अखिल भारतीय औषधी विक्रेत्याच्या संघटनेने संपूर्ण भारतात व राज्यात बेकायदेशीररीत्या चालवल्या जाणाऱ्या ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात बुधवारी (दि. १४) देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे.
राज्य केमिस्ट संघटनेचे ५५ हजार औषध विक्रेते या ‘बंद’मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. राज्यात ई फार्मसीच्या माध्यमातून झोपेची औषधे, गर्भपाताच्या गोळय़ा, नार्पोटिक्स ड्रग्जसारख्या अनेक धोकादायक औषधांची विक्री सुरू असल्याचे प्रशासनास वेळोवेळी निदर्शनास आणून दिले. मात्र, प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे राज्यातील औषध विक्रेते आंदोलनात्मक भूमिका घेत आहेत. बेकायदा चालू असलेला ऑनलाईन औषधी व्यापार बंद व्हावा, कमी दर्जाच्या औषधांच्या शिरकावाची शक्यता अधिक असल्याने ती टाळली जावी, युवकांमध्ये नशेच्या औषधांचा वापर टाळावा, ग्रामीण भारतात जीवनरक्षक औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता यासह अनेक महत्त्वाचे मुद्दे संघटनेने आंदोलनाच्या निमित्ताने ऐरणीवर आणले आहेत.
जगभर ज्या देशांनी ऑनलाईन फार्मसी व्यवसायास मान्यता दिली त्या देशास आज गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागते आहे. भारतासारख्या देशाने या व्यवसायातील उणिवांची दखल घेऊन त्यावर उपाय करणे महत्त्वाचे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. बुधवारी होणाऱ्या ‘बंद’मध्ये जिल्हय़ातील सर्व विक्रेते सहभागी होणार असल्याची माहिती बोधकुमार चापसी, रामदास भोसले, तालुकाध्यक्ष ईश्वर बाहेती यांनी दिली.