परभणी जिल्हा बँकेत संगणक खरेदीत घोटाळा

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व जिल्हा देखरेख संघ यांनी संगनमत करून संगणक खरेदी केलेल्या कोटय़वधी रुपयांच्या घोटाळय़ाची चौकशी करण्यासाठी विशेष लेखा परीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार राज्यमंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधिमंडळ सभागृहात दिली.

आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत खरेदी केलेल्या संगणक घोटाळय़ाचा तारांकित प्रश्न आज विधिमंडळात उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सहकार राज्यमंत्री देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व जिल्हा देखरेख संघ यांनी केवळ कागदोपत्रीच सोपस्कार पूर्ण करून संगणक खरेदी दाखविण्यात आली. प्रत्यक्षात संगणक खरेदीच करण्यात आले नाही. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटय़ांना दबाव घेऊन त्यांना संगणक पुरविले, असे दस्ताऐवज तयार केले. जिल्हा देखरेख संघानी सोसायटय़ांना संगणक पुरविण्यासाठी ठराव घेतला व त्या ठरावास जिल्हा बँकेने लागलीच मान्यता देऊन कर्ज मंजूर केले. हे कर्ज जिल्ह्यातील ६२३ सेवा सोसायटय़ांच्या कर्जखाती टाकल्याचे सोपस्कार पूर्ण केले. परंतु प्रत्यक्षात संगणक खरेदीच केली नाही. सोसायटय़ाकडे संगणकावर काम झाल्याबाबतच्या हार्डडिस्क उपलब्ध नाहीत. तत्कालीन संचालक व अधिकारी यांनी केलेल्या घोटाळय़ामुळे जिल्हाभरातील सेवा सोसायटय़ा कर्जाच्या बोजाखाली दबून गेल्या आहेत. त्यामुळे आíथक अडचणीत त्या सापडल्या आहेत.

बनावट दस्तऐवज तयार करून उचलेल्या पीक कर्ज व शुभमंगल घोटाळय़ाप्रकरणी पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा बँकेचे सहाजण निलंबित झाले तर १६ अधिकारी व पदाधिकारी यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे नोंद झाले. आता बनावट संगणक खरेदी घोटाळा उघडकीस येऊन त्याचीही चौकशी सुरूझाली आहे. त्यामुळे बँक शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहे की अधिकारी व नेत्यांच्या लुटीसाठी आहे, असे मत आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी व्यक्त केले.