभापूर्वी कदम बोलत होते. दोन्ही पक्षांतील तणावाचे वातावरण कसे निवळले हे सांगण्याचे त्यांनी टाळले. मात्र, वेळ आल्यावर बाकी गोष्टी ठरवू, असे सांगायला ते विसरले नाहीत.
भाजप-सेनेतील वादानंतर जाहीर कार्यक्रमात शिवसेना-भाजपचे नेते प्रथमच पठण येथे एका व्यासपीठावर होते. तत्पूर्वी सरकारमधील दोन्ही पक्षांच्या वादावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द अंतिम असेल, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. या विषयावर अधिक कडक बोलण्यास आम्ही घाबरत नाही, असे संकेत देत त्यांनी शिवसेना आक्रमकच राहील, असे संकेत दिले. भाजप आमदार प्रशांत बंब यांनी जायकवाडीच्या ऊध्र्व भागातील अतिरिक्त ठरलेली धरणे कॅप्सूल बॉम्ब लावून उडवून द्यायला हवीत, असे प्रक्षोभक वक्तव्य नुकतेच लेखी निवेदनाद्वारे केले. त्यावर कदम म्हणाले, की ते सत्तेत आहेत, याचा त्यांना विसर पडला असेल. ते त्यांच्या मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्ये करणे चुकीचे आहे. जे विषय चच्रेने सोडवू शकतात, त्यावर असे वक्तव्य चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. या बॉम्बचा संदर्भ पकडून आता जे करायचे ते आम्ही करणार आहोत, असे राजकीय वक्तव्यही केले. त्याला भाजप-सेनाअंतर्गत वादाची किनार होती.