हवामान शात्रज्ञांनाही नेमके सांगता येत नाही, इतका खंड पावसात पडत असून, त्यामुळे शेतीच धोक्यात आली आहे. हवामान बदलासंबंधी नेमकी माहिती बांधावरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने शेतीवर त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत.

यंदा महाराष्ट्रातील अनेक जिल्हय़ांत पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. खरीप हंगामाच्या उत्पन्नात ३० टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. २०१५ सालच्या दुष्काळाची तीव्रता आधीच्या सर्व दुष्काळांपेक्षा अधिक होती. २०१६ मध्ये अतिवृष्टीने अडचणी निर्माण केल्या तर २०१७ साली पावसाच्या मोठय़ा विश्रांतीमुहे शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्याला नेमकी शेती करायची कशी, हे कळेनासे झाल्यामुळे ‘धरले तर चावते व सोडले तर पळते’ अशा कचाटय़ात शेतकरी सापडला आहे.

राज्यभरात दरवर्षी कमी पाऊस पडणाऱ्या तालुक्यांची संख्या वाढते आहे. त्यातही सर्वाधिक चिंता करावी लागणारी परिस्थिती मराठवाडय़ात आहे. कोरडवाहू शेतीचे प्रमाणही मराठवाडय़ातच अधिक आहे. दरवर्षी मे महिन्यात हवामान विभागाच्या वतीने पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो अन् त्यानुसार शेतकरी ढगाकडे बघतच शेतीत राबतो.

हवामान विभागाचे अंदाज अनेकदा खोटे ठरत असल्याने त्यावर विसंबून राहणे शेतकऱ्याला अवघड होऊ लागले आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे आपली फसवणूक झाल्याची तक्रार मराठवाडय़ातील शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात केली. ती काही केवळ एक तक्रार नोंदवावी या उद्देशाने केली नाही तर हवामान विभागाबद्दलचा शेतकऱ्यांचा तो प्रातिनिधिक आक्रोश आहे. अजूनही आपल्याकडे पावसाचा अंदाज नेमकेपणाने वर्तविण्याची स्थिती नाही. ढोबळ अंदाज व्यक्त केले जातात. योग्य पध्दतीने अभ्यास करण्याची यंत्रणा विकसित करण्याची गरज आहे.

पुणे येथील हवामानशात्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले, मराठवाडय़ातील सर्व तालुक्यांचा हवामान विभागाच्यावतीने स्वतंत्र अभ्यास करून तालुकानिहाय पाऊस नेमका कसा पडेल, किती दिवसाचा खंड पडेल? त्यानुसार खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी कोणती पिके घेतली पाहिजेत? याचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. अर्थात त्यासाठी जी पूर्वतयारी करावी लागणार आहे त्याबद्दल शासनाने जागरूक राहायला हवे.

जगभरच हवामान बदलाच्या समस्येला तोंड द्यावे लागते आहे. राज्यात मराठवाडय़ातील शेतकऱ्याला त्याचा सर्वाधिक फटका बसतो. ४० वर्षांपूर्वी खरिपाचा पेरा ८० टक्के अन् रब्बीचा पेरा २० टक्के असे प्रमाण होते. आता ते बदलत जवळपास ६० टक्के खरिपाचा पेरा व ४० टक्के रब्बीचा पेरा येथपर्यंत बदलले आहे. पावसाचे प्रमाण खरीप हंगामात कमी होते आहे. साचलेल्या पाण्याचा लाभ घेत शेती करायची तर रब्बी हंगामाकडे लोकांचा कल वाढवावा लागेल. खरीप हंगामात घेतले जाणारे सोयाबीन, उडीद, मूग, तूर, कापूस हे कमी कालावधीत येतील असे वाण तातडीने विकसित केले पाहिजेत. ज्या वाणांना १०० ते १२० दिवस लागतात ती पिके ८० ते ९० दिवसांच्या आत निघणारे वाण शेतकऱ्यांना पुरवले पाहिजे. रब्बी हंगामातही याच पध्दतीने वाण निर्मितीची गरज आहे. वांगे घेवडा हे वाण खरीप हंगामात येणारे व ८० दिवसांत निघणारे आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली या भागात याला चांगली मागणी आहे. १०० ते १२० दिवसात निघणारी तूर हीदेखील निर्माण व्हायला हवी.

वारंवार पडणाऱ्या दुष्काळातून शेती वाचवायची कशी, याची उत्तरे शोधून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. बदलत्या परिस्थितीत शेतीशी जुळवून घेण्याची शेतकऱ्यांची तयारी करून घेतली पाहिजे. शेतकरी कठीण स्थितीतही शेती करू शकतो हा विश्वास त्यांच्यात निर्माण होण्याची गरज आहे. ‘वरातीमागून घोडे’ या पध्दतीने शेती विभागाचा सुरू असलेला कारभार ‘मागील पानावरून पुढे’ तसाच चालू आहे. यात बदल झाला नाही तर मात्र शेतीसाठी ते मारक ठरणार आहे.

२१ जूननंतर  ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडय़ांपर्यंत अनेक तालुक्यांत पाऊसच पडला नाही. इतका मोठा खरीप हंगामातील पावसाचा हा कदाचित पहिलाच खंड असावा. भविष्यात असे खंड किती दिवसाचे असणार आहेत याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.  दोन वर्षांपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तालुकानिहाय नव्हे तर मंडलनिहाय हवामानाची इत्थंभूत माहिती देणारी अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, त्यादृष्टीने पावलेच पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांची  चिंता व त्यातून होणारे वेगवेगळे परिणाम समाजातील सर्वच घटकांची काळजी वाढवणारे आहेत.

वर्षांच्या प्रारंभी महाराष्ट्रात शंभर टक्के इतकाच सगळीकडे पाऊस असेल असे सांगितले गेले. निम्मा पावसाळा संपला तरी पावसाची सरासरी ३५ ते ३७ टक्क्यांवरच घुटमळते आहे. उर्वरीत काळात ६५ टक्क्यांचा टप्पा पाऊस गाठेल यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही अन् त्यामुळेच हे वर्षही दुष्काळाला निमंत्रण देणारेच वर्ष असल्याची साधार भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. हवामान विभाग, कृषी विभाग व राज्य शासनाची संबंधित यंत्रणा कशी गतिमान होते यावरच शेतीचे भवितव्य अवलंबून आहे.