भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ९०व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘आजच्या संदर्भात कार्ल मार्क्‍स’ या विषयावर बार्शी येथील प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने ६ पुस्तिकांचे प्रकाशन होणार असल्याची माहिती प्रा. राम बाहेती यांनी दिली. तापडिया रंगमंदिरात उद्या (गुरुवारी) सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी भालचंद्र कानगो असतील.
कामगार आणि असंघटित क्षेत्रातील दबलेल्यांचा आवाज म्हणून काम करणाऱ्या भाकपच्या कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या ६ पुस्तिकांचे प्रकाशन होणार आहे. अविनाश कदम यांनी लिहिलेली दुमदुमली ललकार, प्रा. संजय चिटणीस यांची भाकप व गिरणी कामगार चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा, अ‍ॅड. भगवान देशपांडे यांनी लिहिलेली निजामशाही विरोधी कम्युनिस्टांचा लढा, प्रा. आनंद मेणसे लिखित गोवा मुक्तिसंग्रामात कम्युनिस्टांचे योगदान, गणेश मतकरी समाजवाद आणि हिंदी सिनेमा या विषयावरील पुस्तिका प्रकाशित केल्या जाणार आहेत.